Thursday, January 7, 2016

सुवर्णसिद्ध जल सोने

सुवर्णसिद्ध जल


 सुवर्ण आरोग्यासाठी, जीवनशक्‍ती व प्रतिकारशक्‍ती टिकून राहण्यासाठी, तसेच रोगनाशनासाठी प्रभावी असते. रोगावर औषध म्हणून सुवर्णाचा वापर करायचा असला, तर त्यासाठी तज्ज्ञ वैद्यांचे मार्गदर्शन गरजेचे असते. पण रोग होऊ नयेत म्हणून, जीवनशक्‍ती व प्रतिकारशक्‍ती संपन्न अवस्थेत राहावी म्हणून, सुवर्णाचा वापर घरच्या घरीसुद्धा करता येऊ शकतो आणि त्यासाठी सुवर्णसिद्ध जल हा अगदी सोपा व सुरक्षित उपाय होय.

सोने माहिती नाही, अशी व्यक्‍ती शोधूनही सापडणार नाही. हजारो वर्षांपासून सुवर्णाचे महत्त्व अबाधित राहू शकले, यावरूनच त्याची उपयुक्‍तता सिद्ध होते. आरोग्याच्या दृष्टीतूनही सुवर्ण खूप महत्त्वाचे असते. सर्व रसायनांमध्ये सुवर्ण श्रेष्ठ समजले जाते. या संदर्भात आयुर्वेदात म्हटले आहे,
रसायनानाम्‌ अन्येषां प्रयोगात्‌ हेमम्‌ उत्तमम्‌ ।...
निघण्टु रत्नाकर

आयुर्वेदात सुवर्णाचा अनेक प्रकारांनी वापर केलेला आहे. सुवर्ण सहाणेवर उगाळून वापरायला सांगितले आहे. जेवणासाठी किंवा पाणी पिण्यासाठी सुवर्णाचे ताट, भांडे वापरण्यास सांगितले आहे. काही औषधे सुवर्णपात्रात साठवायला सांगितली आहेत. सुवर्णाचे अलंकार घालायला सांगितले आहेत. सोन्याचा वर्ख, सोन्याचे भस्म यांचे अनेक औषधी प्रयोग सांगितले आहेत. असाच एक साधा, सहजपणे व नियमितपणे करता येण्यासारखा सुवर्णाचा प्रयोग म्हणजे सुवर्णसिद्ध जलाचे सेवन.

सुवर्णसिद्ध जल म्हणजे सुवर्णाने संस्कारित जल. संस्कार अनेक प्रकारांनी करता येतात. सुवर्णाच्या भांड्यात साठवलेले पाणीसुद्धा सुवर्णसिद्धच असते. पण संस्कार करण्याचे सर्वांत प्रभावी माध्यम असते अग्नी. अग्नीद्वारा केलेला संस्कार सूक्ष्म पातळीपर्यंत होत असतो. म्हणूूनच सोन्यासह पाणी उकळवून ते सुवर्णसिद्ध करण्याची पद्धत सुरू झाली असावी. आरोग्यरक्षणासाठी व जीवनशक्‍ती चांगली राहावी म्हणून सुवर्णाचा वापर करायचा असला, तर त्यासाठी सुवर्णसिद्ध जल उत्तम होय. सुवर्णसिद्ध जलाचे फायदे माहिती करून घ्यायचे असले, तर त्यासाठी सुवर्णाचे गुणधर्म बघायला हवेत.

सुवर्णं स्वादु हृद्यं च बृंहणीयं रसायनम्‌ । दोषत्रयापहं शीतं चक्षुष्यं विषसूदनम्‌ ।।...सुश्रुत सूत्रस्थान सुवर्ण चवीला मधुर, हृदयासाठी हितकर, शरीरधातूंना पोषक व रसायन गुणांनी युक्‍त असते. तिन्ही दोषांना संतुलित करते, डोळ्यांसाठी हितकर असते आणि विषाचा नाश करते.

रुच्यचक्षुष्यायुष्यकरं प्रज्ञाकरं वीर्यकरं स्वर्यं कान्तिकरं च ।
सुवर्ण रुची वाढवते, डोळ्यांसाठी हितकर असते, आयुष्य वाढवते; बुद्धी, स्मृती, धृती वगैरे वाढवून प्रज्ञासंपन्नता देते, वीर्य वाढवते, आवाज सुधारते आणि कांती उजळवते.

हेम चायुःप्रदं प्रोक्‍तं महासौभाग्यवर्धनम्‌। आरोग्यं पुष्टिदं श्रेष्ठं सर्वधातुविवर्धनम्‌।।...
निघण्टु रत्नाकर
सुवर्ण आयुष्य, तसेच सौभाग्यवर्धनात महान सांगितले आहे. सुवर्णामुळे आरोग्याचा लाभ होतो व सर्व धातू पोसले जाऊन दृढ शरीराचा लाभ होतो.

