संजय सोनवणी (Sanjay Sonawani) |
Posted: 23 Nov 2015 07:19 PM PST
आताच्या महाराष्ट्रात उदयाला आलेले परंतु उत्तरेत गुजरात, मध्यप्रदेश ते खाली दक्षीणेत महाराष्ट्रासहित कर्नाटक, गोवा आणि आंध्रापर्यंत साडेचारशे वर्ष एवढा प्रदिर्घ काळ सत्ता गाजवणारे एकमेव घराणे झाले, ते म्हणजे सातवाहन घराणे. इसवीपुर्व २३० मद्धे हे घराणे उदयाला आले. जुन्नर ही त्यांची पहिली राजधानी होती. सिमुक (किंवा सिंधुक) सातवाहन हा या घराण्याचा संस्थापक मानला जातो. तत्कालीन काण्व राजांचा पराभव करून त्यांनी महाराष्ट्र व मध्य भारतावर आपली सत्ता कायम केली. त्यापुर्वी ते काण्व राजांचे महाराष्ट्रातील मांडलिक असावेत असे पुराणे सुचवतात. डा. अजय मित्र शात्री यांच्या मते ते मौर्य घराण्याचे महाराष्ट्रातील राज्यपालही असू शकतील. ही सत्ता साडेचारशे वर्ष टिकली. भारतात एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवणारे दुसरे घराणे झाले नाही. मध्य आणि दक्षीण भारताच्या संस्कृतीवर कधीही न पुसणारा परिणाम या घराण्याने केला. महाराष्ट्राची आजच्या संस्कृतीचा पाया सातवाहनांनी घातला असे म्हटले तर अतिशयोक्ति होणार नाही. कोण होते हे सातवाहन? पुराणांत त्यांना "आंध्र" असे म्हटले आहे. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा भारतातील पौंड्र, मुतीब, शबर ई. जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. मुळचा हा पशुपालक समाज. महाभारतात औंड्रांना पौंड्रांसमवेत असूर राजा महाबळीचा पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र समाज दक्षीणेत पुरातन कालापासून वावरत होता. आजचे ऒडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरुनच पडलेली आहेत, यावरुन या समाजाचा व्यापक विस्तार ल्क्षात यावा. मावळालाही "आंदर मावळ" (औंड्र...ओंडर...आंदर...मावळ) असे म्हटले जाते. सातवाहनांची पहिली राजधानीही याच प्रदेशात असल्याने हा "आंदर मावळ" शब्दही आंध्र-औंड्र याचाच अपभ्रंश असावा असे म्हटले तर वावगे होणार नाही. आंध्रांच्या अनेक शाखा होत्या. काही ओडिसात, काही आंध्रात तर काही महाराष्ट्रात प्राचीन काळापासून वसल्या असाव्यात. आंध्र नांवामुळे सातवाहन कुळ हे मुळातील आंध्र प्रदेशातील असावे असा बहुतेक विद्वानांचा समज होता. पण पुराणांनी त्यांचा उल्लेख आंध्र जसा केलाय तसाच "आंध्र जातीय" असाही केला आहे. आंध्र जातीय म्हणजे आंध्र कुलीय, त्या प्रदेशातीलच मुळचा असा नव्हे असा तर्क काही विद्वानांनी दिला आहे. आणि असे असले तरी आपल्या प्रतिपादनात प्रत्यवाय येण्याचे कारण नाही कारण आंध्र प्रदेशही औंड्र समाजानेच शासित केलेला प्रदेश असल्याने व ओरिसातही त्यांचे वास्तव्य असल्याने एखादी शाखा प्राचीन काळीच महाराष्ट्रातही वसली असल्यास आश्चर्य नाही. महाराष्ट्रात सातवाहन पुरातन काळापासून वसले असल्याचा पुरावा म्हणजे सातवाहनांचे आरंभीचे सारे शिलालेख हे जुन्नर, पैठण व नाशिक प्रांतातच सापडलेले आहेत. पौंड्र जसे बंगाल-ओरिसातही होते तसे ते महाराष्ट्रातही होते हे आपण श्री विठ्ठलाच्या संदर्भात पाहिलेलेच आहे. या