Tuesday, February 9, 2016

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)


व्यास कोण होते?

Posted: 09 Feb 2016 05:07 AM PST

महाभारत हे संपुर्ण महाकाव्य व्यासांनी लिहिले असा समज असला तरी ते खरे नाही. व्यासांनी "जय" नामक काव्य रचले होते व ते ८८०० श्लोकांचे होते. या मुळ काव्यात नेमके काय होते हे आज आपणास माहित नसले तरी त्यात कौरव-पांडवांच्या युद्धाचे वर्णन असावे असा तर्क अनेक विद्वान करत असतात. पुढे त्यात सौती-जनमेजय आणि इतर अनेक अज्ञात कवींनी भर घातली. त्यामुळे त्याचा विस्तार "भारत" ते लक्ष श्लोकांचे "महाभारत" असा झाला. या महाभारतात अनेक प्राचीन आख्याने-उपाख्याने यांची भर पडली असल्याने अनेक प्राचीन समजुती, श्रद्धा व भारतातील विविध गणांतील लोकांमधील संघर्षावर प्रकाश पडतो.

महाभारत खरेच घडले कि ती एक काल्पनिक कथा आहे यावरही विद्वानांत अनेक वाद होत असतात. अ. ज. करंदीकरांसारखे विद्वान तर महाभारत मध्य आशियात घडले असाही तर्क देत असत. सर्वसाधारणपणे महाभारत कथा आजच्या दिल्ली परिसरात कुरु-पांचाल भागात घडली असावी असे मानले जाते. शिवाय रामायणकथा आधीची कि महाभारत कथा हाही एक वाद आहेच.

या लेखात आपल्याला महत्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे व ती म्हणजे भारतकर्ते व्यास. व्यासांच्या नांवावर अठरा पुराणे तर आहेतच पण वेदांचे चार विभाग केले म्हणूण त्यांना "व्यास" अशी संज्ञा मिळाली असे सांगितले जाते. वैदिक परंपरेत अनेक नवीन लेखकांनी आपापल्या (स्वरचित अथवा रुपांतरित) कृतींना स्वत:चे नांव न देता एखाद्या इतिहासप्रसिद्ध व्यक्तीचे नांव कर्ता म्हणून द्यायची एक प्रथा होती. असे केले म्हणजे आपल्या कृतीला जनमान्यता व पावित्र्य लाभेल अशी काहीतरी भावना त्यांच्या मनात असावी. खरे म्हणजे व्यासांची अशी एकही संपुर्ण कृती आज उपलब्ध नाही. जय काव्य हे महाभारतात हरवलेले आहे. सौती-जनमेजयाचेही नेमके काय होते, त्यांनी नेमकी कोणती भर घातली याचाही अंदाज लागत नाही. दुसरे म्हणजे भारत कथा कोणत्याही काळात घडली असेल, सध्याचे आपल्याला उपलब्ध असणारे महाभारत हे तिस-या-चवथ्या शतकात अंतिम संस्करणाच्या अवस्थेत पोहोचले आहे. भारतकथेच्या अलोट लोकप्रियतेमुळे भारतातील अनेक धर्मांनी महाभारतावर आपापले संस्कारही केले आहेत. वेदांचे व्यासांनी चार भाग केले ही तर सर्वस्वी भाकडकथा आहे.

व्यास हे मुळ कवी. त्यांची कृती म्हणजे जय हे आपण पाहिलेच. कोण होते हे व्यास? त्यांच्या जन्माभोवती महाभारतातच अनेक भाकडकथा गोवल्या गेलेल्या आहेत. महाभारताचे एक वैशिष्ट्य असे कि ज्याही थोर माणसाचे जन्मकुळ अथवा जन्मदाता माहित नाही अथवा अवैदिक आहे अशा व्यक्तींच्या जन्माभोवती चमत्कारकथा रचल्या गेलेल्या आहेत. द्रोण, भिष्म, कर्ण, दृष्टधुम्न इत्यादि उदाहरणे या संदर्भात पाहता येतील. चमत्कार वगळत कथांचे परिशिलन केले तर मात्र सत्याच्या थोडेफार का होईना जवळ पोहोचता येते. व्यासांची जन्मकथा आदिपर्व अध्याय ६३ मद्ध्ये येते. त्यावर धावती नजर फिरवून व्यास नेमके कोण होते याचा शोध घेऊयात.

