Saturday, January 23, 2016

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)


रोहिथ वेमुला...एक मूक्त चिंतन

Posted: 23 Jan 2016 01:31 AM PST


माहितीच्या व प्रोपागंड्यांच्या या महाविस्फोटात कोणी सत्य शोधायला जाईल तर पदरी निराशाच पडेल. प्रत्येकजण त्यामुळे हवे तेवढेच सत्य म्हणून स्विकारतो आणि आपापले अजेंडे राबवतो. त्यामुळे एकाच घटनेचे असंख्य अर्थ घेतले जातात किंवा जाणीवपुर्वक दिले जातात. आपणच काढलेला अन्वयार्थ खरा आहे असे दावे हिरीरीने शिस्तबद्ध पसरवले जातात. यातून जे संघर्ष उभे राहतात त्यातून मुख्य घटना मात्र पोरकी होऊन बसते. तिच्या मुळ कारणांचा तटस्थ शोध घेण्याच्या फंदात कोणी पडत नाही. अजून दुसरी कोणती घटना घडत नाही तोवर हे वादळ चालू राहते नि काही दिवसांत विझतेही.

रोहिथ वेमुलाचे आत्महत्या प्रकरण कितीही गंभीर असले तरी या प्रकरणाचेही हेच होत आहे असे माध्यमांतील चर्चा पाहिल्या तर स्पष्ट होते. एकीकडे आंबेडकरवादी/बहुजनवादी आक्रोशत आहेत, हे प्रकरण म्हणजे व्यवस्थेने केलेली हत्या आहे असे म्हणत आहे तर दुसरा संघवादी गट वेमुलाला देशद्रोही ठरवण्याच्या अथक प्रयत्नात आहे. त्याला बेजबाबदार, सातत्याने विचार बदलणारा अस्थिर मनोवृत्तीचा छंदी-फंदी आंबेडकरवादी म्हणून रंगवण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यात पंतप्रधानांनी "भारतमातेने एक सुपुत्र गमावला..." असे विधान केले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी वेमुलाच्या प्रेताच्या साक्षीने आपापले राजकारण साधण्याचा प्रयत्न केला आहे. पण यात अशी घटना घडतेच कशी याबाबत चिंतन करण्यात व असे पुन्हा कधी होनार नाही यासाठी कायमस्वरुपी व्यूहरचना करण्यात आम्ही अपेशी ठरत आहोत ही बाब पुन्हा अधोरेखित होते आहे.

मूख्य बाब म्हणजे तरुणाईचे मानसशास्त्र आम्ही समजावून घेत नाही आहोत. तरुणाई ही बंडखोर असते, रुढतेला नाकारणारी असते. तरुणाईने व्यवस्थेच्या, परंपरांच्या विरोधात वेळोवेळी आवाज उठवला आहे. भारतात कोणी तरुण सावरकर-भगतसिंगांच्या क्रांतीवादी तत्वज्ञानाच्या मोहात जातो तर कोणी संघवाद, मार्क्सवाद, माओवाद व आंबेडकरवादाच्या छायेखाली जातो. गरम रक्ताच्या तरुणाईला गांधीवाद सहजी पचनी पडत नाही. भारतात तरुण कोणत्या वादाच्या आहारी जाईल हे जवळपास त्या तरुणाच्या जातीय/धार्मिक संदर्भांवर अवलंबून असते. निखळ वैचारिकतेचा पाया त्यामागे असतोच असे नाही. शिवाय ज्या महाविद्यालयात/विद्यापीठात जे जे विचारप्रवाह मजबूत असतील त्यापैकी एक तरी एखाद्याला इच्छा नसली तरी अपरिहार्यपणे स्विकारावा लागतो. एकटे पाडले जाण्याचा धोका किती तरुण पत्करू शकतात हाही अभ्यासाचा एक विषय आहे.

स्वविवेक जागा असलेले स्वतंत्र प्रज्ञेचे तरुण या वातावरणात गोंधळून जाणे स्वाभाविक म्हणता येते. वेमुलाने आपल्या विचारधारा बदलल्या असा जो दावा केला जातो तो मुर्खपणाचा आहे. मुळात "स्वशोधाची" म्हणून जी प्रक्रिया असते त्यात "स्व" शी जवळीक साधणारे तत्वज्ञान कोणते याचा शोध घेणेही महत्वाचे बनून जाते आणि तरुणाईत तर अधिकच. खरे तर यालाच स्वातंत्र्य म्हणतात. माणसाने एकाच विचारसरणीत आयुष्यभर बंदिस्त व्हावे ही अपेक्षा करणे वेडेपणाचे लक्षण आहे. त्यामुळे मरणोत्तर वेमुलाला बदनाम करण्यासाठी त्याचे कालौघात बदललेले विचार वेठीला धरणारे मुर्ख आहेत. देशाला सुस्थितीत आणण्यासाठी कोण योग्य आहे हे ठरवतांना एक लक्षात घ्यायला हवे कि काल जे योग्य वाटले होते त्यांनीही निराशा केली आणि आज जे योग्य वाटत आहेत तेही निराशा करत आहेत. भविष्यातले आपल्याला माहित नाही. अशा संभ्रमयूक्त राष्ट्रीय स्थितीत अनुभव्यांची जेथे पंचाईत झाली आहे तेथे जीवनाच्या प्रांगणात खुले पाऊल टाकु पाहणा-या सर्वच युवकांचे काय होत असेल याची कल्पना करुन पाहिलीच पाहिजे.

