संजय सोनवणी (Sanjay Sonawani) |
Posted: 13 Jan 2016 07:23 AM PST
कोणता ग्रंथ कोणत्या भुभागात लिहिला गेला आणि त्या ग्रंथकर्त्याला कोणता भुगोल माहित होता यावरून अनेक महत्वाच्या बाबींचा उलगडा होतो. त्यात हा धर्माशी निगडित ग्रंथ असेल तर धर्मेतिहासाच्या दृष्टीने त्याचे महत्व अजुनच वाढते. मनुस्मृती हा ग्रंथ धर्माज्ञा, धर्मनियम आणि समाजव्यवहाराशी निगडित आहे. कोणताही धर्माज्ञा देणारा ग्रंथ या धर्माज्ञा अर्थातच आपला धर्म मानणा-या लोकांसाठी देणार हे उघड आहे. ज्या भागात हा धर्म प्रबळ अथवा उदयोन्मूख आहे त्या भागातील आपल्या धर्मियांसाठीच या आज्ञा विहित असतील हेही उघड आहे. आणि ग्रंथकर्त्याला ज्ञात असणारा भुगोल या परिप्रेक्षातच पहावा लागेल हेही तेवढेच सत्य आहे.
मनुस्मृती "हिंदू" धर्माचा धर्मनियमांचा सर्वात महत्वाचा ग्रंथ असल्याचा आपला समज असल्याने आपण आधी मनुस्मृतीचा भुगोल काय होता हे मनुस्मृतीच्याच आधाराने समजावून घेवूयात. १) सरस्वती आणि दृषद्वती या देवनद्यांमधील भाग हा देवनिर्मित ब्रह्मावर्त म्हणून ओळखला जात असून हजारो पिढ्यांपासून येथील माणसांचे/ ऋषींचे वर्तन सर्वात सद्गुणी समजले जाते. (म. २.१७-१८) २) ब्रह्मावर्तानंतर कुरू, मत्स्य, पांचाल आणि शौरसेन हे प्रदेश ब्रह्मर्षींचे म्हणून ओळखले जातात. (म. २.१९) ३) या प्रदेशात जन्मलेल्या ब्राह्मणापासून पृथ्वीवरील अन्यांनी शिकावे. (म. २.२०) ४) हिमवत आणि विंध्याच्या दरम्यान पसरलेला प्रदेश, प्रयागच्या पुर्वेकडे आणि विनशनाच्या पश्चिमेकडे पसरलेल्या प्रदेशाला मध्य देश म्हणतात. (म. २.२१) ५) पण या दोन पर्वतांच्या मधील प्रदेश (हिमवत आणि विंध्य) अणि पुर्व व पश्चिमेकडील समुद्र यामधील प्रदेशाला शहाणी माणसे आर्यावर्त म्हणतात. (म. २.२२) ६) असा प्रदेश जिथे काळविटे मुक्तपणे विहार करतात तोच प्रदेश यज्ञासाठी (यज्ञिय देश) योग्य होय. जेथे नाहीत ते प्रदेश म्लेच्छांचे प्रदेश होत. (म. २.२३) ७) द्विजांनी फक्त हाच देश असून प्रयत्नपुर्वक तेथे रहावे. शूद्र मात्र कोठेही असू शकतात. (म. २.२४) हे मनुस्मृतीत येणारे स्मृतीतील स्मृतिकर्त्याला ज्ञान असलेल्या भुगोलाचे वर्णन. यावरून खालील बाबी स्पष्ट होतात. सरस्वती व दृषद्वती नद्यांच्या मधल्या भागात राहणारे लोक हे स्मृतीकर्त्याच्या दृष्टीने सर्वार्थाने आदर्श आहेत. सरस्वती व दृषद्वती या नद्यांना स्मृतीकर्ता देवनद्या म्हणतो तर यामधील भुभागाला तो देवाने निर्माण केलेला प्रदेश म्हणतो. या प्रदेशाला तो ब्रह्मावर्त असेही नांव देतो. त्यानंतर हा स्मृतीकर्ता "कुरू, मत्स्य, पांचाल आणि शौरसेन हे प्रदेश ब्रह्मर्षींचे म्हणून ओळखले जातात." असेही म्हणतो म्हणजे स्मृतीकर्त्याच्या दृष्टीने कुरु-मत्स्यादि प्रदेश हे ब्रह्मावर्ताच्या खालोखाल महत्वाचे आहेत. यातील गंमत अशी कि घग्गर नदी म्हणजे सरस्वती मानली तर ही नदी कथित कुरु प्रदेशामधोमध वाहते. पांचाल-मत्स्य अधिक पुर्वेला आहे. खालील नकाशा पाहिला तर लक्षात