Tuesday, October 27, 2015

असुरांकडून देवांकडे!


संजय सोनवणी (Sanjay Sonawani)


Posted: 27 Oct 2015 08:55 AM PDT
वैदिक धर्माचा मुख्य स्त्रोत म्हणजे ऋग्वेद. तो आज ज्या क्रमाने आणि ज्या मंडलांत आपल्यासमोर उपलब्ध आहे त्या क्रमाने मुळात तो रचला गेलेला नाही. आजचा ऋग्वेद दहा मंडलांत असून त्यातील तिसरे ते सातवे मंडल प्राचीन असल्याचे मानले जाते. बाकी मंडले मध्यकालीन व उत्तरकालीन मानली जातात. उदाहरणार्थ दहावे मम्डल उत्तरकालीन आहे. प्रत्येक मंडलातही प्राचीन, मध्यकालीन व उत्तरकालीन दाखवता येतील अशी सुक्ते व मंत्र आहेत. थोडक्यात ऋग्वेद कालानुक्रमानुसार आपल्याला उपलब्ध नाही. शिवाय त्यात विस्मरणात गेलेला/नष्ट झालेला भागही भरपुर आहे. वेदव्यासांनी विस्मरणात जाऊ लागलेली वेदराशी प्रयत्नपुर्वक गोळा करून तिची संगतवार  मांडणी चार भागात केली असे वैदिक परंपरा मानते.

ऋग्वेदाचे रचना सुरू होऊन ती संपायला सरासरी तिनशे ते पाचशे वर्ष लागली असावीत असे विद्वान मानतात. हा धर्म एकाएकी, कोणा प्रेषिताने निर्माण केलेला नसून तो क्रमश: दैविक/कर्मकांडीय पद्धतीने विकसीत होत गेलेला धर्म आहे. ऋग्वेदाला किमान दहा ऋषीकुटुंबातील सुमारे साडेतिनशे मंत्रकर्त्यांनी पिढ्यानुपिढ्या हातभार लावलेला आहे. मुख्य दहा कुटुंबातील ऋषीही एकाच जमातीतून आलेले नाहीत. भृगू, काण्व, अगस्त्य सारखे ऋषी स्वतंत्र धर्म परंपरेतून येत वैदिक परंपरेत आपल्याही परंपरांचे मिश्रण करत सामील झालेले दिसतात. याबाबत सविस्तर चर्चा आपण स्वतंत्र लेखात करु.

मुळात वैदिक धर्माची सुरुवात झाली त्याआधी कोणता ना कोणता धर्म अस्तित्वात होताच. झरथुस्ट्राचा धर्म नवधर्म नसून जुन्या असूर धर्माचे एकेश्वरी प्रकटन होते. हा धर्म देव संप्रदायाच्या विरोधात होता. असूर-मेघा (अहूर-माझ्दा) हाच सर्वश्रेष्ठ पुजनीय तर देव हे वाईट अशी त्या धर्माची झरथुस्ट्राने रचना केली. याचा अर्थ असूर धर्म व देव धर्मही झरथुस्ट्राच्या पुर्वीही विस्कळीत स्वरुपात का असेना विद्यमान होता. दोन्ही धर्मपरंपरांत संघर्षही होता. त्यांची कर्मकांडेही भिन्न होती. याशिवायही इतर अनेक धर्म होते. त्याबद्दलची त्रोटक माहिती अवेस्ता आणि ऋग्वेदातून मिळते. ती माहिती अशी...यज्ञ न करणारे. अन्य व्रत करणारे, इंद्राला देव न मानणारे, लिंगपुजा करणारे अशा लोकांची अस्पष्ट माहिती ऋग्वेद देतो. या लोकांचा द्वेष वैदिक लोक करायचे. अवेस्त्यातही झरथुस्ट्राच्या धर्माचा द्वेष करणारे, अग्नी न पुजणारे, देवांना पुजणारे, तुराण्यांसारखे समाज येतात. तुराणी म्हणजे तूर प्रांतात राहणारे लोक. ऋग्वेदात हेच लोक तुर्वश नांवाने व त्याच अर्थाने येणारे लोक. हे तुराणी झरथुस्ट्राचे प्रकांड शत्रू होते. अनेक युद्धात वैदिक टोळ्यांसोबत हे सामील दिसतात तर दाशराज्ञ युद्धात हे वैदिक टोळ्यांचे शत्रू बनलेलेही दिसतात. झरथुस्ट्राचा अग्नीत जाळ्य़्न खून तुराण्यांनीच केला व त्याचे वर्णन जसे अवेस्त्यात आहे तसेच ऋग्वेदातही आहे.