पुरु वंशात एक वसू नांवाचा चेदी प्रांतावर राज्य करणारा राजा होता. शस्त्रांचा त्याग करून त्याने आश्रमात तपाचरण सुरु केल्याने आपले पद जाईल या भितीने इंद्र ग्रस्त झाला. त्याने वसुला पटवले, एक विमान भेट दिले तसेच इंद्रमालाही अर्पण केली आणि तपापासून परावृत्त केले. पुढे हा राजा वसू इंद्राने दिलेल्या स्फटिकमय विमानातच (म्हणजे अवकाशातच) राहु लागला म्हणून त्याला "उपरिचर" हे नांव पडले. एकदा असा चमत्कार झाला कि त्याच्या नगरीजवळुनच वहाणा-या शुक्तिमती नामक नदीला कोलाहल नांवाच्या पर्वताने कामवासनापुर्वक अडवल्याचे त्याच्या लक्षात आले. राजाने पर्वताला लाथ मारुन विवर निर्माण केले व नदीचा मार्ग मोकळा केला. पर्वतसंगामुळे नदीला एक मुलगा व एक मुलगी असे जुळे झाले होते. नदीने प्रसन्न होऊन राजाला दिले. राजाने मुलाला सेनापती बनवले तर मुलीशी लग्न केले. तिचे नांव गिरिका.

ती वयात आल्यावर ऋतूदान द्यायचे त्याच दिवशी पितरांनी त्याला मृगयेस जा अशी आज्ञा केली. तो नाईलाजाने मृगयेस गेला खरा पण सुगंधी पुष्पांनी नटलेल्या अरण्यात  त्याचा कामाग्नी भडकला. अशाच कामविव्हळ स्थितीत अशोक वृक्षाखाली तो बसला असता कामोन्मत्त राजाचे वीर्यस्खलन झाले. आपले अमोघ रेत वाया जावू नये म्हणून त्याने ते द्रोणात धरले व श्येनपक्षा मार्फत आपल्या पत्नीकडे पाठवायची व्यवस्था केली. श्येन पक्षी तो द्रोण नेत असता वाटेत दुस-या श्येनपक्षाशी त्याची झडप झाली. द्रोण यमुनानदीत पडला. नदीत अद्रिका नावाची शापित मत्सी होती. तिने त्या द्रोणातील वीर्य भक्षण केले. पुढे दहा मासांनी त्या मत्सीला धीवरांनी पकडले. तिचे पोट फाडले तर तिच्या उदरातून एक मुलगा व एक मुलगी असे जुळे निघाले. धीवरांनी हा चमत्कार उपरिचर राजाला सांगितला. राजाने मुलाचे नांव मत्स्य असे ठेवले व मुलगी एका नावाड्याला अर्पण केली. अद्रिका मत्सी शापमुक्त होऊन स्वर्गधामी रवाना झाली. मुलीचे नांव सत्यवती असे त्या धीवराने ठेवले, पण मासे धरणा-या कोळ्यांच्या संगतीत रहात असल्याने तिच्या अंगाला मासळीचा वास येत असे.

