Monday, January 11, 2016

सहिष्णुता म्हणजे नेमके काय?


संजय सोनवणी (Sanjay Sonawani)


Posted: 10 Jan 2016 11:50 PM PST
असहिष्णुतेचा प्रश्न कधी नव्हे तेवढा सध्या ऐरणीवर आला आहे. किंबहुना असहिष्णुतेचे वातावरण पेटवत असतांना सोबतच मुळात सहिष्णुतेची व पुरोगामित्वाची संकल्पनाच मुळात बदनाम करण्याचे कारस्थान सुरु आहे. सहिष्णुतेचे जसे तत्वज्ञान असते तसेच असहिष्णुतेचेही असते. आपल्याला सर्वप्रथम असहिष्णुतेचे तत्वज्ञान समजावून घ्यावे लागेल, त्याशिवाय सहिष्णुतेचे महत्व समजणार नाही.

माझ्या घरातील लोक, माझे शेजारी, माझे सहकारी व समाजही मी ज्या विचारधारेला मानतो, ज्या जीवनशैलीला मानतो, ज्या धर्मश्रद्धा जोपासतो त्या विचारधारेने व धर्मश्रद्धा-जीवनशैलीनेच वागतील - वागावेत असा जो आग्रह धरतो, प्रसंगी जबरदस्ती करतो त्याला आपण असहिष्णू म्हणू शकतो. असहिष्णुपणात इतरांचा धर्म, जीवनविचार, आहारपद्धती ते वस्त्र-संस्कृती, राजकीय व स्वतंत्र आर्थिक विचार या बाबींना स्थानच नसते. किंबहुना "व्यक्ती स्वातंत्र्य" ही संकल्पनाच असहिष्णुपणात बसत नाही. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही अशा लोकांना मान्य असण्याची शक्यता नसते. एक विचार, एक समान संस्कृती व एकसमान आचार-व्यवहार संहिता असलेला "समरस" समाज बनवणे अशा लोकांचे एकमात्र ध्येय असते व हे ध्येय साध्य करण्याचा मुख्य उद्देश अनिर्बंध राजकीय व सांस्कृतिक सत्ता गाजवता यावी हाच असतो. थोडक्यात लोकशाहीला या विचारपद्धतीत स्थान नसते.

हे तत्वज्ञान का जन्माला येते हे आपण समजावून घेण्यचा प्रयत्न करुयात. पहिली बाब म्हणजे हे तत्वज्ञान नवे नाही. पुरातन काळापासून कधी ना कधी, कोठे ना कोठे कोणत्या ना राजाने अथवा धर्मगुरुने या तत्वज्ञानाचा आधार घेत प्रचंड रक्तपात केले आहेत, मानवी समुदायांना दास्यात ठेवण्यासाठी करता येतील तेवढी क्रूर कृत्येही केलेली आहेत. जगभरातील बहुतेक धर्म हे मुळात असहिष्णुच असल्याचे ऐतिहासिक रक्तपातांच्या घटनांतून पहायला मिळते. खरे म्हणजे धर्मात मुळ काय आहे यापेक्षा धर्म हे राजकीय सत्ताप्राप्तीचे साधन म्हणून वापरण्याच्या प्रयत्नांतून ही असहिष्णुता जास्त फोफावलेली असल्याचे आपल्या लक्षात येईल. या सत्ताकांक्षेला, रक्तपात व  दडपशाहीला समर्थन देवू शकेल असे तत्वज्ञान तुकड्या-तुकड्यांतुन शोधले तर सहज काढता येते, आणि समजा नसले तर शब्दार्थांची तोडमोड करत सोयिस्कर अर्थ काढण्यात येतात. त्यामुळेच धर्मसत्ता विरुद्ध राजसत्ता या दोहोंत संघर्षही पेटल्याचेही इतिहासात आपण पाहतो. पोपची अनिर्बंध राजसत्ता झुगारण्यासाठी युरोपने केलेला संघर्षही आपल्या डोळ्यासमोर आहे. त्याच वेळीस आपल्य धर्माला अनिर्बंध पसरवता यावे यासाठी धर्मांनी राजाश्रय मिळवण्यासाठी किती लटपटी-खटपटी केल्या व   अंतत: अपार यश मिळवले याचीही उदाहरणे आहेत. अन्य धर्मियांचा छळ तर बहुतेक सत्तांनी केला.

