संजय सोनवणी (Sanjay Sonawani) |
Posted: 29 Nov 2015 09:59 PM PST
शबरीमला या दक्षीणेतील विख्यात मंदिर सध्या चर्चेत आले आहे ते, "जोवर स्त्रीयाना त्या मासिक पाळीत आहेत कि नाही हे तपासण्याचे स्क्यनर बनत नाहीत तोवर मंदिरात स्त्रीयांना प्रवेश नाही." या वादग्रस्त विधानामुळे. हे विधान केले मंदिर व्यवस्थापन समितीचे प्रमूख प्रयार गोपालकृष्णन यांनी. ते पुढे असेही म्हणाले कि मासिक धर्म स्त्रीयांना अपवित्र करतो आणि पवित्र मंदिरांत त्यांना प्रवेश देता येणार नाही. यामुळे वादंग उठले असून निकिता आझाद या विस वर्षीय तरुणीने ""Happy to bleed" हे आंदोलन सुरू केले असून आजवर असंख्य स्त्रीयांनी या आंदोलनात उडी घेतली आहे. स्त्रीयांचा मासिक धर्म हे वरकरणी कारण असून अय्यप्पा ब्रह्मचारी होते आणि शबरीमला येथे त्यांनी तप केले असल्याने स्त्रीदर्शनाने त्यांचा तपस्याभंग होऊ नये म्हणून (मेनकेने विश्वामित्राचा केला तसा) तेथे स्त्रीयांना प्रवेश नाही. यावर आपण अधिक चर्चा पुढे करुच, पण स्त्रीयांचा मासिक धर्म आणि त्यामुळे प्रार्थनास्थळ प्रवेशबंदी कोठे कोठे आहे हे पाहू.
भारतात सबरीमला, हाजी अली, जामा मशिद, पद्मनाभय्य मंदिर, पुष्कर येथील कार्तिकेय मंदिर, निजामुद्दिन दर्गा इत्यादि धर्मस्थळांत स्त्री प्रवेश बंदी आहे. अलीगढ विद्यापीठाच्या ग्रंथालयातही विद्यार्थिनींना बंदी आहे, पण त्याचे कारण मनोरंजक आहे. मुली ग्रंथालयात आल्या कि विद्यार्थी अभ्यासात लक्ष घालणार नाहीत म्हणून बंदी...हा असला विनोदी प्रकार आहे. मुस्लिम बंदी घालणारे म्हणतात कि शरियातच ही तरतूद आहे तर हिंदू म्हणतात...धर्मशास्त्रांतच हे लिहिलेले आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बंद्या भारतात अनेक धर्मस्थळांत अंमलात आणल्या जातात हे आपणास माहितच आहे. मासिक धर्मामुळे स्त्री अपवित्र होते अशी समजूत यामागे आहे हे उघड दिसते. वरकरणी कारणे काहीही सांगितलेली असोत. यातून आपण स्त्रीयांचाचा अधिक्षेप करतो, धर्माच्या नांवाखाली निसर्ग-धर्माला पायतळी तुडवतो याचे भान मात्र आपल्याला आलेले नाही. यासाठी आपल्याला पुरातन काळापासून स्त्री, तिची मासिक पाळी आणि तिचा अपत्यजन्म देवून मानवी वंश साखळी अबाधित ठेवण्याच्या सामर्थ्याबाबत कसकसे विचार बदलत गेले हे पाहणेही उद्बोधक तसेच मनोरंजकही आहे. मनुष्य जेंव्हा नुकताच कोठे भुतलावर अवतरला होता व निसर्ग व अन्य पशुंच्या प्रकोपात कसाबसा जगायचा प्रयत्न करत होता त्या काळात स्त्रीयांकडे तो कोणत्या दृष्टीने पाहत होता? तिचा मासिक धर्म, तिने अपत्ये प्रसवणे ही बाब त्या काळातील मानवासाठी अद्भूत चमत्काराहून कमी नव्हती. महिन्यातील काही दिवस स्त्रीया रज:स्त्राव करतात आणि पुर्ववत होतात किंवा गरोदर होऊन अपत्य प्रसवतात या तिच्या शक्तीला आदिमानवाने देवत्व दिले. कारण असे का होते याचे असलेले स्वाभाविकच गहन अज्ञान. जगभरात आधी सुरू झाली ती स्त्रीपुजा. योनीपुजा. तिच्यात यातुशक्ती असाव्यात व ती आपल्याला जशी उपकारक