पुढे पराशर ऋषी तीर्थाटनाच्या निमित्ताने त्या नदीवर आले असता सत्यवतीच्या नावेत पैलतीरावर जाण्यासाठी बसले. सत्यवतीचे लावण्य पाहून ते कामातूर झाले आणि तिला रतिदान मागू लागले. तिचे कौमार्य अभंग ठेवण्याचे, तिच्या शरीराला सुगंध येईल आणि संभोगकाळात अंधार उत्पन्न करण्याच्या अटी पराशरांनी पाळल्या.  सत्यवती गर्भवती झाली. तिला जे अपत्य झाले ते म्हणजे व्यास. त्यांचे आधीचे नांव यमुनाद्वीपात जन्म झाल्याने द्वैपायन असे ठेवले गेले. रंगाने ते काळे-पिंगट असल्याने त्यांना कृष्ण असेही म्हणत. "माझे स्मरण करशील तेंव्हा मी प्रकट होईल" असे वचन मातेला देवून ते तपश्चर्येला निघून गेले. हीच सत्यवती पुढे कुरु वंशातील शंतनु राजाची राणी बनली.

वरील कथा वाचली तर एखाद्या परीकथेची आठवण येणे स्वाभाविक आहे. पण आपण परिकथेतील कल्पना दूर ठेवू. या कथेत उपरिचर राजाला अकारण गोवण्यात आले आहे हे उघड आहे. सत्यवतीचा पिता राजवंशातील होता हे दाखवण्यासाठी हा खटाटोप केला गेला आहे. तसेच व्यासांचा पिताही कोणी ऋषी-मुनी होता असेही दाखवायचा प्रयत्न यातून झालेला आहे. एक बाब लक्षात घ्यायला हवी कि मुक्त लैंगिक संबंधाच्या अनेक घटना महाभारतातच पहायला मिळतात. जेंव्हा कुळ-शीळ आणि स्त्रीयांच्या योनीशुचितेच्या कल्पना बदलल्या त्या काळात अशा प्रत्येक व्यक्तीच्या जन्माभोवती मिथके तयार केली गेली. हे करणेही आवश्यक अशासाठी होते कि खुद्द कुरु वंशात सत्यवतीचा जसा प्रवेश झाला तसाच व्यासांपार्फतच नियोगाद्वारे कुरू वंश विस्तारला. कुरु वंशाची महाराणी धीवर (कोळी) होती व वंशविस्तार करणारा कोळणीचा विवाहबाह्य संबंधांतुन झालेला मुलगा होता हे नंतरच्या नीतिविदांना मान्य होणे अवघड होते. त्यासाठी वरील संपुर्ण कथा रचली गेली हे उघड आहे.

मुळ भारतकथा घडली तो काळ अनेकार्थांनी प्रागतिक होता. लैंगिक संबंधंबाबत समाजबंधने एवढी तीव्र नव्हती. कुंतीही विवाहपुर्व (आणि विवाहानंतरही) पतीशिवाय पुत्र प्रसवू शकली ती त्यामुळेच. अशी असंख्य उदाहरणे (चमत्कार कथा वगळल्या तर) महाभारतातच दिसतात. सत्यवती मत्सीच्या पोटी जन्मू शकत नाही. एवतेव ती कोळ्याचीच मुलगी होती आणि व्यासांचा जन्म (पिता अनाम असला तरी) कोळणीच्या पोटी झाला जी नंतर कुरु राज्याची राणी बनली हे वास्तव आहे. जाती तेंव्हा आजच्यासारख्या नव्हत्या. प्रतिभा कोणाही व्यक्तीत असते हे मान्य करायचा तो काळ होता. वैदिक वर्ण-माहात्म्य तेंव्हा प्रस्थापित नव्हते. स्मृतीकाळ तर यायचाच होता. नंतरच्या काळात महाभारतावर वैदिक संस्करने झाली असली तरी ते करतांना मुळ सर्वस्वी बदलता येणे शक्य नव्हते. यातुन सुटका करुन घेण्यासाठी लढवली गेलेली युक्ती म्हणजे चमत्कारकथा निर्माण करत व्यास-द्रोणादिकांचे पितृत्व तथाकथित उच्चकुलीन व्यक्ती/देवता/अप्सरादिंना देण्यात आले व त्यांचे मुळ वास्तव धुसर करुन टाकले. त्याचा भारतीय समाजजीवनावर केवढा दुष्परिणाम झाला आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. 

No comments:

Post a Comment