स्वर्णं विधत्ते हरते च रोगान्करोति सौख्यं प्रबलेन्द्रियत्वम्‌ । शुक्रस्य वृद्धिं बलतेजपुष्टिं क्रियासु शक्‍तिं च करोति हेमम्‌ ।।
..निघण्टु रत्नाकर
रोगांचा नाश करून सुवर्ण सौख्य देते, इंद्रियांना सामर्थ्यवान बनवते. सुवर्णामुळे शुक्रधातू वाढतो; बल, तेज, पुष्टी यांची प्राप्ती होते व काम करण्याची शक्‍ती वाढते. सुवर्णामध्ये असे अनेक उत्तमोत्तम गुण असल्याने सुवर्णाचे नियमित सेवन करावे, असे आयुर्वेदात सांगितले आहे.

कानकं सेवनं नित्यं जरामृत्युविनाशनम्‌, दृढकायाग्निकरणम्‌ ।...निघण्टु रत्नाकर
सोन्याचे नियमित सेवन करण्याने वृद्धत्व येत नाही, अकाली मृत्यूची भीती राहत नाही, शरीर दृढ होते व जाठराग्नी उत्तम राहतो.
सुवर्णाचे नियमित सेवन करण्यासाठी सुवर्णभस्म, त्याखालोखाल सुवर्णवर्ख व त्या खालोखाल सुवर्णसिद्ध जल उत्तम समजले जाते.

सुवर्णभस्म व सुवर्णवर्खाची योग्य प्रकारे योजना केली, तर सर्व रोग दूर होऊ शकतात, असे उल्लेख आयुर्वेदात मिळतात. याच आधारावर सुवर्णसिद्ध जलामुळे आरोग्याचे रक्षण होते आणि रोग झाला असल्यास त्यातून बरे होण्यासाठी आवश्‍यक असणारी शक्‍ती मिळते, असे म्हणता येईल. तान्ह्या बाळापासून ते घरातल्या ज्येष्ठ व्यक्‍तीपर्यंत सगळ्यांनी बाराही महिने असे सुवर्णसिद्ध जल पिणे उत्तम असते. गर्भारपण, बाळंतपण तसेच कोणत्याही रोगावस्थेत सुवर्णसिद्ध जल आवर्जून प्यावे.सुवर्णसिद्ध जल गरमच प्यायला हवे, असे नाही. नेहमी कोमट पाणी पिणे हितकर व पथ्यकर असते, असे आयुर्वेदाने सांगितले आहे. त्या दृष्टीने सुवर्णसिद्ध जल थर्मासमध्ये भरून ठेवून कोमट वा गरम असताना पिणे उत्तम; पण एरवी सुवर्णसिद्ध जल सामान्य तापमानाचे असताना प्यायले तरी चालते. दिवसभर पिण्यासाठी लागणारे पाणी रोज सकाळी सुवर्णसिद्ध करून ठेवणे उत्तम होय. सुवर्णसिद्ध जल तयार करताना जलसंतुलन करण्यासाठी त्यात काही विशेष द्रव्ये टाकणे अधिक प्रभावी असते.

थोडक्‍यात, सुवर्ण आरोग्यासाठी, जीवनशक्‍ती व प्रतिकारशक्‍ती टिकून राहण्यासाठी, तसेच रोगनाशनासाठी प्रभावी असते. रोगावर औषध म्हणून सुवर्णाचा वापर करायचा असला, तर त्यासाठी तज्ज्ञ वैद्यांचे मार्गदर्शन गरजेचे असते. पण रोग होऊ नयेत म्हणून, जीवनशक्‍ती व प्रतिकारशक्‍ती संपन्न अवस्थेत राहावी म्हणून सुवर्णाचा वापर घरच्या घरीसुद्धा करता येऊ शकतो आणि त्यासाठी सुवर्णसिद्ध जल हा अगदी सोपा व सुरक्षित उपाय होय.