औंड्र लोकांचे मुलस्थान ओडिसा असण्याची शक्यता अधिक आहे कारण यांना महाभारतात राजा बळीचे पुत्र म्हटलेले आहे. पशुपालक असल्याने त्यांचे दक्षीणेकडे पांगणे व नंतर त्या त्या भागात स्थायी होणे स्वाभाविक आहे. सनपुर्व चवथ्या -पाचव्या शतकानंतर ते सनपुर्व दुस-या शतकाच्या काळात महाराष्ट्र व आंध्रात मेंढपाळ लोकांचेच मोठ्या प्रमाणावर वास्तव्य होते. शेती अजून फारच प्राथमिक अवस्थेत होती व फक्त नद्यांच्या काठांवरच होत होती असे पुरातत्वीय पुरावे उपलब्ध आहेत. यासाठी आपल्याला महापाषाणयुगाचा आधार घ्यायला लागेल. महापाषाणयुग ताम्रपाषाण युगाच्या अस्ताच्या काळात (सनपूर्व १२००) महारष्ट्रात शुष्क हवामानाचा काळ सुरू झाला. पर्जन्यमान खूप घटले. आद्य शेतक-यांच्या ज्याही काही थोडक्या वसाहती होत्या त्याही निर्मनुष्य झाल्या. तरीही शेळ्या-मेंढ्या घेऊन निमभटके धनगर महाराष्ट्रात तग धरून राहिले. इसपू आठव्या शतकाच्या आसपास महाराष्ट्रात पाषाणयूग अवतरले. या काळाचे सर्व पुरावे मध्य भारत व दक्षीण भारतात मोठ्या प्रमानावर मिळून आलेले आहेत. खानदेश, विदर्भ व माराठवाड्यांतील पुरावे महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. या काळाला महापाषाणयुग म्हणण्याचे कारण म्हणजे या लोकांनी बांधलेली थडग्याभोवतीची मोठ्या शिळांची वर्तुळे. ही विशिष्ट प्रकारची दफनपद्धती होती. यात प्रेतास अथवा त्याच्या अस्थिंना खड्ड्यात पुरले जाई व सोबत अनेक मातीच्या भांड्यांतून मृतासाठी अन्नपाणी ठेवले जाई. याखेरीज कु-हाडी, तलवारी, भाले, घोड्यांचे अलंकारही पुरले जात व थडग्याभोवती शिळांची वर्तुळाकार रचना करण्यात येई. या शिलावर्तुळांच्या आसपास या लोकांच्या काही तात्पुरत्या वसाहतीही सापडलेल्या आहेत. नायकुंड येथे गोल झोपड्यांचे अवशेष मिळाले असून त्यामुळे महापाषाणयुगातील लोक गोल झोपड्यांमध्ये राहत असावेत असे मत अजय मित्र शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.. झोपडीच्या आतल्या बाजुस दोन मोठे खड्डे सापडले असून त्यात शेळ्या-मेंढ्या, हरिणांची अर्धवट जळकी हाडे सापडलेली आहेत. मानववंश शास्त्रज्ञांच्या मते स्थिर लोकांची प्रवृत्ती ही आयताकृती घरे बांधण्याची असते तर अस्थिर-निमभटके लोक गोलाकार घरे बांधतात असे डा. म. के. ढवळीकर यांनी नोंदवलेले आहे. (महाराष्ट्र राज्य ग्यझेटियर; इतिहास-प्राचीन काळ, खंड १, पान १००) शेळ्या-मेंढ्यांचे अवशेष आणि निमभटक्या लोकांना साजेशा गोलाकार झोपड्या सापडणे, घोड्यांचीही दफने सापडने यावरुन हे सिद्ध होईल कि सनपुर्व आठव्या शतकापासून महाराष्ट्रात धनगरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर होते तर स्थिर वसत्यांचे प्रमाण नगण्य होत गेले होते. ढवळीकर म्हणतात, "महापाषाणयुगीन लोक फक्त पावसाळ्यापुरते एका ठिकाणी वसती करुन राहत. उरलेल्या आठ महिन्यात मात्र भटके जीवन जगत असावेत. कारण उदरनिर्वाहासठी ते पशुपालन व मेंढपालनावर अवलंबून होते." यावरुन हे स्पष्ट होते कि महाराष्ट्र तसेच आंध्र या काळात निमभटक्या मेंढपाळांनी व्यापलेला होता. नागर संस्कृतीने पुन्हा