संजय सोनवणी (Sanjay Sonawani) |
Posted: 15 Feb 2016 09:09 PM PST भारतात आजच्या आधुनिक परिभाषेतील लिबरल (स्वतंत्रतावादी) सहिष्णुता अस्तितवात होती असे धाडसी विधान करता येत नाही. भारतातही धर्म, पंथ यांत रक्तरंजित संघर्ष झालेले आहेत. हा इतिहास सनपुर्व सहाव्या शतकापासुनचा ज्ञात इतिहास आहे. गौतम बुद्धाचे धर्मस्थापना ते आरंभीचा प्रचार या काळात त्यांनाही वैदिकांच्या हिंसक विरोधाला सामोरे जावे लागल्याचे आपल्याला दिसते. गुप्तकाळापासून वैदिकि धर्माने उचल घ्यायला सुरुवात केली ते दहशतवादाचे सर्व नियम पाळत. शैव-वैष्णव यांच्यातील संघर्षही रक्तरंजितच होता. अन्य जातीयांवर, विशेष्त: अस्पृष्यांवर जी अमानवी बंधने टाकली गेली ती असहिष्णुतेच्याच अनुदार प्रवृत्तीतून हेही आपण पाहू शकतो. इतिहासातील कोणत्याही राजाने सहिष्णुतेचे धोरण राबवले नसल्याने या कर्मात त्यांचाही सक्रिय सहभाग होता असेही म्हणावे लागते...मग राजे कोणीही असोत. म्हणजेच भारतात धर्मसत्ता व राजसत्ता परस्परांवर कुरघोड्या करण्याचेही प्रयत्न करत जनतेवर मात्र आपली वर्चस्वाची, सत्तेची मिठी बळकट करत राहिले, त्यात यशस्वीही झाले असे म्हणावे लागते. भारतीय सहिष्णुता ही हिंसक असहिष्णुतेसोबतच वैचारिक व सामाजिक जीवनातही असहिष्णुता राहिलेली आहे. भारताचा स्वर्णकाळ वगैरे गौरवगाथा ठीक वाटल्या तरी प्रत्यक्षात भारतात सहिष्णुतेचे स्वर्णयुग होते असे म्हणता येत नाही. इस्लामकाळ या असहिष्णुतेत भर घालणाराच होता. सहिष्णुतेची जी उदाहरणे दिसतात त्यात खरोखर सर्वधर्म समभावाच्या जाणीवा किती आणि राजकीय तडजोडी किती हे अभ्यासले तर उत्तरे सहिष्णुतेच्या विरोधात जातात. असो. जागतिक इतिहासच बव्हंशी असहिष्नू जाणीवांचा इतिहास असल्याले तो कोळसा फार उगालण्यात अर्थ नाही. लोकशाहीची मुल्ये, स्वातंत्र्य-समता-बंधुता ही उदात्त मुल्ये आपल्याला युरोपाने, विशेषकरून फ्रेंच राज्यक्रांतीने दिली. अनिर्बंध राजसत्ता, आर्थिक मक्तेदा-या आणि धार्मिक दास्याच्या विरोधातील एकुणातील उद्रेकातून महान प्रबोधनकारी विचारवंत-तत्वज्ञांनी नव्या स्वतंत्रतावादी समाजजीवनाचे तत्वज्ञान जन्माला घातले. ते प्रत्यक्षात सर्वस्वी आजही अंमलात आणता आले नसले तरी किमान त्या दिशेने जागतिक मानवी समुदायांची वाटचाल सुरु झाली. हे त्यांचे मानवजातीवरील कधी न फिटणारे ऋण होय. आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा पायाही त्यातुनच घातला गेला. भारतात गांधीजींच्या नेतृत्वाखाली सर्व भारतियांचा "अहिंसा" व "सत्याग्रह" या उदात्त तत्वज्ञानावर स्वातंत्र्य लढा सुरु असता या तत्वज्ञानाला छेद देणा-या मुस्लिम लीग, हिंदू महासभा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटना-पक्षांचा उदय झाला. रा.स्व. संघ भारतातील आजही जीवितच नव्हे तर सतत वाढत असलेली संघटना आहे. या संघटनेने पुरस्कृत केलेला भाजप हा आज एकहाती बहुमत घेऊन सत्तेत आलेला पक्ष आहे. गुजरात नरसंहाराचा कलंक आजही पुर्णतया पुसला गेलेला नाही. हा पक्ष सत्तेवर आल्यानंतर लगोलग चर्च टार्गेट केल्या गेल्या. शिक्षण पद्धतीत वैदिक विज्ञान आणण्यापासून ते भग्वद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ बनवण्याचे कार्यक्रम घोषित करण्यात आले. गोमांस बंदीवर भर देवून हे थांबले नाही तर केवळ घरात गोमांस आहे या संशयाने अखलाख या मुस्लिमाला झुंडीने निर्दयपणे ठार मारले. नंतर इतर