अठराव्या शतकात धर्माबरोबरच वंशवादानेही असहिष्णू तत्वज्ञानाचा अतोनात वापर केला. आर्य वंश हा श्रेष्ठ  तर अन्य वंशिय हे कमअस्सल या मांडणीतून सेमेटिक लोकांचा (विशेषत: ज्यु) छळ सर्व युरोपने केला. या वंशवादाचाच फायदा घेत हिटलर-मुसोलिनी सारखे सत्तेच्या वारुवर झटपट आरुढ होऊ पाहणारे फ्यसिस्ट जन्माला आले. काही काळ यशस्वीही झाले. लक्षावधी ज्युंची कत्तल केली गेली, छळ छावण्यांत त्यांना नराधम यातना देत संपवले गेले. विसाव्या शतकाचा इतिहास या क्रुरतेची परिसीमा पाहणा-या रक्तरंजित घटनांनी सुरु होतो. समाज-समाजांतील हे संघर्ष व राष्ट्रा-राष्ट्रातीलही संघर्ष हे कोठे ना कोठे असहिष्णुतेच्या तत्वज्ञानापाशी येवून ठेपतात. किंबहुना असहिष्णुतेचा मुळगर्भ जगभरच्या  संघर्षांमागे आहे असेही आपण अंदाजू शकतो.

असहिष्णुतेचे तत्वज्ञान हे दुस-यांवर सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि राजकीय वर्चस्व स्थापन करण्यासाठी जन्माला येते. या चारही बाबी या तत्वज्ञानात हातात हात घालून वावरत असतात. त्यांना वेगळे करता येत नाही. Theory of others हा या तत्वज्ञानाचा पहिला नियम असतो. हा नियम म्हणजे आपण (स्वधर्मीय वा विचारप्रणालीचे) व इतर  अशी विभागणी सर्वप्रथम काळजीपुर्वक केली जाते. आपले धर्म/तत्वज्ञान हे इतरांपेक्षा कसे पुढारलेले आहे, इश्वरप्रणित आहे, श्रेष्ठ आहे, पुरातन आहे, हे लिहिणे, सांगत राहणे, बिंबवने व त्यातुनच हाडाचे कट्टर अनुयायी तयार करणे ही स्वभावत:च पुढील पायरी असते. या प्रवसात सुरुवातीला जमतील ती सत्तास्थाने (आर्थिक/राजकीय) प्रप्त करत जात अंतिम उद्देश साध्य करायचा असतो सत्ता संपादनाचा. त्यासाठी शत्रू मानलेल्या वर्ग-गटांबाबत द्वेष पसरवत प्रसंगी हिंसक होण्याची त्यांची अर्थातच तयारी असते, कारण द्वेष केल्याखेरीज, त्यांच्याबाबत खोटे का होईना भय निर्माण केल्याखेरीज आपले लोक एका झेंड्याखाली राहणार नाहीत याची त्यांना खात्रीच असते. आपले अनुयायी स्वतंत्र विचार करणार नाहीत, एक साच्याचे बनतील यासाठी ते अपरंपार कष्ट घेत असतात. कोणी स्वतंत्र विचार मांडत असतील, त्यांच्या विचारांनी आपल्यला हवी तशी समाजरचना करण्यात अपयश येणार असेल, अडथळे येणार असतील तर त्यांना धमकावून गप्प करण्याचे प्रयत्न होतात, एनकेन प्रकाराने अंधारात फेकले जाते व तेही जमणार नसेल तेंव्हा सरळ हत्या केल्या जातात. अमेरिकेतील कु-क्लक्स क्लान या गुप्त संघटननेने अनेक ज्यू व बायबलमधील तत्वज्ञानाविरोधी जाणा-या विचारवंतांची हत्या केली हा इतिहास आहे. भारतात अलीकडेच झालेल्या तीन विचारवंतांच्या हत्याही याच परिप्रेक्षात पहाव्या लागतात. आयसिसचा झालेला उदय याच तत्वज्ञानातून झाला आहे. किंबहुना सर्वच दहशतवादांमागेही हेच तत्वज्ञान व साध्य असते.

