संजय सोनवणी (Sanjay Sonawani) |
Posted: 28 Oct 2015 05:43 AM PDT
वैदिक धर्माची सुरुवात एकाच टोळीत/जमातीत झाली नाही. ऋग्वेदाचा व त्यातील दैवतकल्पनेचा विकास हा अनेक टोळ्यांच्या दैवत संकल्पना पण यज्ञकेंद्रित होत एकत्र होत झाला. या ३०० ते ५०० वर्षांच्या काळात वैदिक टोळ्यांचेही आपापसातील संबंध बदलत राहिले. मित्र असलेल्या टोळ्या शत्रू बनत आपासात झगडलेल्या दिसतात. ऋग्वेदात एकंदरीत जवळपास ४८ टोळ्या शत्रू अथवा मित्रभावाने अवतरतात. ऋग्वेद मित्र टोळ्यांचा उल्लेख पंचजन असा करतो, पण या पाच टोळ्या नेमक्या कोणत्या हे कोठेही स्पष्ट नाही. यदू, तुर्वश, अनु, द्रुह्यु आणि पुरू या त्या पाच टोळ्या असाव्यात असा तर्क केला जात असला तरी या टोळ्या एकत्र अथवा आसपास राहत होत्या असे दिसत नाही. उदाहरणार्थ यदू-तुर्वंश यांचा नेहमी एकत्र उल्लेख येत असून या टोळ्या फार दुरुन वैदिकांच्या सहाय्यार्थ येत असत असे उल्लेख मिळतात. शिवाय दाशराज्ञ युद्धात या टोळ्या सुदासाच्या विरुद्ध लढलेल्या आहेत. तुर्वश/तुर्वायण नंतरच्या काळात वैदिक साहित्यात विद्वेषानेच उल्लेखले गेले आहेत. तुर्वश अर्थात तुराणी लोक वैदिकांच्या दृष्टीने नंतर शापित झाले याचे कारण त्यांनी सुदासाविरुद्ध युद्ध पुकारले असे म्यक्समुल्लेरही नोंदवतो.
पर्शुंचीही हीच गत आहे. पर्शु (पर्शियन) टोळ्यांनी वैदिक टोळ्यांना अनेकदा आश्रय दिला आहे. ऋषींना दानेही दिली आहेत. (ऋ. ८.६.४६) परंतू हेही लोक नंतर सुदासाविरुद्ध उभे ठाकलेले दिसतात. फार कशाला, पुरू म्हणवणारी टोळीही सुदासाच्या विरोधात गेली. सुदास हा तुत्सू टोळीचा. बहुदा त्याच्या काळात वैदिक धर्माचा तोच आश्रयदाता होता. त्याने दाशराज्ञ युद्धात या सर्व टोळ्यांचा पराभव केला. खंडण्या वसूल केल्या. या युद्धानंतर पुरुंचाही उल्लेख वैदिक साहित्यातून गायब होतो. शतपथ ब्राह्मण तर पुरुंना राक्षस व असूर म्हणुन निंदते. महाभारतात पुरुचे नांव अवतरते, पण टोळीचे म्हणून नव्हे तर ययाती-शर्मिष्ठेचा मुलगा म्हणून. या पुरुचा ऋग्वेदातील पुरू टोळीशी संबंध नाही. पुरू - पौरु हे पुरातन शब्द असून त्यांचा अर्थ पुष्कळ, पुरातन, पहिला माणूस वगैरे होतो. पुरु हे जसे टोळीनाम होते तसेच अनेकांच्या नावातील ते विशेषणही होते, मग ते वैदिक असोत कि अवेस्तन. उदा. पुरुमिळ्ह, पुरु आत्रेय, पुरुहन्म अशी नांवे ऋग्वेदात जशी येतात तशी अवेस्त्यातही येतात. उदा. झरथुष्ट्राच्या वडिलांचे नांव पौरुषास्प होते. पौरु-दाक्ष्ती, पौरु-बंघ, पौरु-चिस्त, पौरु-जिर वगरे पुरु-केंद्रित नांवे अवेस्त्यात अवतरतात. सोल लेव्हिन या भाषाविदाने पुरु-पौरु हे शब्द अतिपुरातन असल्याचे सिद्ध करुन दाखवले आहे. दोहोंचा अर्थ एकच! पुरु एके काळी ऋग्वैदिक धर्माचे आश्रयदाते होते, जसे यदू-तुर्वश वगैरे. परंतू नंतर हे संबंध पुर्ण बदललेले दिसतात. दाशराज्ञ युद्धामागे धार्मिक वर्चस्वतावादाचेच कारण होते असे काही विद्वान मानतात. उदाहरणार्थ हे दाशराज्ञ युद्धातील सुदासशत्रू "अयाज्ञिक" होते असे ऋग्वेदच सांगतो. शिवाय या दहापैकी पाच टोळ्या आर्य तर पाच अनार्य होत्या असेही नमूद आहे. येथे आर्य हा शब्द वंशवाचक नही हे स्पष्ट आहे. अग्नीपुजक लोक हे आर्य होते तर अन्य व्रत करणारे, इंद्राला अथवा देवांना न मानणारे ऋग्वैदिक लोकांच्या दृष्टीने अनार्य होते. तुर्वश हे सुरुवातीच्या काळात देवाच्या बाजुने होते. म्हणून ते वैदिक टोळ्यांचे मित्रही होते. तुर्वंश लोकांनीच झरथुष्ट्राचा खून केला हाही इतिहास आहे. ही घटना