सुगंध सोन्याचा


चांगले विचार करत असताना वा चांगल्या विचारांच्या सान्निध्यात असलेले पाणी पिण्याने समाधान मिळते व आरोग्यही मिळते. म्हणूनच जगभर सर्व धर्मांनी चर्च, मंदिरे वगैरे शक्‍तिस्रोत असलेल्या स्थानांच्या ठिकाणी पाणी "तीर्थ' वा "होली वॉटर'च्या स्वरूपात स्वीकारल्याचे दिसते."ह्या ला जीवन ऐसे नाव' हा वाक्‍प्रयोग पाण्याच्या बाबतीत अगदी सार्थ आहे. पाण्यामुळेच आपले सर्वांचे जीवन चालू असते. जसे जसे एकूणच पृथ्वीच्या पाठीवर पाणी कमी होऊ लागले, तसे तसे लोकांच्या तोंडचे पाळी पळाले व डोळ्यातून पाणी यायची वेळ आली. पाण्याशिवाय जगताच येणार नाही. नदीशेजारी वा पाण्याचा मुबलक साठा असलेल्या ठिकाणीच गावे वसलेली दिसतात. ज्यांच्या प्रदेशात पाणी भरपूर असते तेथे सुबत्ता असते, तेथील जीवन सुखकर असते. खडकाळ भागात, वाळवंटात कोस न्‌ कोस लांब जाऊन पाणी आणावे लागते, त्या ठिकाणी मनुष्यवस्ती तुरळक असल्याचे दिसते. पाण्याशिवाय जगताच येणार नाही. पाणी म्हणजे सर्व प्राणिमात्रांसाठी परमेश्‍वराचा असलेला ओलावा आहे. प्रेमाचा ओलावा नसला तर जीवन चालणार नाही, तसेच पाणी नसले तरीही जीवन चालणार नाही.

पावसाचे पाणी जमिनीत जिरते, पृथ्वीच्या पोटात पाण्याचा अमर्याद साठा आहे, अशा समजुतीतून मनुष्याने पाण्याचे स्रोत खूप कमी केले. जमिनीच्या खाली असलेले पाणी खोल खोल जाऊ लागले, जमिनीवर असलेले पाणी प्रदूषित केले गेले. एकूणच माणसाची हाव वाढल्यामुळे त्याच्या सर्व अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी लागणारी शक्‍ती शेवटी काम झाल्यावर उष्णतेत परिवर्तित झाल्यामुळे एकूण पृथ्वीचे तापमान वाढले व त्यामुळेही पृथ्वीवरचे पाणी कमी झाले.

पाण्याची गंमत अशी, की ते उताराकडे वाहते. देव स्वर्गात सर्वात वर व प्राणिमात्र पृथ्वीवर खाली असल्यामुळे देवाच्या मायेचा ओलावा व प्रेम वरून खाली येण्याची सवय घेऊन डोंगरावरचे पाणी वरून खाली उताराकडे व शेवटी समुद्राकडे वाहत जाते. पण समुद्र आहे खारट, तेव्हा उष्णतेने वितळलेला डोंगरावरील बर्फ माणसाला प्यायचे पाणी न देता समुद्रात भर टाकतो.

पाण्यात हायड्रोजन व ऑक्‍सिजन असे दोन भाग असल्याने प्राणवायूच्या माध्यमातून "प्राण' (जीवनशक्‍ती) राहत असल्यामुळे पाणी जसजसे शिळे होत जाईल तसतसे त्यातले जीवन कमी होते, असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ते पचायला कठीण कठीण होत जाते. नदीचे वाहते पाणी पचायला अतिउत्तम असते, असे आयुर्वेदात सांगितले आहे. साठवलेले पाणी, त्यातल्या त्यात अंधारात असलेल्या टाकीत साठवलेले पाणी पचायला जड असते असे म्हणतात. अशा पाण्याला पुन्हा जिवंत करण्यासाठी अग्निसंस्कार करणे आवश्‍यक असते. पाणी उकळवल्याने ते पुन्हा जिवंत होते, पचायला हलके होते, हे नक्की.

लग्नात सालंकृत कन्यादान करावे अशी एक परंपरा आहे. वधू सुवर्णालंकाराने नटून आली तरी ते दागिने तिच्या अंगावर चिकटवलेले नसतात. ते काढूनच ठेवायचे असतात. पण त्या दागिन्यांचा संस्कार झाला तर स्त्रीमध्ये एक वेगळी शालीनता दिसून येते. अर्थात हेही खरे आहे, की हलके हलके लोभी माणसांचे लक्ष वर घातलेल्या सोन्यावर राहिले व वधूच्या अंगावरील सोने आपल्याकडे ठेवून स्त्रीला घालवून द्यायची कल्पनाही काही नतद्रष्टांच्या डोक्‍यात आली.

सुवर्ण हा अत्यंत मौल्यवान असा राजधातू. सुवर्ण शरीरात पचत नाही; पण सुवर्णाचा नुसता संपर्क आला, तरी ते वेगळ्या प्रकारची शक्‍ती आकर्षित करून वस्तूची ताकद वाढवते. जसे राजाशी ओळख असणाऱ्या माणसांना समाजात एक वेगळाच मान मिळतो, त्याप्रमाणे हा एक संस्कार आहे. सोन्याशी संपर्क आला, की शरीरात, पाण्यात व हवेत आमूलाग्र बदल होत असावा.