बस्तान बस्तान बसवायला सनपुर्व तिनशेपर्यंत वेळ घेतला असला तरी प्राबल्य हे मेंढपाळांचेच होते. त्यामुळे स्थानिक सत्ताही त्यांच्याच असणे स्वाभाविक आहे. दफनांची ही वैशिष्ट्यपुर्ण संस्कृती त्यांनी प्राकृतिक उत्पातामुळे केली असली तरी ती नंतर त्यांनी सोडून दिली. पाषाणदैवते मात्र कायम राहिली. सातवाहन नांव सातवाहन हे नांव कसे व कोठून आले याबाबत विद्वानांनी खूप वाद घातला आहे. सातवाहन हे घराणे नंतर सातकर्णी नांवानेही ओळखले जाऊ लागले. शिलालेखांत या वंशाचे नांव सादवाहन, सदकनी असेही आले असे असून संस्कृत ग्रंथांत सातवाहन, सातकर्णी, शातवाहन असेही आले असले तरी या नांवाची व्युत्पत्ती काय हे मात्र कोडेच आहे असे डा. अजयमित्र शास्त्री म्हणतात. वाहने वाटतो म्हणून सातवाहन असे जसे म्हटले जाते तसे जे. प्रिझलुक्सी यांच्या मताप्रमाणे "सादम" या मुंड भाषेतील शब्दावरुन हा शब्द आला आहे व त्याचा अर्थ घोडा असा होतो. अशा अनेक व्युत्पत्त्या शोधायचा प्रयत्न राजवाडेंपासून के. गोपालाचारींनी केला असला तरी या नांवाची उत्पत्ती लागलेली नाही. कारण सर्व विद्वानांनी संस्कृतात या शब्दाचा अर्थ शोधायचा प्रयत्न केला आहे. इसवीसनापुर्वी मुळात संस्कृत भाषाच तयार झालेली नव्हती तर संस्कृतात त्याची उत्पत्ती सापडेल कशी? (पहा- भाषेचं मूळ-संजय सोनवणी) वा. वि. मिराशी म्हणतात कि, सातवाहन हेच मुळचे नांव असून त्याची व्युत्पत्ती काहीही असो. या वंशनामाच्या इतर व्युत्पत्त्या काल्पनिक आहेत. (सातवाहन आणि पश्चिमी छत्रप) सातवाहन या शब्दाचे मूळ आपल्याला प्राकृतातच व जसे आहे तसेच स्विकारावे लागते. सादकणीचे कृत्रीम रूप संस्कृतात सातकर्नी करुन "सात कानांचा असा अर्थही कसा चुकीचा होतो असे विद्वानांनीच मान्य केले आहे. थोडक्यात सातवाहन या नांवाचा (जसा महाराष्ट्रातील अनेक आडनांवांचा आज अर्थ लागत नाही.) अर्थ शोधत बसणे निरर्थक आहे. पण सर्वात मोठी कमाल डा. अजय मित्र शास्त्री व वा. वि. मिराशींनी केली आहे. त्यांनी सातवाहनांना चक्क ब्राह्मण ठरवायचा प्रयत्न केला आहे. त्याचेही निराकरण येथे करणे गरजेचे आहे. नाशिकच्या वासिष्टीपुत्र पुलुमावि याच्या शिलालेखात "एकबम्हण" आणि "खतियदपमानमदन" या शब्दांचा त्यांनी "गौतमीपुत्र सातकर्णी हा अनुपम अथवा अद्वितीय ब्राह्मण होता व त्याने क्षत्रियांचा गर्व व अभिमानाचे दमन केले होते." असा घेतला आहे. मिराशींनीही हाच कित्ता गिरवला आहे. सातवाहन ब्राह्मण असते तरी आम्हाला त्यावर आक्षेप नव्हता, पण जे नाही ते कसे स्विकारले जाणार? पहिली बाब ही लक्षात घेतली पाहिजे कि पुराणे सातवाहनांना स्पष्टपणे शूद्र म्हणतात. एवढे मोठे ब्राह्मण राजघराणे असते तर पुराणांनी त्यांना शूद्र म्हणण्याचे धादस केले नसते. उलट महाकाव्ये लिहिली असती. दुसरी बाब म्हणजे "औंड्र" (आंध्र) हे शुद्रच आहेत असे ऐतरेय ब्राह्मणानेही म्हटलेले आहे. महाभारतात त्यांना बळीराजाचे पुत्र म्हणजेच असूर म्हटले आहे. आरंभीच्या सातवाहनांचा नागवंशीयांशी रक्तसंबंध होता हे तिसरा सातवाहन राजा याच्या राणीच्या "नायनिका" (नागनिका) या