 वेमुलाने (व त्याच्या सहका-यांनी) याकुबच्या फाशीला विरोध केला म्हणून तो देशद्रोही असाही एक हिंस्त्र विचार लाटेसारखा पसरवला जात आहे. या देशात प्रत्येकाला आपले मत लोकशाही मार्गाने मांडायचा अधिकार आहे हे मात्र सोयिस्करपणे ही मंडळी विसरते. गोडसेंचे पुतळे / मंदिरे उभी करण्याची मागणी करणारे त्यांचे स्वातंत्र्य वापरत नाहीत काय? त्यांना जे स्वातंत्र्य आहे तेच स्वातंत्र्य वेमुलालाही होते हे कसे विसरणार? शिवाय याकुबच्या फाशीला विरोध आणी त्याची आत्महत्या या दोन घटनांचा काय संबंध आहे? त्याची आत्महत्या ही त्याच्यासह काही विद्यार्थ्याला होस्टेलमधून काढून लावले, विद्यापीठाच्या परिसरात काही विभाग त्यांच्यासाठी बंद केले गेले, केंद्र सरकार ते विद्यापीठाच्या उच्चस्तरीय समितीने आणि अभाविपने जे असह्य दबाव निर्माण केले त्यास तोंड देणे असह्य झाल्याने त्याने हार मानून आत्महत्या केली असे हाती आलेल्या सर्व माहित्यांचा आढावा घेतला तर दिसते. या दबाव आणणा-या घटकांची नि:पक्षपाती चौकशी करणे व त्याबाबतच बोलणे अभिप्रेत असता वेमुलाची बदनामी करण्याचे कारण काय? पण असे घडते आहे. वेमुलाबाबतच नाही तर गेल्या दोनेक दशकांतील घटना पाहिल्या तर असेच झाले आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे मोडस ओपरेंडी एकच आहे...पिडित मयतांना व त्यांच्या कुटुंबियांना बदनाम करणे. त्यात ते यशस्वी होतात हेही कटू वास्तव आहे.

यातून काय साध्य करायचे आहे? विरोधी गटांत उभी असलेली तरुणाई व अनुभवी घटक यांचे मानसिक खच्चीकरण कसे होईल हे पहायचे. संघवादी तरुणांची मानसिक ससेहोलपट शक्यतो होत नाही कारण ते नुसते एका विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात असे नाही तर त्यांच्या मागे शक्तीशाली शिस्तबद्ध काम करणारी यंत्रणा उभी आहे. अशी यंत्रणा दुस-यांकडे नाही ही कटू वस्तुस्थिती आहे. मार्क्सवादाची लय कधीच विरलेली आहे. आंबेडकरवादी आज केवळ प्रतिक्रियावादी व विखुरलेले आहेत व तो केवळ भावनिक आहेत. वैचारिक गंभीर पाया त्यांनी कधीच गमावला आहे. अन्य हिंदू बहुजनांना आंबेडकरवाद आजच्या आंबेडकरवाद्यांमुळेच फारसा स्विकारार्ह नाही असे दुर्दैवी चित्र आहे. त्यामुळे ते एकतर संघवाद्यांच्या कळपात जातात किंवा स्वजातीय संघटनांत अथवा कळपांत आपले अस्तित्व जपतात. सामाजिक स्वातंत्र्याची चळवळ व्यापक होण्याऐवजी ती आक्रसत चालली आहे. बाबासाहेब म्हणाले होते, जोवर सामाजिक स्वातंत्र्य येत नाही तोवर राजकीय स्वातंत्र्याला अर्थ नाही आणि नेमके हेच आंबेडकरवादी विसरले आहेत.

जातीयवादाविरुद्ध बोलतांना, दुस-यांना त्यासाठी जबाबदार धरतांना, आम्ही आमची जात सोडायचा यत्किंचितही प्रयत्न करत नसू... तर आम्ही आंबेडकरवाद त्यागला आहे असेच म्हणावे लागेल. आम्हाला नीट राष्ट्रव्यापी सम्यक विचारधारेचे संघटन करत संघाला वैचारिक व सांस्कृतिक तोंड देता येत नसेल तर आंबेडकरांचा बुद्धीवाद, फुल्यांची बंडखोरी आम्हाला मान्य नाही असेच म्हणावे लागेल. खरे तर आज आंबेडकरवाद एकाकी पडत आहे काय यावर नव्याने चिंतन करावे लागेल. जाते/धर्म निरपेक्ष मानवतावादी राष्ट्रव्यापी, राजकारण निरपेक्ष संघटन करावे लागेल...आणि तरच आम्ही वेमुलासारख्या विद्यापीठांत झालेल्या अनेक आत्महत्यांना न्याय देवू शकू आणि पुन्हा अशा आत्महत्या होणार नाहीत याची दक्षता घेऊ शकू!

अन्यथा...अजून एक घटना....तेच निषेध...तेच मोर्चे....सोशल मिडियावर एकाहुन एक तीव्र आवेगातले आक्रोश...एवढेच घडत राहील...बाकी काही नाही!

No comments:

Post a Comment