सोन्यावर पडलेल्या प्रकाशकिरणांचे योग्य संयोजन केले तर विद्युतशक्‍ती तयार होऊ शकते; विशिष्ट प्रकारचे जंतू सोन्याच्या संस्काराने मरतात वा दूर राहतात. म्हणून पिण्यासाठी पाणी उकळवत असताना त्यात सोने टाकले तर पाण्यावर सुवर्णाचा संस्कार होतो व तयार झालेले सुवर्णसिद्ध जल मनुष्याला जीवन प्रदान करते, निरामय आयुष्य प्राप्त करून देते, रोग दूर करते. पाण्याचा काढा- म्हणजे पाणी एक अष्टमांश होईपर्यंत उकळवणे- पिण्यासाठी वापरला तर रोगपरिहार होतो, शरीर सुंदर व कांतिमान होते, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. पाण्याचा काढा करत असताना त्यावर सुवर्णसंस्कार केला तर दुधात केशर, सोन्याला सुगंध किंवा पाण्यात प्राणशक्‍ती.

साधारण दहा लिटर पाण्यात साधारण दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचा पत्रा टाकून पाणी साधारण 20 मिनिटे उकळले तर सुवर्णसिद्ध जल तयार होते. एक अष्टमांश होईपर्यंत उकळवून पाण्याचा काढा करण्याची योजना असली तर मात्र पाणी बराच वेळ अग्नीवर उकळावे लागते. पाणी कुठलेही असो, कुठल्याही फिल्टरमधून काढलेले असले, अगदी बाटलीबंद असले, डोंगरातून आलेल्या झऱ्याचे असले वा गंगेचे असले तरी ते पिण्याअगोदर उकळवून घेणेच योग्य असते. उकळलेले पाणी नेहमी प्राशन केल्याने, त्यातल्या त्यात वर्षा व शिशिर ऋतूत गरम उकळलेले पाणी प्राशन केल्याने, रोगाला प्रतिबंध होऊन मनुष्याला आरोग्याचा वा धष्टपुष्ट शरीर व सुंदर कांतीचा लाभ व्हायला मदत होते. चर्चच्या घुमटावरचा वा मंदिराच्या घुमटावरचा सोन्याचा पत्रा उगीचच लावला जात नसे. बॅंकॉकसारख्या ठिकाणी बुद्धमंदिरात देवाच्या अंगावर सुवर्णवर्ख चिकटवण्याची पद्धतही उगीच आलेली नसावी. आधुनिक शास्त्रानुसार यावर प्रयोग करून पाहायला काही हरकत नाही. सुवर्णाच्या वा चांदीच्या भांड्यात पाणी ठेवले असता त्यात वेगळ्या प्रकारची शक्‍ती येते का, तसेच त्यात बॅक्‍टेरिया, व्हायरस वगैरेंची वाढ रोखली जाऊ शकते का, याबद्दलही संशोधन करणे गरजेचे आहे. आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये उकळलेल्या पाण्याची, सुवर्णसिद्ध जलाची महती खूप सांगितलेली आहे.

आधुनिक संशोधनातून सिद्ध झालेले आहे, की स्पर्शाचा व मानसिक विचारांचा पाण्यावर परिणाम होतो. पाणी उकळवून घेतल्यावर ते अधिक जिवंत होते, त्यावर असलेले वाईट संस्कार निघून जातात. चांगले विचार करत असताना वा चांगल्या विचारांच्या सान्निध्यात असलेले पाणी पिण्याने समाधान मिळते व आरोग्यही मिळते. म्हणूनच जगभर सर्व धर्मांनी चर्च, मंदिरे वगैरे शक्‍तिस्रोत असलेल्या स्थानांच्या ठिकाणी पाणी "तीर्थ' वा "होली वॉटर'च्या स्वरूपात स्वीकारल्याचे दिसते. पाण्याचा तीर्थ म्हणून स्वीकार करणे, एखाद्या वस्तूवर पाणी सोडणे म्हणजे त्या वस्तूबद्दलच्या आपल्या आशा सोडून देणे, शाप देण्यासाठी पाणी वापरणे हे सर्व पूर्वीच्या ऋषिमुनींनी कसे शोधून काढले, हे मोठे कोडे आहे. पाण्यावर वस्तूंचा व विचारांचा संस्कार होतो हे नक्की आहे व त्याचा परिणाम आपल्याला बघता येतो.

म्हणून उकळून सुवर्णसिद्ध केलेले जल वापरून प्रत्येकाने आपले आयुष्य आरोग्यवान करायला हरकत नसावी. पाणी उकळताना त्यात सोने टाकले असता त्याचा पाण्यावर संस्कार होतो, पण सोने कमी मात्र होत नाही, ही यातली गंमत आहे. कुठले तरी व अशुद्ध पाणी प्राशन केल्याने जर रोग झाले तर होणाऱ्या खर्चाचा तुलनेत पाणी उकळण्यासाठी झालेला खर्च क्षुल्लक असतो.


 

No comments:

Post a Comment