अनेकांवर तसे प्रयोग झाले. मोदीविरोध हा राष्ट्रविरोध असेच वातावरण अंध भक्तांकरवी बनवत मोदींवरील सभ्य चिकित्सा, टीका करणा-यांवर झुंडीने शाब्दिक हल्ले सुरु झाले. हे येथेच थांबले नाही तर हा पक्ष सत्तेवर आल्यानंतर दोन विचारवंतांच्या हत्या झाल्या. तत्पुर्वी एक घडली होती पण ती कोणी केली असावी याबाबतचे जनमत घेतले तर जनमताच्या संशयाची सुई हिंदुत्ववादी (पक्षी वैदिकवादी) गोटांकडे वळते. असहिष्णुतेचे पहिले कारस्थान हे विरोधी विचार दडपण्याकडे झुकते. त्यासाठी ते हवे ते मार्ग चोखाळु शकतात. या असहिष्णुतेमुळे अनेक साहित्यिक-कलावंतांनी आपापले पुरस्कार परत केले. हा निषेधाचा सौम्य मार्ग होता. पण त्यांनाही प्रचंड बदनाम करण्याची मोहिम आखली गेली. हे येथेच थांबले नाही. पुरोगामीत्वाची खिल्ली उडवत पुरोगामी व सेक्युलर या शब्दांची खालच्या पातळीवर खिल्ली उडवण्याची टुम निघाली जी आजही जोरात आहे. हे सर्व काय आहे? मुळात संघ तत्वज्ञानाचा पाया "असहिष्णुता" हा आहे. यासाठी संघाने मुस्लिम द्वेष करत तथाकथित हिंदू संघटन उभे करायला सुरुवात केली. १९५६ मद्धे प्रसिद्ध पत्रकार डी. एफ. कारक यांनी गोळवलकारांबाबत (व संघाच्या बाबत) जे विधान केले होते ते असे: "Golwalkar was a guru of hate, whose life's malevolent work was — as Jawaharlal Nehru so memorably put it — to make India into a "Hindu Pakistan". That project has not succeeded yet, and may it never succeed either." यत संघाचा उद्देश विषद होतो. मुस्लिम द्वेष करत हिंदू संघटन उभे केले कि मुस्लिमांचे शिर्कान करता येईल हा होरा. बाबरी मशिदीचे पतन हा योगायोग वा खरे रामप्रेम होते असे नाही. रामाला केंद्रबिंदू बनवत गतकाळातील नसलेल्या अस्मिता जपण्याचा तो प्रयत्न होता. परिणामी मुस्लिमांचाही संघटित दहशतवाद सुरु झाला. मुस्लिमांची ही प्रति-असहिष्णुता होती हे खरे. त्यामुळे संघवाद्यांना "आम्हीच बरोबर होतो" हा प्रचार करायला संधी मिळाली हे विसरता येत नाही. याची मुळे गोळवलकर गुरुजींच्या मुलभूत तत्वज्ञानात आहेत. हिटलरच्या फ्यसिस्ट विचारांचे ते अनुयायी होते. "To keep up the purity of the Race and its culture, Germany shocked the world by her purging the country of the Semitic Races - the Jews. Race pride at its highest has been manifested here. Germany has also shown how well nigh impossible it is for Races and cultures, having differences going to the root, to be assimilated into one united whole, a good lesson for us in Hindusthan to learn and profit by. Ever since that evil day, when Moslems first landed in Hindustan, right up to the present moment, the Hindu Nation has been gallantly fighting on to take on these despoilers. The Race Spirit has been awakening." हे त्यांचेच विधान आहे. यात हिटलर प्रेम, वांशिक अहंकार जसा डोकावतो तसाच वंश (मुस्लिम) विद्वेशही. हे विचार सहिष्णू आहेत असे कोण म्हणेल? बरे संघाला असहिष्णू म्हणावे तर त्यांना प्रतिक्रिया म्हणून उभ्या राहिलेल्या पुरोगामी म्हणवणा-या संघटनांचे काय हाही प्रश्न येथे महत्वाचा आहे. संभाजी ब्रिगेड व बामसेफसारख्या संघटना शाहु-फुले-आंबेडकरवादी म्हणवतात. पण या संघटनांचे तत्वज्ञान काय तर ब्राह्मण द्वेष. ब्राह्मणांचे कत्तल केली पाहिजे, ते विदेशी