अहे तशीच अपायकारकही असू शकते यामुळे स्त्री हे त्याच्यादृष्टीने गुढ-भयाचा सम्मिश्र विषय बनला. त्याला तोवर अपत्य जन्मात आपलाही सहभाग असतो हे माहितच नव्हते. चंद्रकला आणि नियमित येणारा मासिक धर्म यामुळे त्यांनी अपत्य जन्माचा संबंध चंद्राशी लावला. आपण आता चंद्र हा स्त्रीचा भाऊ आहे असे मानतो, पण पुरातन समाज हा चंद्र अपत्यला जन्म घालतो (म्हणजे तिचा पती) असा लावला गेला. भारतातील "चंद्रवंश" ही समजूत त्यातुनच निघाली. उत्खनने आणि पुरातन गुहाचित्रातून ५०-६० हजार वर्षापुर्वीच्या माणसाचे लिखित नसले तरी समजुतींचे वस्तु-चित्ररूप दर्शन घडवते. सिंधू संस्कृतीत मातृदेवतांचे व तिच्या सामर्थ्याचे दर्शन घडवते. स्त्रीयोनीतून निघालेल्या पिंपळाचे चित्रण स्त्रीच्या प्रसवक्षमतेचे कसे उदात्तीकरण होते हेही दर्शवते. भारतात संभोगोत्सूक स्वरुपाची, शिर्षाच्या जागी कमळे असलेली पण ठळक योनी व स्तन दाखवणा-य मृण्मुद्रा आणि पाषाण शिल्पे विपूल प्रमानात तर आहेतच पण गांवदेवीच्या स्वरुपात जवळपास सर्व खेड्यांत स्त्रीमहत्तेचे अस्तित्व सापडते. किंबहुना मातृसत्ता आरंभीच्या काळत जगभरात पाळली जात होती असे पुरावे मिळतात. पुरातन काळात स्त्रीया पुरुषी कार्यात भाग घेतही असल्या तरी तो सीमित होता. किंबहुना तो सीमित ठेवला गेला तो या तिच्याकडे पाहण्याच्य गुढमिश्रीत श्रद्धाभावामुळे. बहुप्रसवा स्त्री ही टोळीचे वैभव मानली जात होती, कारण टोळीची लोकसंख्या त्यामुळेच वृद्धींगत होऊन टोळीसामर्थ्यही त्यामुळे वाढेल ही भावना त्यामागे असणे स्वाभाविक आहे. समाजेतिहास तज्ञ म्हणतात कि शेतीचा शोध स्त्रीने लावला. त्यात तथ्य आहे कारण तिला निरिक्षण करत फेकलेल्या बिया कशा उगवतात हे पाहण्याची अधिक संभावना होती. आधी सुरू झली ती फिरती शेती. नंतर मानूस जलाशय-नद्या-ओढे यांच्या काठी स्थिर शेती करू लागला. आधी स्त्री ही टोळेचे मालमत्ता असे. शेतीच्य शोधाने मालकीहक्क व वंशसातत्याची कल्पना आली. किबहुना स्त्री-स्वातंत्र्य लयाला घालवणारी ही घट्ना होती. आपण शेतीत बीज पेरतो तेंव्हा पीक होते हे ज्ञान आपलाही अपत्यजन्मात सहभाग आहे कारण आपण आपले बीज योनीत पेरतो हे ज्ञान माणसाला झाले. वारसाहक्काच्या कल्पनेतून मग माणसाने विवाहसंस्थेला जन्म घातला. ही व्यवस्था सैल होती. बहुपतीकत्व जसे लागू होते तसे बहुपत्नीत्वही आरंभी लागू होते. महाभारतात आपण नियोग प्रथा, बहुपतीकत्वाचे अवशेष द्रौपदीच्या रुपात पाहू शकतो. भारतात वैदिक धर्म आणि शैवप्रधान धर्माच्या धारा आहेत हे आपण जाणतोच. वैदिक धर्म येण्यापुर्वी सिंधुपुर्व काळापासून भारतात ,लिंग आणि योनीपुजा सुरू होती याचे अवशेष आपल्याला प्राप्त आहेत. पुढे स्त्री-पुरुष यांत एकात्मता प्रस्थापित करत लिंग आणि योनी संयुक्त स्वरुपात शिवलिंग या प्रतीक रुपाने सुरु झाली. या धर्मात स्त्रीमाहात्म्य व समता याचा परिपाक या प्रतीकातून दिसतो. शैव-शाक्त संप्रदायांनीही शक्ती (स्त्री) तत्वालाच जगन्माता मानत तिची आराधना प्राधान्याने