Saturday, June 4, 2016

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)


लक्षवेधी ‘असूरवेद’!

Posted: 03 Jun 2016 10:46 PM PDT

संजय डहाळे

राज्य नाट्य स्पर्धेच्या मांडवाखालून अनेक दर्जेदार नाटके, अभिनेते, तंत्रज्ञ गेले आहेत. खर्‍या अर्थाने एक 'प्रयोगशाळा' म्हणून ही स्पर्धा आजही रंगकर्मींना खुणावतेय. नवनवीन संहिता अन् त्याचे हटके सादरीकरण त्यात दरवर्षी बघायला मिळते. यंदाही 'असूरवेद' या नाटकाने रसिकांना विचार करण्यास भाग पाडले आहे. केवळ 'प्रथम क्रमांक विजेते नाटक' इतपतच त्याची ओळख शिल्लक उरणार नाही तर धर्म-अधर्म, पुराणकाळ-भविष्यकाळ, सत्य-असत्य यावर प्रभावी नाट्यमय भाष्य करणारी नाट्यकृती आकाराला आली आहे. आता या नाटकाचे काही प्रयोग हे आयोजित करण्यात येत आहेत. त्यामुळे रसिकांना 'असूरवेद'चे दर्शन होत आहे ही समाधानाची बाब. नाहीतर केवळ नाट्यस्पर्धेपुरते हे नाट्य उरले असते, पण 'कलासाधना'ने रसिकांपर्यंत नाट्य पोहोचविण्याची धडपड केली. जी कौतुकास्पद म्हणावी लागेल.

संस्कृतीविषयक संशोधन करणारे संजय सोनवणी यांची 'असूरवेद' ही कादंबरी प्रसिद्ध झाली होती. त्या कादंबरीवर आधारित नाट्यरूपांतर सुनील हरिश्‍चंद्र यांनी केले. दिग्दर्शनही त्यांचेच आहे. कादंबरीचा आवाका मोठा. त्याचे नाट्यरूपांतर करताना परिश्रम घेतल्याचे जाणवते. स्वत: सुनील हरिश्‍चंद्र हे कल्पक रंगकर्मी असल्याने ही किमया त्यांनी केली. विषय तसा गंभीर व चक्रावून सोडणारा, पण त्यातही एक गूढता, उत्कंठा तसंच कुतूहल असल्याने विषय डोईजड होत नाही. रहस्यप्रधान नाट्य बघत असल्याचा अनुभव मिळतो.

संशोधक सुरेश जोशी यांचा अचानक खून होतो. पेशानं प्राध्यापकी करणारे जोशी यांचे तसे कुणी शत्रू नसतात. तरीही त्यांच्यावर हल्ला होतो. त्यात ते जातात. ऐतिहासिक मूर्तींमागे शोध घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतो. संस्कृतीविषयक प्रदीर्घ अभ्यासानंतर आपले काही महत्त्वाचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्याचा त्यांचा विचार असतो, तेवढ्यात त्यांचा झालेला खून. असूर वरुणाची मूर्ती त्यात गायब होते.

प्रा. जोशी हे मूर्ती तस्करी करणारे म्हणूनही चर्चा सुरू होते. एक रहस्यकथाच सुरू होते आणि मग त्याचा शोध प्रा. जोशी यांची कन्या सायली तसेच तिचा मित्र गौतम कांबळे हे सुरू करतात. त्यांच्यासोबत त्यांचे पीएचडीचे तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. मुणगेवार हे आहेत. सायली-गौतम हे दोघेही संशोधकच. आणि या शोधाचा मागोवा म्हणजे हे नाट्य. त्यात हिंदू-मुस्लिमांवर भाष्य आहे, इतिहास आहे. संस्कृती रक्षणासाठी व वर्चस्वासाठी होणारा संघर्ष आहे. एका क्षणी या नाट्यातील थ्रिल-गूढता संपते आणि वैचारिक स्तरावर पोहचते.

संस्कृतीच्या अस्तित्वासाठी काही कर्मठांनी जुन्या संहिता लपविल्या, बाद ठरविल्या आणि आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपण आपला भूतकाळ, पुराणकाळ तपासून घ्यावयास हवा. त्याचा शोध घेणे जरुरीचे आहे असं काहीदा एकूण कथानकातून मांडण्याचा प्रयत्न आहे. यातील वैचारिक संवाद काहीदा भडक व टोकाचे ठरतातः तर काहीदा हे एक 'थ्रिल'नाट्य म्हणूनही वाटते, पण दोन अंकात खिळवून ठेवणारे प्रायोगिक वैचारिक नाट्य म्हणून निश्‍चितच त्यात ताकद आहे.

मृणाल वरणकर यांनी सायलीची भूमिका समजून केली आहे. अभिनयाचं उत्तम अंग त्यांना आहे. प्रायोगिक रंगभूमीवरून आलेला नव्या पिढीचा अभ्यासू रंगकर्मी सुशील इनामदार याने गौतमची भूमिका सुरेख केली. मृणाल व सुशीलचं ट्यूनिंग चांगलं आहे. गौरव मालवणकर (प्रा. मुणगेकर), सुभाष लोखंडे (द्विवेदी), रवी बनकर (डीसीपी) यांच्याही भूमिका नाट्याला पूरक ठरतात. आशीष पाथरे यांनी शेवटच्या क्षणी प्रा. जोशी म्हणून लावलेली हजेरी लक्षात राहण्याजोगी. तांत्रिक अंगे नाट्याला साथसोबत करणारी. एकूणच टीमवर्क सर्वांगसुंदर, काहीसा जड विषयही दिग्दर्शक-लेखकाने कल्पकतेनं पेलला आहे. त्याला एक गती आहे.

महाराष्ट्रात बुद्धिवंतांच्या झालेल्या हत्यांशी या नाटकाचा संदर्भ कदाचित काही मंडळी लावतील, पण त्यात अर्थ नाही. एकूणच नाट्यातील विषयाची मांडणी व एक परिणामकारक नाट्य म्हणून असलेले सादरीकरण हे महत्त्वाचे आहे. यंदाच्या स्पर्धेतील विजेतेपदी पोहचलेले नाट्य म्हणून लक्षवेधी ठरत आहे.
असूरवेद
मूळ कादंबरी – संजय सोनवणी
नाट्य रूपांतर/दिग्दर्शन – सुनील हरिश्‍चंद्र
नेपथ्य – संदेश बेंद्रे
प्रकाश – राजेश पंडित/प्रशांत सावंत
संगीत – विशाल गोळे/कल्पेश पाटील
रंगभूषा – उदयराज तांगडी
वेशभूषा – समीर पेणकर
निर्मिती – महानगरपालिका कर्मचारी संघटना
संस्था – कलासाधना -

(दै. सामनामधील परिक्षण)