असल्याने त्यांची हकालपट्टी केली पाहिजे अशी लेखने, वक्तव्ये सातत्याने ही मंडळी करत आली आहे. ब्राह्मण हटवले कि जणूकाही रातोरात त्यांची मुक्ती व ऐहिक कल्याण होणार आहे कि काय? या लोकांना फुले-आंबेडकर समजले तरी आहेत काय? संघ इतिहासाची जेवढी मोडतोड करतो त्याहीपेक्षा अधिक तोडफोड ही मंडळी करतात. खरे म्हणजे संघ आणि या तथाकथित पुरोगामी संघटनांच्या तत्वज्ञानात काहीएक मुलभूत फरक नाही हे सहजच कोणाच्याही लक्षात येईल. असहिष्णूतेचे उत्तर प्रति-असहिष्णुता नसते हे भारतातील काही कट्टरवादी मुस्लिम आणि काही बहुजनीय संघटनांच्या लक्षात येत नसेल तर "सहिष्णू भारत" कसा बनणार हा यक्षप्रश्न सुज्ञ आणि ताततम्याने सामाजिक विचार करणा-या लोकांसमोर उभा राहिला असल्यास नवल नाही. असहिष्णूंची असहिष्णुंच्या विरोधात चाललेली ही साठमारी आहे, आणि यात शांतपणे जीवन जगू इच्छिणा-यांची ससेहोलपट होते हे या मंडळीला कळणे शक्य नाही. थोडक्यात मानवी स्वातंत्र्य संकुचित केले जात आहे. आणि याला काही केल्या आपण सहिष्णू देश म्हणू शकत नाही. तो आपल्याला बनवावा लागेल. सर्वप्रथम अशा सर्व द्वेषमुलक संघटना, पक्ष व व्यक्ती या विरुद्ध सुबुद्ध लोकांना ठामपणे उभे रहावे लागेल. आम्हाला आमची मुले ते पतवंडे व त्याहीपुढील पिढ्या मुक्त वातावरणात वाढवायच्या आहेत कि द्वेषाने, हिंसेने भरलेल्या जहरी, जगण्याची कसलीही शाश्वती नसलेल्या वातावरणात सडू द्यायच्या आहेत याचा निर्णय आताच घ्यावा लागणार आहे. असहिष्णुतेच्या तत्वज्ञानाचा पाया मिथ्या वर्चस्ववादात आहे. कोण कोणावर कशी सत्ता (आणि कसल्याही प्रकारे) गाजवू शकतो हे सिद्ध करण्यासाठी आहे. नव-याची बायकोवर व आईबापाची मुलांवर प्रेमविरहित वर्चस्व गाजवण्याची इच्छा जेथे जन्माला येते तेथेच माणसाच्या असहिष्णुतेचा प्रवास सुरु होतो. अनिर्बंध आकांक्षांतुन खोटेपणा, हिंस्त्रता, द्वेष इत्यादिचा आधार घेत असहिष्णूता टोक गाठत जाते व अंतता: अमानवी बनते. आम्हाला जर आमचे भवितव्य असे अमानवी बनवायचे नसेल तर आताच सावध होणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानांनी माणूस शहाणा होईल असा जो विद्वानांचा होरा होता तो आम्हीच धुळीला मिळवला आहे. ही साधने ज्ञानप्राप्तीसाठी, आपली वैचारिक क्षमता वाढवण्यासाठे न वापरता आम्ही बव्हंशी त्यांचा उपयोग उथळपणासाठी व अधिक विद्वेषाचे फुत्कार सोडण्यासाठी वापरत आहोत. आणि हे आमच्या एकुणातील असल्या-नसलेल्या बौद्धिकतेचे, विचारशीलतेचे, सृजनशीलतेचे अध:पतन आहे. एवढे अध:पतीत झाल्यावर तरी जरा उर्ध्वरेषेकडॆ प्रवास व्हावा अशी प्रार्थना करणे तरी आपल्या हातात आहे. द्वेषमुलक, असहिष्णू विचारक संघटनांची कमी नाही. या निराशाजनक स्थितीत मला एकच अढळ धृवतारा दिसतो. महात्मा गांधी. मानवतेचे, सहिष्णूतेचे, सौहार्दमय सहजीवनाचे तत्वज्ञानच सांगितले असे नव्हे तर ते प्रत्यक्ष जगण्याचे उदाहरण घालून दिलेला हा या धरतीतलावरील एकमेव महामानव. त्याच्या तत्वज्ञानात भर घालत ते पुढे नेणे हीच आजची सहिष्णुता आहे. तुम्ही त्यासाठी गांधीजींना मानायलाच हवे ही अट नाही. |
You are subscribed to email updates from संजय सोनवणी (Sanjay Sonawani). To stop receiving these emails, you may unsubscribe now. | Email delivery powered by Google |
Google Inc., 1600 Amphitheatre Parkway, Mountain View, CA 94043, United States |
No comments:
Post a Comment