नांवावरुनही स्पष्ट होते. एवढे सारे असतांना "एकबम्हण" या एकाच ठिकाणी येणा-या एकाच शब्दावरून त्यांना ब्राह्म्कण ठरवायचा प्रयत्न करणे याला मी वर्चस्ववाद करत सांस्कृतिक अपहरणाचा कट म्हणतो. सातवाहन जर वैदिक असते तर सातवाहन या शब्दाचा वैदिक अर्थ लागला असता, पण तो तसा लागत नाही हे आपण पाहिले. ते वैदिक असते तर शिलालेखात त्यांच्या गोत्राचा उल्लेख अवश्य आलाच असता, पण तो येत नाही. दुसरे असे डा. डी. आर. भांडारकर यांनी एकबम्म्हण या शब्दाचा अर्थ "ब्राह्मणांचा रक्षक" असा घेतला आहे. खतिय हा शब्द क्षत्रियांना उद्देशून नसून शक क्षत्रपांना उद्देशून आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. के. गोपालाचारीही या मताशी सहमत आहेत. इतिहासकार शैलेंद्र नाथ सेन आपल्या Ancient Indian History and Civilization ग्रंथात स्पष्टपणे म्हणतात कि सातवाहन राजे सहिष्णू असल्याने त्यांनी बुद्धिष्ट लेण्यांना जशी दाने केली तशीच ब्राह्मणी धर्मालाही आश्रय दिला व स्वत:ला एकबम्म्हण म्हणवून घेतले. (पान १७४) गौतमीपुत्र सातवाहनाने नहपान या शक क्षत्रपाचा उच्छेद करुन गमावलेले साम्राज्य मिळवले होते. हे लक्षात घेता क्षत्रपांना (Xathroi) खतियांचा गर्व उतरवणारा असे सातवाहन म्हणत असतील तर या शब्दाचा अर्थ परशुरामाप्रमाणे क्षत्रियांचा गर्व उतरवणारा असा करुन मिराशी व शास्त्री आपला फुकाचा गर्व वाढवत आहेत हे उघड आहे. या संदर्भात माझा एक लेख महाराष्ट्र टाईम्समधे प्रकाशित झल्यावर रविकिरण साने यांनी सातवाहन ब्राह्मणच या अर्थाची प्रतिक्रिया दिली होती. त्याला मी उत्तर दिले होते. म. टा. ने ते प्रसिधही केले. ते मी येथे त्तसेच्या तसे देत आहे, म्हणजे सांस्कृतिक लबाड्या आजही कशा सुरु आहेत हे तुमच्या लक्षात येईल! "मटा'च्या १ एप्रिलच्या (२०१२) अंकात माझ्या "गौतमीपुत्राच्या विजयाची परंपरा" या लेखावरील श्री. रविकिरण साने यांचा "शककर्ते सातवाहन ब्राम्हणच!" हा प्रतिसाद वाचला. महत्वाचे सर्व पुरावे सोडुन द्यायचे आणि एका शिलालेखातील "एक बम्हण" (साने म्हणतात तसे एक ब्राह्मण" नव्हे. प्रत्त्येक प्राक्रुत शब्दाचे संस्क्रुतीकरण करण्याचा हा छंद बरा नव्हे. शिवाय या शब्दापुढील शिलालेखातील शब्द कालौघात तुटले आहेत त्यामुळे त्यापुढे मुळात काय लिहिले होते हे समजायला मार्ग नाही.) या शब्दाचा अर्थ फारतर "ब्राह्मणांचा संरक्षक" एवढाच घेता येतो, "आपण ब्राह्मण आहोत" असा नव्हे. तसाच घोळ सानेंनी "खतियदपमानदमन" या शब्दाबाबत घातला असून त्याचा अर्थ ते क्षत्रियांचे गर्वहरण करणारा असा लावतात. सातवाहनांनी गर्व उतरवला तो नहपान या शक क्षत्रपाचा पुर्ण पराजय करुन. "खतीय" शब्द येथे क्षत्रियासाठी येत नसून क्षत्रपांना उद्देशुन आहे व ते ऐतिहासिक वास्तवही आहे. साने अजुन पुढे जातात व ते म्हणतात यद्न्य करण्याचा अधिकार हा फक्त ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांनाच होता. त्यांचे म्हणने अर्धवट खरे आहे. मुळात ब्राह्मणांना राजसुय व अश्वमेध यद्न्य करण्याची परवानगी मनुस्म्रुती, याद्न्यवक्ल्य स्म्रुती, नारद स्म्रुती