सहिष्णुता

या पार्श्वभुमीवर आपल्याला सहिष्णुतेच्या तत्वज्ञानाकडे पहावे लागेल.  सर्वांना स्वतंत्र अस्तित्व जपण्याचा, विचार करण्याचा व आपले विचार निर्भयपणे मांडण्याचा, आपापले धर्म (उपद्रव न निर्माण करता) पाळण्याचा, राजकीय हवे ते विचार बाळगण्याचा अधिकार सहिष्णुता सर्वप्रथम मान्य करते. मानवी सहजीवन हे एकमेकांचा सन्मान करत, एकमेकांचे अधिकार मान्य करत संविधानाच्या चौकटीत जीवन जगण्याचे स्वातंत्र्य घेणे व देणे म्हणजे सहिष्णुता होय. सहिष्णुतेचे तत्वज्ञान मानवाचा मुलभूत व्यक्तिस्वातंत्र्याच्या सन्मानाच्या संकल्पनेवर उभे आहे. महात्मा गांधी जे म्हणत, "मला केवळ भारताचे नव्हे तर भुतलावरील सर्व मानवांचे स्वातंत्र्य हवे आहे." ही उदात्त भुमिका सहिष्णुतेच्या संकल्पनेचा गाभा आहे. स्वत:चे स्वातंत्र्य इतरांचे स्वातंत्र्य संकुचित करण्यासाठी नाही याचे भान प्रत्येक सहिष्णू ठेवत असतो. आपले राष्ट्र "सेक्युलर" राष्ट्र आहे. हा सेक्युलरिझम बहुतेक विद्वान फक्त "धर्म-निरपेक्ष" या शब्दाशी जोडतात, जे चुकीचे आहे. सेक्युलर या शब्दातून ध्वनित होणारा अर्थ खूप व्यापक आहे. केवळ धर्मांपुरता नव्हे तर तो सर्वच जीवनव्यवहारांशी निगडित आहे. तो मानवाच्या (नागरिकांच्या) सौहार्दमय सहजीवनाशी निगडित आहे. प्रत्येकाला आपले स्वतंत्र विचार करण्याचा, जीवन जगण्याचा, धर्म, अर्थविषयक श्रद्धा-विचार ठेवण्याचा, आपापली खाद्य ते जीवनसंस्कृती (अन्य कोणालाही उपद्रव होणार नाही व वर्तन कायद्यांच्या चौकटीत असेल या पद्धतीने) जपण्याचा अधिकार आहे. ही बाब सहिष्णुता मान्य करते. ज्याक्षणी सहजीवनाची संकल्पना हद्दपार होऊ लागते तत्क्षणी ते ते समाज असहिष्णू होत जातात असे म्हणावे लागेल.

थोडक्यात सहिष्णुता ही संकल्पना मानवाच्या स्वातंत्र्याशी निगडित आहे. कोणतेही शासनही ज्यावेळीस अशा स्वातंत्र्याचा विविध अन्याय्य कायदे करत संकोच करू पाहते ते शासनही असहिष्णू आहे असे सहज म्हणता येते. सहिष्णू नागरिकच  नव्हेत तर  सरकारेही असली पाहिजेत. म्हणजेच सरकारांची विचारसरणीही सहिष्णू असली पाहिजे, अंतत: आपल्या नागरिकांना अधिकाधिक स्वातंत्र्य कसे देता येईल हे पाहणारी असली पाहिजे. स्वातंत्र्याचा संकोच करण्यासाठी सरकारे नसतात.

No comments:

Post a Comment