Sunday, January 3, 2016

Tsu links are spam that are annoying the community.

विन सोशल नेटवर्क - Tsu.co - भाग १
युद्धातदंड भेद साम, दाम, ही नीती वापरली जातेच. इन्स्टाग्राम, व्हाटस एप ह्या काही अंशी नाविन्य असलेल्या लोकप्रिय अप्रत्यक्ष स्पर्धकांबाबत फेसबुकने “दाम”चा वापर केला खरा पण Tsu च्या बाबतीत तसं करण शक्य नाही कारण तांत्रिकदृष्ट्या ती फेसबुकचीच कॉपी आहे आणी थेट स्पर्धाच असल्यामुळे कितीही झालं तरी या स्पर्धेत साम आणी भेद हे पर्याय देखील उपयोगाचे नाहीतच कारण ते व्यावहारिक नाहीत. आता उरला तो एकच पर्याय दंड, ज्याचा फेसबुकने वापर केलाच.

फेसबुक वापरणारी एखादी व्यक्ती जेव्हा Tsu वापरते तेव्हाच तीने इतर फेसबुक मित्रांनाही आमंत्रण देणे सहाजिक आहे पण याने फेसबुकला थोडी का होईना गळती लागलीच यामुळेच कि काय फेसबुकने आतापर्यंत फेसबुकवर प्रसिद्ध झालेले त्सु संकेतस्थळाचे दुवे नुसते काढून टाकले नाहीत तर यापुढे असे दुवे शेयर करण्यावर बंदीच घातली.

लोक सह-भागा तून निर्माण होणारे उत्पन्न पुन्हा त्या लोकांमध्येच वाटण्याची अभिनव कल्पना असलेल्या Tsu ने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. फेसबुक सारखी रचना पण जाहिरातींचे उत्पन्न थेट वापरकर्त्यांच्या खिशातच जात असल्यामुळे फेसबुक वापरणारा एक गटही  Tsu शी जोडला गेला. फेसबुकच्या एकूण वापरकर्त्यांच्या तुलनेत ही अगदीच किरकोळ संख्या असली तरी Tsu ची लोकप्रियता ही भविष्यातील संकटाची चाहूल आहे हे सोशल नेटवर्किंग क्षेत्रातील ओर्कुटची मक्तेदारी उध्वस्त करून अधिराज्य गाजवणाऱ्या अनुभवी फेसबुकने ओळखले नसते तरचं नवल.


फेसबुकच्या म्हणण्यानुसार Tsu links are spam that are annoying the community. ह्या वाक्यात annoying the community कमी आणी annoying the company ची मानसिकता जास्त आहे हे सुज्ञास सांगणे न लागे.

Tsu च्या म्हणण्यानुसार २५ सप्टेंबर पर्यंत फेसबुक वापरणाऱ्यांकडून Tsu संकेतस्थळावर दररोज २,५०० भेटी दिल्या जात होत्या पण त्या दिवसानंतर फेसबुकने Tsu च्या दुव्यांवर बंदी घातली.

Claudia Everest (क्लाऊडीया एवरेस्ट) ह्या ४७ वर्षांच्या कॅन्सरमधून बचावल्या आहेत, जेव्हा त्यांच्यावर किमोथेरपीचे उपचार सुरु होते तेव्हा दिवसभर वेळ घालवण्यासाठी त्या रोज कुत्र्यांची २५ चित्र काढून त्सु आणी फेसबुकवर विकायच्या.  त्सु वर एखादी पोस्ट टाकताना चुटकीसरशी फेसबुकवर देखील तीच पोस्ट करता येत असल्यामुळे त्या तो पर्याय वापरायच्या पण फेसबुकने सरसकट सर्व Tsu चे दुवे काढून टाकल्यामुळे त्यांच्या फेसबुकवरील जवळपास ७,५०० पोस्ट्स डिलीट झाल्याच. माझी चित्र फेसबुकवरून काढून टाकण्याचे कारण ती spam आहेत ही कल्पनाच मुळी हास्यापद आहे. आपल्या वापरकर्त्यांना स्पर्धकांपासून दूर ठेवण्यासाठी फेसबुकची रणनीती आहे, पुढे त्या म्हणतात “सध्यातरी फेसबुक आणी इन्स्टाग्रामच्या तुलनेत त्सु बद्दल बहुसंख्य लोकांना माहिती नसली तरी माझ्या मते  त्यांना त्सु चे लोकप्रिय होणे आवडत नसावे कारण तसे झाले तर ते त्यांना महागात पडू शकते”



त्सु उत्पन्न थेट वापरकर्त्यांना देत असल्यामुळे फेसबुकशी थेट स्पर्धा निर्माण झाली आहे, फेसबुकचे या वर्षीचे जाहिरातीमधून कमावलेले उत्पन्न $१६.३ बिलियन डॉलर्स म्हणजे एक लाख पाच हजार सहाशे कोटी रुपये (फक्तच !!) पण जरी संपूर्ण मजकूर आपण निर्माण करत असलो, जाहिराती पाहत असलो तरी फेसबुकने यातला छदाम देखील वापरकर्त्यांमध्ये (आपल्यात) वाटण्याची सुतराम शक्यता नाहीच, अशा परिस्थितीत मजकूर निर्माते (उदा – ब्लॉगर्स, छायाचित्रकार, कार्टुनिस्ट, शॉर्ट फिल्म मेकर्स इत्यादी ज्यांच्यामुळे फेसबुकवर गर्दी टिकून राहते) ते जिथे त्यांना त्यांच्या मजकुराचा मोबदला दिला जातो अशा संकेतस्थळावर फेसबुक सोडून जाणे हे नक्कीच annoying असणारच आहे.

असो, डिसेंबर २०१२ मध्ये बदलेल्या अल्गोरिदमनुसार एकीकडे पर्सनलाइज्ड न्यूज फीडच्या नावाखालीच जोडलेल्या ९५% मित्रांच्या, व्यवसायांच्या, संस्थांच्या, सेलिब्रिटीजच्या  पोस्ट्स लपवायच्या आणी दुसरीकडे   जोडलेल्या मित्रांना आणी page लाईक केलेल्या त्याच  ९५% लोकांना आपल्या पोस्ट दाखवण्यासाठी व्यवसायांना, संस्थांना, सेलिब्रिटीजकडे जाहिरातीचे पैसे मागायचे. किंवा मग वापरकर्त्यांची माहिती Track करून जाहिरातदारांना विकायची किंवा Internet.org च्या गोंडस नावाखाली Net Neutrality ला सुरुंग लावण्याचा प्रयत्न अशा अनेक गोष्टींसाठी फेसबुकबद्दल असंतोष बघितला कि परिवर्तन संसार का नियम है.. किंवा जो एक दिन इस दुनिया मे आता है उसे एक न एक दिन जाना ही पडता है.. अशी वाक्य अधोरेखित होतात.

फेसबुक जास्त काळ लोकप्रिय राहणार नाहीच हे तज्ञ मंडळी जरी मान्य करत असले तरी ही ओहोटी “Dislike” बटन येण्याआधी सुरु होते कि नंतर हे बघणं औत्सुक्याचं आहे.