Thursday, December 24, 2015

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)


हे कोठवर चालणार?

Posted: 24 Dec 2015 04:45 AM PST




अण्णाभाऊ साठे हे वंचितांच्या मूक अश्रूंना वादळी थैमानात बदलणारे, व्यवस्थेला झंझोडून काढणारे शाहीर, थोर साहित्यिक आणि विचारवंत. महाराष्ट्रावर त्यांचे अपरंपार ऋण आहे. पण ते मान्य करण्याइतकी कृतज्ञता महाराष्ट्रात नाही. त्यांची पणती सुवर्णा साठे ही ठाणे ग्रामीण पोलिसांत ड्युटीवर होती. वय वर्ष २३. ती ड्युटीवरुनच सुमारे दहा महिन्यंपुर्वी बेपत्ता झाली. तिची आई लीलाबाई यांना वाळवा येथील इस्पितळातून फोन आला कि त्यांची मुलगी वाळव्यात रस्त्यावर ८०% जळालेल्या अवस्थेत सापडली. तिच्या जगण्याचे चांसेस कमी असल्याने तातडीने येवून तिला भेटा असा निरोप मिळाला. त्या व अन्य नातेवाईक वाळव्याला पोहोचेपर्यंत सुवर्णाचे अंत्यविधीही पार पडले होते.

एकही नातेवाईक उपस्थित नसतांना अंत्यविधी कसे केले गेले हा प्रश्न शंकर कांबळे या साठे कुटुंबच्या मित्राने केला. त्यांना हाती मिळाले ते डेथ सर्टिफिकेट. मुलीच्या खुनामुळे धक्का बसलेले सुवर्णाचे वडील आणी आजी एकापाठोपाठ मरण पावले.

सुवर्णा ठाण्यावरून सुनील इंगळे नामक वाळवा येथील  एका तरुणासोबत वाळवा येथे आली होती. या दोघांचे प्रेमसंबंध असावेत व लग्नाच्या आश्वासनामुळेच ती वाळव्याला गेली असावी असे कांबळे म्हणतात. त्यांचा व लीलाबाइंचा संशय ईंगळेवर आहे. पण या प्रकरणतील दुर्दैव असे आहे कि पोलिसांनीच कसलाही तपास केला नाही. ठाण्याची एक मुलगी वाळव्याला जळालेल्या अवस्थेत कशी मिळाली? तिला कोणी जाळले? पोलिसांनी तिचे प्रेत नातेवाईकांकडे सुपुर्त का केले नाही? तपास निष्कर्ष न काढता कसा संपवला? लीलाबाई अलीकडेच थेट मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागायला गेल्या होत्या. पण आश्वासनाखेरीज पदरी काही पडलेले नाही.

एका महिला पोलिसाचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू होतो आणि पोलिसच त्याचा तपास करत नसतील तर ही केवढी मोठी गंभीर बाब आहे हे आम्हाला समजायला हवे. या प्रकरणाचा तपास करण्यात वाळवा पोलिसांचे स्वारस्य नाही तर मग हे प्रकरण सीआयडीकडे सोपवावे. सुवर्णा ठाण्यावरून वाळव्याला कशी, कोणासोबत आली, नेमक्या कोणी व का तिला जाळले हे तपासातून समोर आलेच पाहिजे. दोषी कोणीही असो, त्याला जेरबंद केलेच पाहिजे. लिलाबाई म्हणतात कि सुनील इंगळे त्यांनाही धमक्या देत आहे. असे असेल तर पोलिस त्याच्यावर अद्याप कारवाई का करत नाहीत?

एक महिला पोलिस, त्यात अण्णाभाऊ साठेंची पणती....
तिच्या खून होतो...दहा महिने उलटुन जातात....कसलाही तपास नाही, कसलाही निष्कर्ष नाही....
हे उभ्या महाराष्ट्राला...पोलिस खात्याला शरमेने मान खाली घालावी असे कृत्य नव्हे काय?

No comments:

Post a Comment