अशा अनेक स्म्रुतींनी दिलेलीच नाही. हे यद्न्य फक्य क्षत्रियांसाठीच राखुन ठेवलेले आहेत. बहुदा सानेंनी स्म्रुत्या कधी वाचल्या नसाव्यात, म्हणुन त्यांचा असा घोळ झाला असावा. त्यामुळे सातवाहन ब्राह्मण होते हा त्यांचा बालसुलभ अट्टाहास पुरा होवू शकत नाही. वास्तव हे आहे कि ऐतरेय ब्राह्मणाने औंड्र, पुंड्र, शबर, मुतीब, पुलिंद ई. पन्नास शुद्र जाती दक्षीणेत राज्य करतात असे स्पष्ट म्हटले आहे. महाभारतात याच जमातींना असुर राजा महाबळीचे पुत्र मानलेले आहे. हा समाज पशुपालकच होता. आजचे धनगर/कुरुब/गोपालक हे त्यांचेच वंशज. पेरिप्लसही त्यांचा उल्लेख "आंड्रेई" ( Andarae) असाच करतो. वायु पुराण, मत्स्य पुराण ते अन्य सर्वच पुराणे त्यांना "आंध्र" व काहींना "आंध्रभ्रुत्य" असेच म्हणतात. हे बहुदा सानेंनी पाहिले नसावे. जर सातवाहन ब्राह्मण असते तर पुराणकारांनी तसे स्पष्ट म्हटले असते व त्यांना डोक्यावर घेत महाकाव्येही लिहिली गेली असती. पण तसे झालेले नाही. त्यामुळे आंध्र राजे (अर्थात औंड्र सातवाहन) हे वैदिक व्यवस्थेने शुद्रच (अवैदिक) मानले होते असे स्पष्ट दिसते. दुसरे असे कि सातवाहनांचे नाणेघाट वगळता सर्वच्या सर्व शिलालेख बौद्ध लेण्यांत आहेत. मुळात जवळपास सर्वच लेण्यांची कामे सातवाहनांनीच सुरु केली, उदारपणे देणग्या दिल्या. मग खरे तर त्यांना आपण बौद्ध धर्मीयच ठरवायला पाहिजे. पण तसे कोणी म्हणत नाही. पण फक्त एका "एक बम्हण" शब्दावरुन सातवाहनांना चक्क ब्राह्मण ठरवण्याचा जोर लावत प्रयत्न करायचा हे मात्र अनाकलनीय आहे. सत्य हे आहे कि तत्कालीन सर्वच राजे हे आजच्यासारखे जातीयवादी नव्हते. ते सर्वच धर्मांना उदारपणे सहाय्य करत. त्यामुळे त्यांनी असंख्य लेण्यांना, जैन धर्मियांना मदत केली तशीच वैदिकांच्या समाधानासाठी काही यद्न्यही केले, एवढाच त्याचा अर्थ होतो. "सालाहण" हा शब्द जसाचा तसा नाशिकच्या लेण्यातील एका शिलालेखात आलेला आहे, त्यामुळे सानेंच्या अद्न्यानाधारित कुतर्कावर मी अधिक भाष्य करत नाही. एनकेन प्रकारेन इतिहासातील सर्वच महनीयांना एक तर मारुन मुटकुन ब्राह्मण ठरवायचे किंवा त्यांच्या बोकांडी ब्राह्मण बसवायचे असले असांस्क्रुतिक इतिहास विघातक उद्योग आता तरी बंद व्हावेत. आता त्यांनी संस्क्रुतबाबत काही अनैतिहासिक विधाने केली आहेत व ते त्यासाठी ऋग्वेदाच्या काळाचा दाखला देतात व संस्क्रुत भाषा पुरातन आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. संस्क्रुत भाषा ही मुळात प्राक्रुतावर संस्कार करत बनवली गेलेली क्रुत्रीम भाषा आहे याबाबत कोणाही विद्वानाचे दुमत नाही. म्हणजेच प्राक्रुत भाषा याच पुरातन ठरतात. प्राक्रुतचा अर्थच "मुळचा" असा आहे तर संस्क्रुतचा "संस्कारित". आता प्रश्न असा कि संस्क्रुत नेमकी बनली कधी? पहिली बाब म्हणजे संस्क्रुत म्हनता येईल अशा (प्राक्रुत-संस्क्रुत मिश्रीत) भाषेतील पहिला शिलालेख मुळात शक छत्रप रुद्रदामनाच्या काळातील, म्हणजे इस. १६० चा आहे. तत्पुर्वीचे भारतभरचे व्रज, मागधी, पाली, माहाराष्ट्री प्राक्रुत, तमिळ ई भाषांतले शिलालेख इसपु 1000 