येईल. बरे भारतात सरस्वतीबरोबरच दृषद्वतीसारखी "देवनदी" वाहत होती याचा पुरावा नाही. घग्गर नदी गेली हजारो वर्ष मोसमी पावसावर अवलंबून असलेली नदी आहे हे पुरातत्वीय व भुगर्भीय शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. दृषद्वती नदी कोणती हे आजतागायत सिद्ध झालेले नाही. माणुस लिहितांना स्मृतीरंजनामुळे गतकाळातील स्मृतींतील प्रदेश व तेथील लोक यांचे उदात्तीकरण करतो. ही मानवी प्रवृत्ती आहे. आपले पुर्वज हे देवसमान व ते राहत होते ते देवानेच बनवलेले प्रदेश अशी प्रवृत्ती या मनुस्मृतीतील श्लोकात दिसते. हा प्रदेश भारतातील नाही हे मनुच लगोलग पुढच्या श्लोकात सिद्ध करतो. मनू म्हणतो, "ब्रह्मावर्तानंतर कुरू, मत्स्य, पांचाल आणि शौरसेन हे प्रदेश ब्रह्मर्षींचे म्हणून ओळखले जातात." (म. २.१९). घग्ग्गर नदी कुरु प्रदेशातुनच वाहते. पांचाल तर खूप पुर्वेला गेला. शौरसेनक हा मथुरेनजिकचा प्रदेश आहे तर मत्स्य प्रदेश कोणता याबाबत अजून विद्वानांत मतभेद आहेत. तो बहुदा राजस्थान असावा असा एक कयास आहे. असे म्हटले तरी घग्गर नदी कुरू प्रदेशातून वाहते व राजस्थानात जाते हे वास्तव आहे. दृषद्वती नदी कोणती याचा अता-पता नाही. सरस्वती व दृषद्वती नांवाच्या कोणत्याही नद्या भारतात अस्तित्वात नाहीत. किंबहुना स्मृतीकर्त्याने वैदिक लोक जेथून आले होते त्या भागातील नद्यांच्या प्रदेशात (दोआबात) राहणा-या आपल्या पुर्वजांचे स्मरण यातून ठेवले. कारण मनुस्मृती पुढे लगेच म्हणते, कि "ब्रह्मावर्तानंतर कुरू, मत्स्य, पांचाल आणि शौरसेन हे प्रदेश ब्रह्मर्षींचे म्हणून ओळखले जातात." (म. २.१९) कुरु-पांचाल हा वैदिक धर्मप्रसारकांचा दुसरा थांबा होता हे मी आधीच स्पष्ट केले आहे. "The Hymns of the Rigveda" या ग्रंथाच्या प्रस्तावनेत ग्रिफिथनेही हेच विधान केले आहे. मनुस्मृतीचा जोही कोणी ग्रंथकार होता (ते किमान तीन असावेत, पण याबद्दल पुढे) त्याचा मुळचा प्रदेश कुरु-पांचाल हाच असावा याचे पुरावे मनुस्मृतीच देते. मत्स्य व शौरसेनक प्रदेश हेही भौगोलिक दृष्ट्या निकट असल्याने त्याने त्यांचेही नांव घेतलेले आहे. हा भुगोल छोटा तर होताच पण तेथे फक्त वैदिक रहात नव्हते हेही मनुस्मृतीवरुनच स्पष्ट होते. किंबहुना वैदिकेतरांचा परिघ हा त्यांना ज्ञात असलेल्या भुभागांत विस्तृत होता हेही दिसते. मनुस्मृतीत कीकट म्हणजे बिहारचा उल्लेख नाही. कीकट हा प्रदेश वैदिकांच्या दृष्टीने त्याज्ज्यच होता. गंगा-यमुना या महत्वाच्या नद्यांचा उल्लेख मनुस्मृतीचा हा अध्याय करत नाही. पुर्वेचा व पश्चिमेचा उल्लेख होतो पण त्या विस्तृत प्रदेशातील एकाही राज्यनामाचा उल्लेख येत नाही. एवढेच नव्हे तर विंध्य पर्वताचा उल्लेख असला तरी त्याच्या अलीकडच्या प्रदेशांचाही भौगोलिक उल्लेख नाही. विंध्याच्या दक्षीणेकडे काय हे तर बहुदा ऐकिवातही नसल्याने तिकडील प्रदेशांचाही उल्लेख नाही. वैदिकेतर लोक, म्हणजे म्लेंच्छ (शूद्र) त्यांना ज्ञात असलेल्या भुभागात प्रत्यक्ष व ऐकिवातले त्यांना माहित होतेच हेही स्पष्ट दिसते. किंबहुना वैदिकांचा स्मृतीकाळे प्रदेशातील उपप्रदेश हेच स्थान कसे होते हेही दिसते. "असा प्रदेश जिथे काळविटे मुक्तपणे विहार करतात तोच प्रदेश यज्ञासाठी (यज्ञिय देश) योग्य होय. जेथे नाहीत ते प्रदेश म्लेच्छांचे प्रदेश होत." (म. २.