दोन्ही धर्मग्रंथांत नोंदली गेलेली आहे. हेच तुर्वश नंतर ऋग्वैदिक सुदासाच्याही विरुद्ध अन्य टोळ्यांबरोबर उभे ठाकले हाही इतिहास आहे. मग झरथुष्ट्राच्या मृत्युनंतर तुर्वश, अनू वगैरे टोळ्यांच्या धर्मभावनांत काही बदल झाला का? कि या युद्धाचे कारण धार्मिक नसून सर्वस्वी राजकीय होते? ऋग्वेद याबाबत काही भाष्य करत नाही. ही घटना झरथुष्ट्राच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी झालेली असल्याने अवेस्ता तर या युद्धाचा उल्लेखही परत नाही. असे असले तरी ऋग्वैदिक धर्माचा विकास सहजासहजी झाला नाही. ऋग्वेदरचना सलग चालू राहिली असेही दिसत नाही. सुरुवातीला ऋग्वैदिक धर्म यज्ञकेंद्रित असला तरी त्यातील कर्मकांडेही साधी होती. त्यांत अवडंबर नव्हते. ब्रह्मन, क्षत्र व विश हे शब्द अवतरत असले तरी ते वर्णवाचक नव्हते. मंत्रकर्ता कोनीही असो तो त्याक्षणी ब्राह्मण असे तर लढावे लागे तेंव्हा तो क्षत्रीय असे. विश म्हणजे ग्रामीण वसाहती व त्यात राहणारे लोक. अशी रचना अवेस्त्यातही होती. उदा. ब्राह्मण शब्दाऐवजी अग्नीपुजा करणारा तो अथ्रवण. योद्धा असेल तो रथेस्ट्रा. बाकी लोक दास. पण हे जन्माधारित नव्हते. याचे कारण म्हणजे ऋग्वैदिक धर्म हा टोळ्यांनी निर्माण केलेला धर्म. लोकसंख्याच मुळात मर्यादित होती. त्यात कर्मप्रधान अथवा जन्मप्रधान कायमचे वाटप करता येणे सर्वस्वी अशक्य होते. शिवाय या धर्माला आश्रय देणा-या टोळ्याही काळानुसार बदलत गेल्या. झरथुष्ट्राचा धर्म नंतर राजाश्रय मिळत गेल्याने झपाट्याने पसरतही गेला. अशा स्थितीत या धर्माचा निभाव लागणे प्राचीन इराणात सोपे राहिलेले नव्हते. त्या स्थित्यंतराकडे आपण नंतर जावू. पण ऋग्वैदिक काळात हा धर्म तुलनेने अत्यंत साधा होता हे येथे लक्षात घेऊ. इतर वैदिक संस्कारांपैकी फक्त तीन संस्कार या काळात जन्माला आलेले दिसतात. ऋग्वेदातील तत्वज्ञानही प्रचंड विरोधाभासने भरलेले दिसते. आधी श्रेष्ठ असनारा असूर वरून आपले स्थान गमवत इंद्र श्रेष्ठस्थानी पोहोचलेला दिसतो. वैदिकांना रुद्र, मरुत, विष्णू, भारती वगैरे शेकडो नवीन देवता सामाविष्ट कराव्या लागलेल्या दिसतात. आणि याच वेळेस देव विविध असले तरी अंतता: त्या एकच आहेत असे तात्विक समाधानही करून घ्यावे लागल्याचे दिसते. यात वैदिक ऋषींतील आंतरसंघर्षही डोकावत राहतो. अगस्त्याने मरुत व इंद्र यांच्यातील हवीचा फार मोठा संघर्ष कसा सोडवला याचे विवेचन मागील लेखात मी केलेलेच आहे. प्रदिर्घ काळात विविध मनोवृत्तीच्या व विविध धर्मांची पार्श्वभुमी असलेल्या लोकांनी बनवलेल्या धर्मात हा आंतरिक संघर्ष असणे स्वाभाविकच आहे. आता हा प्रश्न पडतो कि प्राचीन इराण (दक्षीण अफगाणिस्तान) येथे अशी काय स्थिती उद्भवली कि वैदिक धर्माला अन्यत्र आश्रय शोधावा लागला? अनेक विद्वान आर्य आक्रमण अथवा सामुहिक विस्थापनामुळे वैदिक धर्म भारतात आला असे मानतात, ते खरे आहे काय? काही लोक वैदिक धर्म भारतातच स्थापन झाला असे म्हणतात, त्यांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे? वैदिक वंशावळ व महाभारतातील वंशावळ का जुळत नाही? अनेक प्रश्न आहेत. पण आपण एकामागून एक प्रत्यक प्रश्नाचा विचार करुयात! |
You are subscribed to email updates from संजय सोनवणी (Sanjay Sonawani). To stop receiving these emails, you may unsubscribe now. | Email delivery powered by Google |
Google Inc., 1600 Amphitheatre Parkway, Mountain View, CA 94043, United States |
No comments:
Post a Comment