पासुन आढळतात. संस्क्रुतचा एकही नाही. दुसरे असे कि संस्क्रुतमद्धे ताम्रपट, शिलालेख क्रमश: वाढण्याचे प्राबल्य हे इसच्या चवथ्या शतकानंतरचे आहे व हे सर्व लेख ब्राह्मी (क्वचित खरोष्टी) लिपीतील आहेत. संस्क्रुतची स्वत:ची अशी कधीही लिपी नव्हती. आजही नाही. आज जिला आपण देवनागरी म्हणतो ती मुळची नागरी लिपी असून तिला "देव" हा शब्द उत्तरकाळात चिकटवला गेलेला आहे. ऋग्वेद हा मुळ "पर्शियन" भाषेच्या पुरातन रुपात (अवेस्तन) लिहिला गेला होता. हा धर्म भारतात धर्मांतरांच्या माध्यमातून पसरला. ऋग्वेदाचा भुगोल व भाषेतील दुवे या मताशी मेळ खातात. पुढे बौद्ध धर्म वाढतोय हे लक्षात येताच पाली भाषेचे अनुकरण करत (पाली हीसुद्धा क्रुत्रीम भाषा आहे.) वैदिक संस्क्रुत भाषा क्रुत्रीमपणे सर्वच प्राक्रुत भाषांतील शब्द घेत (अगदी द्रवीडी भाषेतीलसुद्धा) बनवली गेली. मुळ ऋग्वेद हा संस्क्रुतात नव्हता याची असंख्य प्रमाणे खुद्द ऋग्वेदातच सापडतात. उपलब्ध ऋग्वेदातील भाषा ही पाणिनीय संस्क्रुतची पुर्वावस्था मानली जाते. पाणिनीने सरासरी इ.स. च्या तिस-या शतकात "अष्टाध्यायी" लिहुन संस्क्रुतचे नियमबद्ध व्याकरण बनवले. रामायण, महाभारत, ते सर्वच पुराणे ही पाणिनीच्या व्याकरणाचे नियम पाळत असल्याने त्यांची संस्क्रुत भाषेतील निर्मिती ही पाणिनीनंतरच्या काळातील आहे हेही उघड आहे. मुळ प्राक्रुत ग्रंथांचे संस्क्रुत भाषांतर नंतर केले गेले. आज आढळणारी सर्वच पुरातन मानली जाणारी महाकाव्ये अंतिम संस्कार होवुन तिस-या-चवथ्या शतकातच तयार झाली याबाबतही विद्वानांत कसलेही दुमत नाही. म्हणजेच ती मुळ अन्य प्राक्रुत भाषांत लिहिली गेलेली होती...जशी गाथा सप्तशती, लीलावती, कथासरित्सागर, सिंहासन बत्तीशी इ. दुसरे असे कि संस्क्रुत हा शब्द खुद्द ऋग्वेदापासुन ते तिस-या शतकापर्यंतच्या ग्रंथांत एकदाही येत नाही. तो येतो सर्वप्रथम रामायणात, ज्याचे अंतिम संस्करण चवथ्या शतकात झाले. पाणिनीही "छंदस"चे व्याकरण लिहित होता...तो स्वत:ही आपण संस्क्रुतचे व्याकरण लिहित आहोत असे म्हणत नाही...विपुल बौद्ध व जैन साहित्यातही "संस्क्रुत" हा शब्द येत नाही. मग ज्या भाषेला चवथ्या शतकापर्यंत स्वतंत्र नांवही नव्हते ती भाषा पुरातन कशी? असती तर अन्य प्राक्रुत साहित्य जसे आपापल्या भाषांचे अभिमानाने उल्लेख करते तसे संस्क्रुत साहित्यातही घडले असते. सत्य हे आहे कि बौद्धांनी धर्मप्रचारासाठी पाली विकसीत केल्यानंतर वैदिक समाजाने संस्क्रुत भाषा तयार करायला सुरुवात केली. संस्क्रुत ही नितांतसुंदर भाषा आहे हे खरे, पण तिचा काळ कसल्याही स्थितीत दुस-या शतकाच्या पलीकडे जावू शकेल असा एकही पुरावा उपलब्ध नाही. सानेंच्या तर्काने आणि व्रुथाभिमानाने संस्क्रुत साठ हजार काय, सहा अब्ज वर्षांपुर्वीही तयार झाली असू शकेल आणि असे म्हणायला काय जाते? ज्याचे पुरावेच अस्तित्वात नसतात त्याबद्दलच अशी विधाने असू शकतात. थोडक्यात सातवाहन ब्राह्मण तर नव्हतेच आणि संस्क्रुतचा उदयही त्यांच्या काळात झालेला नव्हता." मला वाटते, वरील उत्तर सातवाहनांच्या मुळ स्वरुपावर प्रकाश टाकण्यासाठी पुरेसे आहे. याहून अधिक टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही. सातवाहन सत्ता व महत्कार्य सिंधूक अत्य्हवा सिमुख सातवाहनाने काण्वांचे राज्यपालपद धुडकावत स्वतंत्र सत्ता स्थापन केली ती सनपुर्व २२० मद्ध्ये. सातवाहन काळात त्यांचा व्यापार सुदूर इजिप्त, रोम, अरबस्तान ईत्यादि देशांत फैलावलेला होता. भडोच, कल्याण, चेऊल ई. पश्चिम किनारपट्टीतील बंदरांतून मोठ्या प्रमाणात आयात-निर्याती होत. यांच्याच काळात महाराष्ट्रात गिरीदुर्ग आणि लेण्यांची निर्मितीही मोठ्या प्रमानात झाली. व्यापारासाठीचा आजही प्रसिद्ध असलेला नाणेघाट आणि त्याच घाटात असलेल्या गुंफांतील प्रदिर्घ शिलालेख आणि सातवाहनांचे प्रतिमागृह त्यांच्या वैभवाची साक्ष आहेत. केवळ हेच घराणे दक्षीणेत बळकट राहिल्याने उत्तरेत सर्वस्वी सत्ता गाजवणारे कुशाण घराणे दक्खनेत कधीच पाय रोवू शकले नाही. त्यांच्या राजकाळात साहित्य संस्कृतीने वैभवाचे टोक गाठले होते. हालाची "गाथा सप्तशती", गुणाढ्याची "बृहत्कथा", वररुचीचे माहाराष्ट्री प्राकृताचे व्याकरण अशा अजरामर कृती त्यांच्याच काळात लिहिल्या गेल्या. हाल सातवाहनाने आपल्या बलाढ्य आरमारातून श्रीलंकेवर स्वारी करून तेथील राजकन्या लिलावती याच्याशी कसा विवाह केला याचे कल्पनारम्य चित्रण "लीलावई" या काव्यग्रंथात आले आहे. महाराष्ट्रातील आजचे गिरिदुर्ग ही सातवाहनांचीच निर्मिती. रायगड हा मुळचा सातवाहनांनी बांधलेला किल्ला. सातवाहन घराण्यात एकुण तीस राजे झाले. सातवाहन हे आगम (शैव) धर्म पाळत होते त्याचा स्पष्ट उल्लेख नाशिक शिलालेखात "आगमाननिलया", म्हणजे आगम प्रणित धर्म पाळणारे असा येतो. राजांची नांवे शिवश्री, स्कंद, पुलुमावी, शक्तीश्री, सिमुख (सं शिवमुख), शिवस्वाती अशी बव्हंशी शिव-शक्ती वाचकच आहेत. सातवाहनांनी वैदिकांच्या समाधानासाठी यज्ञही केला होता. त्यामुळे वेदिश्री असेही एक यज्ञवाचक नांव येते. एक राणी तर नागणिका (नाग वंशीय) असल्याचेही दिसते. एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवतांना चढ-उताराचेही प्रसंगही येणे स्वाभाविक होते. गौतमीपुत्र सातकर्णी सत्तेवर आला तेंव्हा अशीच बिकट परिस्थिती होती. क्षहरात घराण्यातील शकवंशीय क्षत्रप नहपानाने गौतमीपुत्राच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे करुन माळव्यापासून दक्षिणेपर्यंत असलेली सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली. इतकी की गौतमीपुत्र राजा झाला तंव्हा त्याच्या ताब्यात साताऱ्याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही. कोकण-गोमंतकही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथल्या बंदरांतून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. मध्यभारत ते दक्खनची प्रजा एका अर्थाने गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले. नहपान हा क्षहरात घराण्यातील पश्चिमेवर राज्य करणारा एक क्षत्रप होता. मुळचे हे क्षत्रप कुशाणांचे अधिकारी, पण कुशाणांची सत्ता खिळखिळी झाल्यावर ते स्वतंत्र बनले. इ.