केली. तंत्रांची निर्मिती शिवाने केली अशी श्रद्धा आहे. प्रस्तूत लेखाच्या दृष्टीने महत्वाची बाब म्हणजे यात रज:स्वलेला अनन्यसाधारण महत्व आहे. रज:स्त्रावाचा उपयोग यात्वात्मक क्रिया साधण्यासाठी केला जात असे. स्त्री रजोकालात अपवित्र नव्हे तर पवित्र व साधनेचे साधन मानली जात होती. पुरातन काळी स्त्रीला किती महत्व होते हे आपण शैवांच्या/शाक्तांच्या आजही अवशिष्ट राहिलेल्या परंपरांतून पाहू शकतो. शक्ती (स्त्री) ही पृथ्वी व अवकाश हे शिव तर पर्जन्य म्हणजे त्याचे वीर्य. या संगमातून पृत्वी सुफला होते अशी भावना होती. मानवी जीवनाचे आरोपण सृष्टीवर करणे हा मानवी स्वभाव आहे. सूर्य मृग नक्षत्रात गेल्यानंतरचे पहिले तीन दिवस हा पृथ्वीच्या रजोदर्शनाचा काळ मानला जातो. या काळात नांगरणे, बी पेरणे वर्ज्य मानले जाते. चवथ्या दिवशी दगडांना स्नान घालून पृथ्वी सुफलनासाठी योग्य झाली असे मानले जाते. अंबुवाची नांवाने हा उत्सव बंगाल, आसाम येथे व्यापक प्रमाणात तर अन्यत्र तुरळक प्रमाणात आजही साजरा होतो. आसाममद्ध्ये कामाख्या मंदिरातही हा देवीचा रजोदर्शन उत्सव साजरा होतो. या काळात मंदिर तीन दिवस बंद असते. चवथ्या दिवशी देवीला स्नान घालण्यात येते व भक्तांना लाल कपड्याचे तुकडे देवीच्या रजोदर्शनाचे प्रतीक म्हणून वाटले जातात. शबरीमलाच्या निषिद्धांच्या विपरित, खुद्द केरळमद्ध्येही पार्वती देवीच्या मंदिरात (चेंगान्नूर) पार्वतीच्या मासिक धर्माचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. याचा एक अर्थ असा कि रजोदर्शन हे काहीतरी अपवित्र आहे अशी भावना मुळात नव्हती. किंबुहना सुफलनतेत रजोदर्शन हे अतळ आहे, अपरिहार्य आहे आणि मानवाला वंशसातत्यासाठी आवश्यकच आहे अशी भावना होती असे दिसते. तीन दिवस स्त्रीला कामांपासून विश्रांती मिळावी म्हणू दूर बसणे हा तत्कालीन स्थितीत सुचलेला पर्याय सोडला तर स्त्री या काळात अस्पर्शीही होती असा आभसही मिळत नाही. उलट भारतातील ५२ शक्तीपीठे (सतीचे एकेक अवयव जेथे जेथे गळून पडले त्या स्थानांवर उभारलेली मंदिरे) स्त्री हे नरकाचे द्वार आहे, पापयोनी आहेत अशी वैदिक धर्मशास्त्रांनी निर्माण केलेली निषिद्धे शैव पाळत नव्हते असे दिसते. वैदिक धर्मातही आरंभकाळी स्त्रीकडे पहायचा दृष्टीकोण व्यापक व उदारच होता असे ऋग्वेदावरुनच दिसते. अनेक स्त्रीयांनी सुक्ते रचलेली आहेत. ऋग्वेदातील १.७९ हे सूक्त लोपामुद्रेने लिहिलेले असून ती तत्ववेत्ती होती हे स्पष्ट दिसते. वैदिक स्त्रीयांना उपनयनाचा, वेदांचा व यज्ञकर्मात भाग घेण्याचाही अधिकार होता. ऋग्वेदात कोठेही ऋतुमती स्त्री अपवित्र असते वगैरे उल्लेख नाही. अगदी मनुस्मृतीतही मासिक धर्मकाळात पुरुषाने स्त्रीशी संभोग करू नये याव्यतिरिक्त अशुचीबाबत कसलेही विधान केलेले नाही. परंतू ततित्तिरिय संहितेत नंतर कहे भाग घुसवत एक मिथक निर्माण करण्यात आले. ते असे: इंद्राने त्वष्ट्याचा पुत्र असलेल्या विश्वरुपाची तीन मस्तके उडवून ब्रह्महत्या केली. याबाबत निंदा होऊ लागल्यावर इंद्राने आपले १/३ पाप पृथ्वी व झाडंना दिले व उरलेले पाप स्विकारण्याची त्याने स्त्रीयांच्या एका समुहला विनंती केली. त्यावर स्त्रीयांनी वर मागितला. रजोदर्शनाचा काळ संपल्यावर आम्हाला अपत्यप्राप्ती होऊ दे! मग इंद्राच्या पापाने रज:स्वला स्त्रीचे रुप घेतले. म्हणून रजस्वला स्त्रीबरोबर संभाषण करू नये, तिच्याजवळ बसू नये, तिच्या हातचे अन्न खाऊ नये कारण ती इंद्राच्या पापाचा रंग असलेले रक्त टाकत असते. आता ही भाकडकथा आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. इंद्राने आपले पाप त्यांना देईपर्यंत त्यांना अपत्यप्राप्ती होत नव्हती का? त्यांना रजोदर्शन होतच नव्हते का? आणि हे झाले एका स्त्री समुहाबाबत...अन्य स्त्रीयांचे काय? रजोदर्शन अमंगळ आहे हे सांगण्यासाठी कोणी मुढाने ही कथा बनवली आहे हे उघड आहे. रजोदर्शनापुर्वी मुलीचे लग्न करावे असे मनु सांगतो. पण अन्य स्मृती त्याच्याही पुढे जातात आणि रज:स्वलेने तीन दिवस कसे वागावे याबाबत अगदी बारीक-सारीक नियम घालतात. तिने स्नान करु नये, केस विंचरू नये, दात घासू नयेत, तिन्ही दिवस हातात घेऊन अन्न खावे, कोणाला, अगदी रज:स्वलेने रज:स्वलेलाही स्पर्श करू नये, एकवस्त्रा असावे वगैरे. यातील एक जरी नियम जरी तिने मोडला तर तिला होणारा पुत्र चोर, रोगी, नपुंसक, वेडा वगैरे होतो अशी भिती दाखवायलाही हे वैदिक धर्मशास्त्रकार चुकलेले दिसत नाहीत. ततित्तिरिय ब्राह्मणात तिला या काळात याज्ञिक धर्मकृत्येही निषिद्ध सांगितली आहेत. हे नियम अर्थातच वैदिक स्त्रीयांनाच कटाक्षाने लागू केले गेले हे उघड आहे. ्स्त्रीयांचे उपनयनही थांबले आणि तिचा वेदाधिकारही काढला गेला तो स्मृतीकालातच. तत्पुर्वी वेदाध्ययन जरी केले गेले नसले तरी विवाहाआधी तिचे उपनयन करण्यात येत असे. पण तीही परंपरा नंतर वैदिकांनी का सोडली याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्यांच्या स्त्रीया या सर्व पातकांचे द्वार बनल्या हे मात्र खरे. खरे म्हणजे हे वैदिक परंपरांच्याच विरोधात जाते. वेदाज्ञा म्हणाल तर याबाबत अशी एकही आज्ञा वेदांत मिळत नाही. म्हणजेच स्त्रीयांबाबतचे असे अन्यायी नियम करणे हेच मुळात वेदविरोधी होते, हे वैदिकांनी समजावून घेत मुळचे वैदिक स्त्री माहात्म्य पुन्हा प्रतिष्ठापित करण्याची आवश्यकता आहे. इस्लाम इस्लाममद्ध्ये (भारतात) काही ठिकाणी मशिद-दर्ग्यांत स्त्रीयांना प्रवेश नाही असे मी लेखारंभीच सांगितले आहे. हेही कुराणविरोधी आहे असे म्हणायला प्रत्यवाय नाही. कुराणनुसार स्त्रीयांना मशिदीत जाण्याचा, नमाज अदा करण्याचा अधिकार आहे. अनेक ठिकाणी स्त्रीयांसाठी मशिदीत वेगळी व्यवस्था असते. पण असे असले तरी स्त्रीयांनी घरीच नमाज पढावा यासाठी अधिक दक्षता बाळगली जाते व स्त्रीया मशिदींत मुळात जाण्याचा प्रयत्नही करत नाही असेही चित्र आहे. काही ठिकाणी तर बंदीच आहे. कुराणात पैगंबर म्हणतात, स्त्रीयांना कोणी मशीदीत जाण्यापासून रोखू शकत नाही. पण त्याला नंतरच्या