Monday, July 25, 2016

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)


वैदिकांना याची एवढी निकड का?

Posted: 24 Jul 2016 07:09 PM PDT

सिंधु-घग्गर संस्कृती ही वैदिक आर्यांचीच निर्मिती हे सिद्ध करण्यासाठी काय उपद्व्याप चालले आहेत हे पाहिले तर थक्क व्हायला होते. सिंधू संस्कृतीची लिपी वाचल्याचे व ती वैदिक संस्कृती असल्याचे अनेक दावे केले गेले. एन. एस. राजाराम व एन. झा यांनी असाच दावा करत एक ग्रंथही लिहिला. त्यात त्यांनी २००० मुद्रांचे वाचन केल्याचे दाखवत काही मुद्रांवर वैदिक राजा सुदास, यदु, पुरु, कुत्स, राम आदींचा तसेच षडागमांचाही उल्लेख आहे तर बहुसंख्य मुद्रांवर नद्यांचे तर काही ऐहिक सामान्य उल्लेख आहेत असा दावा केला. याच ग्रंथात लेखकद्वयाने सिंधू संस्कृतीला घोडा माहित होता हे दाखवण्यासाठी एका बैलाचे चिन्ह असलेल्या मुद्रेच्या छायाचित्रावर संगणकीय छेडछाड (forgery) केली. ही बनावटगिरी करण्याचे कारण म्हणजे सिंधू संस्कृतीत घोडा असल्याचा एकही पुरावा नव्हता आणि वैदिक आर्यांचे संपुर्ण जीवन तर घोड्यांभोवती फिरते! त्यामुळे सिंधू संस्कृतीत घोड्याचे अस्तित्व होते हे दाखवण्याची त्यांना निकड होती. त्याशिवाय सिंधु संस्कृती वैदिकांची निर्मीती हे कसे सिद्ध करणार?

हे दावे वृत्तपत्रांत व पुस्तक (The Deciphered Indus Script-1999) प्रसिद्ध झाल्यावर जगभर खळबळ उडाली. कारण या शोधाने सिंधू संस्कृतीचा इतिहास नव्याने लिहिणे भाग होते. जगातील एका प्राचीन संस्कृतीची लिपी वाचणे हे असामान्य कार्य होते यात शंका नाही. पण राजाराम आणि झा यांचे दुर्दैव. हार्वर्डचे इंडोलोजिस्ट मायकेल विट्झेल आणि त्यांचे सहयोगी स्टीव्ह फार्मर यांनी झा व राजाराम यांची बदमाशी फ्रंटलाईनमद्ध्ये (आक्टोबर २०००) लेख लिहून उजेडात आनली. या लेखात त्यांनी वैदिकवाद्यांच्या बनावटगिरीवर कठोर टीका केली. राजाराम व झा यांनी मुळच्या तुटलेल्या अर्धवट एकशिंगी बैलाच्या (Unicorn) मुद्रेला संगणकीय आधार घेत पुर्ण करत तो बैल घोडा असल्याचे कसे दाखवले आहे हे त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले. (http://www.frontline.in/static/html/fl1720/17200040.htm या लिंकवर हा लेख उपलब्ध आहे.) यामुळे भारतीय विद्वत्तेची जगभर लाज निघाली.

प्रश्न हा कि सिंधू संस्कृतीचे निर्माते हे वैदिक आर्य हेच होते हे सिद्ध करण्याची निकड वैदिकवाद्यांना का भासते? त्यासाठी बोगस दावे आणि चक्क फोर्ज-याही का केल्या जातात? एतद्देशियांचे (हिंदुंचे) सांस्कृतिक संचित लुबाडत वैदिक सांस्कृतिक स्ववर्चस्वतावाद निर्माण करणे हाच एकमेव उद्देश त्यामागे आहे हेच त्यातून दिसत नाही काय?