स. ३२ मद्धे नहपान सत्तेवर आला. तो अत्यंत महत्वाकांक्षी होता. या काळातील सुंदर, चकोर वगैरे सातवाहन राजे दुर्बळ निघाले. याचा फायदा घेत त्याने सातत्याने स्वा-या करत सातवाहनांचा बहुतेक प्रदेश जिंकुन घेतला. गौतमीपुत्र सातवाहन सत्तेवर आला तेंव्हा सातारा-क-हाड एवढाच भाग त्याच्या स्वामित्वाखाली होता. परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही त्याला उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला. डॉ. अजय मित्र शास्त्री जैन परंपरेचा हवाला देऊन लिहितात, 'गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही.' शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमीपुत्र अभिमानाने नोंदवतो- "खखरात (क्षहरात) वंस निर्वंस करस" एका अर्थाने हा महाविजय होता. परकीय शकांच्या जवळपास तावडीत गेलेले आपले विशाल साम्राज्य गौतमीपुत्राने आपल्या नितांत पराक्रमाने परत जिंकून घेतले. पुढे दिडशे वर्ष या साम्राज्याकडे वाकड्या नजरेने पाहायचे सामर्थ्य कोणात आले नाही. नहपानावरील हा अद्वितीय असा विजय मिळाला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. इसवी सनाच्या ७८ मध्ये ही क्रांती घडली. हा विजयोत्सव प्रजा गुढ्या उभारून साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढीपाडवा. अखिल दक्खनेच्या स्वातंत्र्याचा दिवस. या दिवसापासून गौतमीपुत्राने संवत्सर सुरु केले ते म्हनजे सालाहन (शालिवाहन नव्हे) शक. (ज्या साली शकांचे हनन केले तेंव्हापासून सुरु होणारे संवत्सर) या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. 'तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन' अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली. हा महान वंश सन २२० पर्यंत सत्तेवर होता. जवळपास ४५० वर्ष या वंशाने राज्य चालवले. आजच्या महाराष्ट्राच्या संस्कतीची बीजे तर रोवलीच पण माहाराष्ट्री प्राकृत साहित्यात स्वत:ही मोलाची भर घालत आजच्या मराठीची पायाभरणी केली. महाराष्ट्र म्हणजे सातवाहन. सातवाहनांच्या काळत लोकांवर धार्मिक बंधने नव्हती. जातींची बंधने मुक्त होती. कोणीही कोणत्याही व्यवसायात जाऊ शके. स्त्री-पुरुषांतही केवढी समता होती हे हालाच्या गाथा सप्तशतीवरुन स्पष्ट दिसते. कररचना सौम्य होती. सातवाहनांनी एवढे किल्ले व नगरे उभारली पण स्वत:चे राहणीमान साधे ठेवले. जुन्नर व पैठण या त्यांच्या दोन राजधान्या. पैठणला त्यांनी जागतिक व्यापाराचे केंद्र बनवले. व्यापारी मार्ग बांधले. बंदरे उभारली. बलाढ्य आरमार उभारले. कुशाण सत्तेला विंध्यापाशीच थोपवून धरले. शकांच्या पारतंत्र्यापासून महाराष्ट्राला मुक्त केले. आज महाराष्ट्र सातवाहनांचे उपकार विसरला आहे. हैद्राबाद येथे मात्र गौतमीपुत्र सातवाहनाचा भव्य अश्वारुढ पुतळा आहे...एवढेच! |
You are subscribed to email updates from संजय सोनवणी (Sanjay Sonawani). To stop receiving these emails, you may unsubscribe now. | Email delivery powered by Google |
Google Inc., 1600 Amphitheatre Parkway, Mountain View, CA 94043, United States |