ईश्वरी सत्तेच्या नांवाखाली Posted: 24 Feb 2016 07:33 PM PST तुकोबाने आणि अनेक संतांनी विठ्ठलाला केंद्रबिंदू मानत आपापले भावविश्व उभे केले. त्या भावविश्वातील विठ्ठल हे तुकोबाचे वास्तव होते. समजा विठ्ठल ही देवता त्या काळात नसती तर अन्य कोणतीतरी असू शकली असती, पण असती ही वस्तुस्थिती आहे. माणूस आपापल्या भावनेचा केंद्रबिंदू ठरवतो. ते केंद्र अस्तित्वात असेलच असे नाही. विविध प्रांतातील संतांनी आपली भावनिक केंद्रे त्या त्या भागातील प्रचलित देवतांना बनवले आहे. हे योग्य कि अयोग्य? हे ठरवण्याचा कोणताही मार्ग नाही. ईश्वर आहे कि नाही याचे उत्तर धनात्मक गुरुत्वाकर्षण आहे कि नाही या प्रश्नात दडलेले आहे. हेही अस्तित्वात नाही आणि तेही नाही...(किमान आतातरी पुराव्यांवर आधारित). अमीबाला नसेल पण चिपांझी किंवा अन्य छोटा तरी मेंदू असणा-या प्राण्यांना जाणीवेच्या 'जाणीव' भावना असतात कि नसतात हा आपण त्यांच्या जाणीवाच मुळात समजावून घेण्यास अक्षम असल्याने त्याबाबत विधान करणे धाडसाचे होईल.
परमेश्वर समाजाच्या हिताचा आहे काय कि तो केवळ व्यक्तिगत पातळीवरील ज्याच्या त्याच्या समजुतीचा विषय आहे? परमेश्वर ही संकल्पना व्यक्तीसाठी त्याच्या त्याच्या परिप्रेक्षात कोणत्या ना कोणत्या प्रमाणात उपयुक्त संकल्पना असली तरी ती सार्वजनिक एकमेवाद्वितीय संकल्पना असू शकत नाही. तीही सापेक्ष संकल्पना आहे. परमेश्वर संकल्पना नैतिकतेशी बांधील आहे असेही व्यक्तिपरत्वे दिसत नाही.
किंबहुना ईश्वर ही संकल्पना ही नैतिकतेच्या मान्य व्याख्यांच्या विरोधात जाते हे लक्षात येईल. ईश्वर म्हणजे नैतिकता नव्हे. ईश्वर मानणारे नैतिकच असतात असे नाही, अन्यथा आजतागायत अवघे जग नैतिक झाले असते. कारण मुठभर नास्तिक सोडले तर परमेश्वर मानत नाहीत असे लोक क्वचितच सापडतील.
तेंव्हा ईश्वर आणि नैतिकता याचा विचार एकत्रीत केलाच पाहिजे असे नाही. काही लोक मानतात त्याप्रमाणे भावविश्वातील अगम्य तरीही गम्य असा इश्वर असू शकतो आणि त्याचे असणे गैर नाही. नास्तिक मंडळी या ईश्वराचा निषेध करत असले तरी ती मानवी मनाला शक्ती देणारी संकल्पना आहे हे अमान्य करण्यात अर्थ नाही. ही शक्ती दुधारी तलवार तर बनणार नाही याची काळजी घ्यावी लागते. कारण ईश्वर प्रत्यक्ष प्रमाणांनी सिद्ध करता आला नाही तरी तो आहे असे मानून जे काही अनिष्ट केले जाते त्याचे मात्र परिणाम मात्र दिसतात.
नास्तिकांना असे वाटते कि ईश्वर या संकल्पनेमुळे जगाचे वाटोळे झाले आहे. खरे तर ईश्वर ही संकल्पना सार्वत्रिक करण्याच्या प्रयत्नातून ही अवस्था उद्भवली आहे. उदा. एकमेव वेद...ईश्वराचे निश्वास, एकमेव अल्ला...दुसरा कोनी नाही. किंवा एकमात्र आकाशातील बाप, एकमात्र शिव किंवा एकमात्र विष्णू सर्वश्रेष्ठ बाकीचे खोटे हे करंण्यात मानवी स्वार्थ होते, तेथे परमेश्वर ही संकप्ल्पना अस्तित्वातच नव्हती असे मान्य करावे लागेल. तुकोबाचा विठ्ठल हा तसाच्या तसा जनाबाईचा, नामदेवाचा अथवा चोखोबाचा नव्हता. जो विठ्ठल सावता माळ्याचा होता तसाच तो कान्होपात्राचा नव्हता. त्या अर्थाने संत आणि भक्तपरत्वे विठ्ठल वेगवेगळे होते. ते भक्तांचे/संतांचे व्यक्तिगत भावविश्व होते. विठ्ठल तेथे कोठेच नव्हता, असुही शकत नव्हता.
ईश्वर ही संकल्पना ईश्वराच्या अस्तित्वात नसून मानवी मनात अस्तित्वात असते. त्या दृष्टीने ती सत्यच आहे असे म्हणता येईल. नियतीशरणता हा ईश्वराला मानण्यातला दुर्गूण आहे. ती जर अमान्य केली तर ईश्वर हा मानवी मनाला कोणत्याही घटकापेक्षा मोठा आधार आहे हेही एक सत्य आहे. आणि तो कोणत्या ना कोणत्या पातळीवर, अगदी नास्तिकांतही, अस्तित्वात असतोच.
कारण शुभंकर भावनांपासून कोनी अलिप्त नाही. पण शुभंकरतेच्या व्याख्येत फारक असू शकतो. व्यक्तीच्या भावनिक पातळीवर ईश्वर सार्वत्रिक आहेच...अमुकलाच एकमात्र ईश्वर म्हणून मान्य करा...असला लादलेला ईश्वर आणि व्यक्तिगत भावनिक प्रक्षेपणातील परमेश्वर यातील फरक ठळक करावा लागेल. व्यक्तीच्या ईश्वराला पर्याय देईल अशी अन्य भावनिक संज्ञा नास्तिक मात्र प्रचारात आणु पाहत नाहीत. तेही य बाबतीत वेगळ्या प्रकारचा दहशतवादच करतात. मानवी जगाला स्नेहबंधात ठेवत कल्याणकारी भावनांना जागृत ठेवत त्याला क्रियाशील करणारी मंगलदायी ईश्वरी संकल्पना ही प्रेयच आहे आणि सामान्यजनांत ती असतेच. पण पुरोहित/मुल्ला-मौलवी त्याच भावनेचा गैरफायदा घेतात. कोणताही पुरोहित जेंव्हा जन्माला येतो तेंव्हा ईश्वर या उदात्त संकल्पनेचा खून पडतो.
परमेश्वरच मुळात व्यक्तिगत असल्यामुळे त्याच्याशी संवाद साधायला पुरोहिताची अथवा कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. किंबहुना ईश्वरी सत्तेच्या नांवाखाली सामान्यांचे जेवढे नुकसान केले गेले आहे ते सैतानानेही कदापि केले नसते.
|
No comments:
Post a Comment