धर्मशास्त्र्यांनी दिलेली जोड अशी कि "पण घर हीच त्यांच्या नमाजासाठी योग्य जागा आहे." पैगंबरांनी स्त्रीयांबरोबर लहान मुले असतात व ते रडून नमाजात व्यत्यय आणतत म्हणून स्त्रीयांसाठी स्वतंत्र खोली व दरवाजा असावा असे म्हटले. असे असले तरी मासिक धर्मातील स्त्रीया व अपवित्र लोक यांच्यासाठी सामुदायिक नमाज पैगंबरांच्याच पत्नीमुळे, आयेशामुळे, नाकारला गेला असे इस्लामी पंडित सांगतात. अर्थात याला कुराणात दुजोरा मिळत नाही. हदिसने अनेक बाबींचा विपर्यास केला आहे हे स्पष्टच दिसते. कुराणवर विश्वास ठेवणा-या मुस्लिमांनी मुळ कुराणातच स्त्रीयांबाबतचे नियम पाहिले तर आपल्या वेडगळ समजुते टाकाव्या लागतील. थोडक्यात धर्मांनी मुळातील बाबी व स्त्रीयांबाबतचा उदारमतवाद कसा धिक्कारला आहे हे आपण वैदिक व इस्लामबाबत पाहू शकतो. स्त्रीयांना दुय्यम स्थान देणे हा एकमेव हेतू त्यामागे होता यात शंकाच नाही. मुळ धर्मही बाजुला ठेवत स्वार्थासाठी, स्त्रीयांवरील व अन्यांवरील वर्चस्व गाजवण्यासाठी धर्मालाही तिलांजली दिली. आज आपण आधुनिक काळात आहोत. समतेचे मुलतत्व आपण घटनात्मक पातळीवर स्विकारले आहे. त्यात स्त्री-पुरुष समता सर्वोपरी आहे. अनेक हिंदू धर्मातील वैदिक पुरोहितांनी हट्टाने वैदिक नसलेले, उत्तरकाळात बनवलेले, अगदी स्मृतींतही नसलेले अनेक नियम देवस्थान कायद्यांत घुसवले आहेत. धर्माच्या बाबतीत मुस्लिम सर्वस्वी मुल्ला काय अर्थ काढतो यावरच अधिक अवलंबून आहेत. खरे म्हणजे, अगदी धर्मात असले तरी, ज्ञान-विज्ञानाच्या प्रकाशात असले बाष्कळ नियम फेकून द्यायची गरज असतांना "धर्म'..धर्म" करत स्त्रीच्या निसर्ग धर्माचा अवमान करत आपण समस्त मानूसकीला काळिमा फासत आहोत हे लक्षात घ्यायला हवे. मशिद असो कि मंदिर, यज्ञ असॊ को पुजा, स्त्रीला समान अधिकार हवेत. ते पाळायचे कि नाही, धर्मस्थली जायचे कि नाहे ही बाब व्यक्तिस्वातंत्र्याची आहे. पण कोणी त्यांना जायचे असुनही आडकाठी करत असेल तर धर्मस्थळ कायदे, लिखित-अलिखित नियम, पंरपरादिंच्या नांवाखाली त्यांना रोखत असेल तर ते घटनात्मक स्वातंत्र्याच्या मुलभूत अधिकारावर गदा आणनारे आहे. असे कायदे अघटनात्मक असल्याने ते बेकायदेशिर आहेत. स्त्रीयांनाच यात व्यापक प्रबोधनासाठी, स्वत:चे स्वातंत्र्य जपण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. मासिक धर्म अपवित्र नाही. ती वेडगळ समजूत आहे. पुरातन काळापासून या धर्माला प्रतिष्ठा होती. ती गमावली असेल तर ती पुन्हा मिळवायला हवी. आणि समस्त पुरुषांनीही डोळे उघडून पुरुषी वर्चस्वतावादाच्या सरंजामशाही मानसिकतेतून दूर होत आपल्याइतकेच्ध स्त्रीयांनाही स्वातंत्र्य आहे, त्या गुलाम नाहीत याचे भान ठेवले पाहिजे...! |
You are subscribed to email updates from संजय सोनवणी (Sanjay Sonawani). To stop receiving these emails, you may unsubscribe now. | Email delivery powered by Google |
Google Inc., 1600 Amphitheatre Parkway, Mountain View, CA 94043, United States |