येथे मुद्दा हा कि देव आणि असूर या दोन विरोधी धर्मांचे प्राबल्य ऋग्वेदापुर्वीही अस्तित्वात होते. सोबत दुसरेही धर्म प्रवाह होतेच. ऋग्वेदात देवधर्म आणि असूर धर्म या दोहोंचे मिश्रण दिसत असले तरी सुरुवातीला वैदिक धर्मावर असूर धर्माचा प्रभाव होता. उदा. ऋग्वेदात आधी असूर वरुण ही देवता सर्वश्रेष्ठ मानली जात होती. ऋग्वेदात वरुणाला वारंवार अत्यंत आदराने "असूर वरुण" असे तर संबोधले जात होतेच पण अग्नी, इंद्र व मित्रालाही "असूर" ही आदरार्थी संबोधने लावलेली आहेत. "जो प्राण देतो, म्हणजे असू: देतो तो असूर" हा असुराचा मुळचा अर्थ. असूर वरूण म्हणजेच अहूर माझ्दा असे विद्वान मानतात. त्याबद्दलचा वाद बाजुला ठेवला तरी ऋग्वेदातच वरुणाचे माहात्म्य घटत ती जागा देव इंद्राने  घेतली. ही ऋग्वैदिक धर्मातील मोठे क्रांती म्हटले तरी चालेल. देव हेच असूर (देवानां असूरा:...) ते असूर दुष्ट हा प्रवास ऋग्वेदातच दिसून येतो. याचे कारण तत्कालीन देव मानणारे विरुद्ध असूर मानणारे या दोन संप्रदायांतील संघर्षात पहावा लागतो.

एकच धर्मात दोन विरोधी मुलतत्वे मिसळत जावीत हे फक्त ऋग्वेदात दिसते. असूर वरुणाचे माहात्म्य घटत इंद्राचे माहात्म्य वाढले. इंद्राचे असूर हे संबोधन गळालेले दिसते. असे असले तरी समकालेन जगात असूर संस्कृती वेगवेगळ्या प्रकारे प्रबळ असल्याचे दिसते. उदाहरणार्थ अस्सिरियन संस्कृती. ही संस्कृती असूर तत्व प्रधान असून राजेही स्वत:ला अशूर हे संबोधन लावून घेत असत. हे असूर संस्कृती पालत असले तरी ते मुर्तीपुजक होते. झरथुष्ट्राच्या अहूर (असूर) संप्रदायाप्रमाने अग्नीपुजक व एकेश्वरवादी अमूर्त दैवत मानणारे नव्हते. ऋग्वेदावरील सुरुवातीचा असूर वर्चस्वाचा भाग गृहित धरला तर ऋग्वैदिक लोकही वेदकाळ सुरु होण्यापुर्वी असूर धर्म/संस्कृतीचेच पाईक होते असे म्हणावे लागते.

अवेस्त्याचा धर्म आणि ऋग्वेदाचा धर्म यातील साम्य म्हणजे हे दोन्ही धर्म मुर्ती/प्रतिमा पुजा मानत नाहीत. "न तस्य प्रतिमा अस्ती" हे यजुर्वेद ठासून सांगतो. यज्ञात दिल्या जाणा-या हवीमार्फत अमूर्त देवतांची पूजा करणे हे दोन्ही धर्मातील मुख्य साधर्म्य.

झरथुस्ट्राचा गाथा (अवेस्त्याचा प्राचीन भाग) आणि ऋग्वेदाच्या प्राचीन रचना या समकालीन आहेत. ऋग्वेद रचना व्हायलाच ३०० ते ५०० वर्ष लागली. हा काळ थोडा नव्हे. या काळात ऋग्वैदिक धर्मातही स्थित्यंतरे घडली. अनेक वेगवेगळ्या टोळ्यांतील लोक या धर्माचे पाठीराखे अथवा शत्रू बनत गेले. दानस्तुती सुक्तांतून याची माहिती आपल्याला मिळते. ज्या टोळ्या पाठीराख्या झाल्या त्यांची दैवतेही ऋग्वेदात सामील होत गेली. त्यांना हवी द्यायचा कि नाही यावरचेही वाद होत ते शेवटी तडजोड करत सामील होत गेले. उदा. अगस्ती हा ऋषी वेदरचनेत नंतर सामील झाला. त्याने जादुटोण्याचे मंत्र निर्माण केले जे ऋग्वेदात काण्वांशिवाय अन्यत्र आढळत नाहीत. अगस्ती हा आर्यच नव्हता असे क्युपर म्हणतो. काण्व हेही मुळचे वैदिक परंपरेतील नाहीत. सुत्र साहित्यात काण्वांना "अ-ब्राह्मण" म्हटले गेलेले आहे, कारण तेही जादूटोण्याचे समर्थक. मरुत आणि रुद्र दैवतांचाही समावेश ऋग्वेदात ही दैवते मानणा-या टोळ्यांमुळे झाला. अगस्ती त्यातील प्रमूख. त्यानेच मरुतांना (वादळाची प्रतीक-दैवते) यांना यज्ञात हवी द्यायचा कि नाही हा वाद मिटवला. (ऋ. 1.165, 1.170 आणि 1.171) भृगुही ऋग्वेदरचनेत सर्वात उशीरा सामील झाले.