२३) काळविटे हिंडतात असे प्रदेश म्हणजे अरण्यमय वा कुरणांचा प्रदेश होय हे उघड आहे. वैदिक लोक ग्रामनिवासी होते हे ब्राह्मण ग्रंथांवरुनही दिसून येते. मनुस्मृतीतही ग्रामाचेच महत्व आहे. नागर संस्कृतीशी, जी म्लेंच्छ अथवा शूद्रांची होती, त्यांशी त्यांचा संपर्क तसाही कमीच असे. म्हणजेच ज्ञात भुगोलातही त्यांचे अस्तित्व तुरळक होते. इतर भागांत (धर्म वेगळा असल्याने) त्यांना कोणी यज्ञ करु देत नव्हते. (म्हणजेच तेथील लोक वैदिक धर्मानुयायी बनत नव्हते). त्यामुळे द्विजांनी आपला प्रांत सोडू नये असेही मनुस्मृती स्पष्ट करते. येथे म्लेंच्छ आणि शूद्र या शबदामधील घोळ पाहू. म्लेंच्छ हा शब्द मेलुहा (किंवा मेलुखा) या शब्दाचा वैदिक अपभ्रंश कसा आहे हे बी.बी. लाल यांनी दाखवून दिलेले आहे. शूद्र या शब्दाची कोणत्याही भाषेत आजवर व्युत्पत्ती सापडलेली नसल्याने हा कशाचा अपभ्रंश आहे हे आपल्याला आजही माहित नाही. समजा वैदिक लोकांनी आपल्या भाषेत, वर्णव्यवस्थेत चवथा वर्ण म्हनून हे नांव दिले असते तर त्या शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थही त्या भाषेतच असायला पाहिजे, पण तसेही नाही. याचाच अर्थ म्लेंच्छ किंवा शूद्र हे वैदिक धर्मियांच्या कक्षेबाहेर होते. त्यामुळेच वैदिक लोक त्यांच्यापासून दूर रहायचा आटोकाट प्रयत्न करत असे दिसते. आर्यावर्ताची वैदिकांची मनुस्मृतीतील व्याख्या ही आजच्या वैदिकवाद्यांच्या "अखंड हिंदुस्तान" च्या व्याख्येएवढीच बालीश होती हे मनुस्मृतीवरुनच दिसते. मनुस्मॄतीला विंध्याचा दक्षीणेकडील भुभाग माहित नाही. बिहार (कीकट) ते पुर्वेकडील प्रदेश माहित नाहीत. जे माहित आहेत ते कुरु प्रांताच्या परुइघातील. ते स्वाभाविक असले तरी मग प्रश्न निर्माण होतो तो असा कि: एका मर्यादित प्रदेशात निर्माण झालेली, तेथीलच लोकांसाठी लिहिली गेलेली एक धर्मनियमावली सर्व देशातील माणसांची कशी? नंतर झाली असेल तर सर्वांचे (सर्वांचे हा शब्द लक्षात घ्या) धर्मांतर कधी आणि कसे झाले? आणि काही तोकड्या लोकांचे जरी झाले असेल तर इतरांचा धर्म स्वतंत्र होता आणि आहे असेच नाही कि काय? वास्तव हे आहे कि मनुस्मृती ही समग्र हिंदुंसाठी नव्हती. असुही शकत नव्हती. ती केवळ वैदिकांसाठीची आचार-धर्म संहिता होती. हिंदुंनी तिचा बाऊ का म्हणून केला? |
You are subscribed to email updates from संजय सोनवणी (Sanjay Sonawani). To stop receiving these emails, you may unsubscribe now. | Email delivery powered by Google |
Google Inc., 1600 Amphitheatre Parkway, Mountain View, CA 94043, United States |
No comments:
Post a Comment