याचा अर्थ असा कि ऋग्वेद रचला जात असतांनाच तो अनेक स्थित्यंतरांतून गेला. अनेकविध टोळ्यांनी त्यात सहभाग घेतला.  त्या त्या टोळ्यांची दैवते ऋग्वेदात सामील होत होत ऋग्वैदिक देवतांचे संख्या ६४५ पर्यंत गेली. या काळात रचला गेलेला सर्व ऋग्वेद उपलब्ध आहे असे मात्र नाही. आज उपलब्ध आहे तो संपादित, क्रम बदललेला ऋग्वेद. त्याची भाषाही मुळची उरलेली नाही. पण प्रतिपाद्य विषयाबद्दल खालील मुद्दे स्पष्ट होतात ते असे:

१) ऋग्वेद रचनेआधीही वैदिक लोकांचाही कोणता ना कोणता  धर्म होता. त्याला आपण असूर प्रधान अथवा अन्य दैवते प्रमूख मानणारा  धर्म म्हनू शकतो.
२) हे लोक प्रतिमापुजा करत असावेत जे त्यांनी या धर्माची स्थापना करतांना टाळले व "त्याची प्रतिमा असू शकत नाही" असे म्हटले. याचा अर्थ प्रतिमा पुजकांचाही धर्म होता जो ऋग्वैदिकांनी समूळ अव्हेरला.
३) झरथुष्ट्र असूर धर्माची प्रतिमापुजक विरहित, अग्नीकेंद्रित रचना करत असतांनाच याही धर्माची जवळपास तशीच, पण वेगळ्या पद्धतीने सुरुवात झाली. दोन्ही धर्मातील दुष्ट शक्ती व सृष्ट शक्ती यांची नांवे (विरोधी अर्थाने झाली असली तरी) समान आहेत. ऋग्वैदिक धर्म आधी असूरकेंद्रितच होता, जो नंतर देवकेंद्रित झाला.
४) स्वाभाविकपणेच झरथुस्ट्राचा धर्म व वैदिक धर्म यात संघर्ष निर्माण झाला. त्याचे प्रतिबिंब देवासूर कथांत पडलेले आहे.
५) दोन्ही धर्मांची सुरुवात तत्पुर्वी अस्तित्वात असलेल्या धर्मकल्पनांतुनच झाली. एका अर्थाने दोन्ही धर्म प्राचीन धर्मात सुधारणा घडवनारे होते. सर्वस्वी नवीन नव्हते.
६) हे दोन्ही धर्म अस्तित्वात येत असतांना समकालीन अजुनही अनेक धर्म होते जे स्वतंत्र अस्तित्व प्राचीन इराणमद्ध्ये  (आताचा अफगाणिस्तान धरून) टिकवून होते. त्यांच्यात रक्तपाती संघर्ष वर्चस्वासाठी होत होते. ही युद्धे ऋग्वेदाने व अवेस्त्याने नोंदवलेली आहेत.

याचाच अर्थ असा कि ऋग्वेद-धर्म अचानक निर्माण झाला नाही. त्याची धर्मतत्वे त्याच्या पुर्ण रचनेपर्यंत बदलत राहिली. त्या अर्थाने ऋग्वैदिक धर्माला एकजिनसी म्हणता येत नाही. याला आपण एकाच धर्मातील बहुविधता म्हणू शकतो. या बहुविधतेची कारणे अनेक आहेत व ती दानस्तुतींवरुन स्पष्ट दिसतात. त्यावर आपण नंतर चर्चा करुच. पण वेदांपुर्वी इराणमद्धेही कोणताच धर्म नव्हता व वेदरचनाकारांचाही तत्पुर्वी दुसरा धर्म नव्हता असे मानायचे काही कारण नाही.