संजय सोनवणी (Sanjay Sonawani) |
Posted: 25 Oct 2015 11:00 PM PDT
भारतीय संस्कृतीचा, त्यात जन्माला आलेल्या धर्मांचा संगतवार अभ्यास करतांना प्रादेशिकता, कालानुक्रमता आणि तत्कालीन परिस्थित्या यांचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ वैदिक धर्माची स्थापना मुळात कोठे झाली? ते वैदिक धर्म स्थापन करण्याआधी ते लोक कोणत्या धर्माचे होते? या धर्माच्या स्थापनेत भाग घेणारे कोनकोणत्या टोळ्यांचे होते? त्यांचे सामाजिक व धार्मिक जीवन नेमके कसे होते? त्यांच्या समकालीन संस्कृत्या व धर्म कोनते? आणि हा धर्म कसा पसरला? ही प्रक्रिया सुरु होण्याआधीचे धर्मग्रंथ कोणते आणि कालौघात नंतर लिहिले गेले ते कोणते आणि ते कोणत्या प्रदेशात लिहिले गेले? ज्यांच्यात पसरला ते कोणत्या धर्माचे? ज्यांच्यात पसरला नाही ते कोणता धर्म पाळत राहिले?
या प्रश्नांना न भिडता, त्यांची समाधानकारक उत्तरे न शोधता कधीही कोठलाही ग्रंथ उचलून व त्यातील उद्घृते फेकून पाळामुळांबद्दल संभ्रम निर्माण करण्याच्या प्रक्रियेतून कोणालाही कसलेही तथ्यप्रधान उत्तर मिळणार नाही हे उघड आहे. उदा. वैदिक आर्य भारतात बाहेरुन आले असा एक मतप्रवाह अहे. ते आक्रमक म्हणून आले कि स्थलांतरीत म्हणून आले याबद्दल मतभेद आहेत. असे असले तरी आजचा विचारप्रवाह स्थलांतरीत म्हणून आले याकडे झुकतो. याविरुद्धचा प्रवाह आहे तो म्हणतो कि वैदिक आर्य हे भारतातीलच असून ते स्थलांतरे/आक्रमणे याद्वारे भारताबाहेर इराणमार्गे युरोपात पसरले. तिसरा मतप्रवाह माझा असून वैदिक धर्म अवेस्त्याचा समकालीन असून दक्षीण अफगाणिस्तानात निर्माण झाला व धर्मप्रसाराच्या मार्गे भारतात आला. हा धर्म भारतातील नाही याची प्रमाणे थोडक्यात अशी: १) सिंधू किंवा उत्तरसिंधुकालीन समाजजीवनाचे कसलेही चित्रण ऋग्वेदात नाही. २) ऋग्वैदिक संस्कृती ही पशुपालकांची संस्कृती असून स्थिर, नागरी व कृषीप्रधान नाही. ३) ऋग्वेदात येणारा भुगोल हा दक्षीण अफगाणिस्तान हा आहे तर अवेस्त्याचा भुगोल उत्तर अफगाणिस्तान आहे. ४) दोन्ही धर्मांत व भाषेतही विलक्षण साम्य आहे. ५) दोन्ही धर्मग्रंथात एकमेकांच्या धर्मात असलेल्या व्य्क्ती व संघर्ष हुबेहुब आले आहेत, अर्थात शत्रुत्वाच्या भावनेने. उदा. ऋग्वैदिक नोढस गौतम अवेस्त्यात येतो तर अवेस्त्याचे झरथुस्ट्र, विश्तास्प, अरिजास्प आदि ऋग्वेदात येतात. पुरु-पौरु हे दोन्ही ग्रंथांत येतात. ६) त्या भुभागातील दास-दस्यु हे अवैदिक समाज अवेस्त्यातही येतात. जर वैदिक धर्म भारतात स्थापन झाला असा आग्रहच धरायचा असेल तर अवेस्त्याचा पारशी धर्मही भारतातच स्थापन झाला असे मान्य करावे लागेल, आणि ते वास्तव नाही. ७)ऋग्वेदात उल्लेखिलेल्या बहुतेक जमाती पश्चिमोत्तर भारत व अफगाणिस्तानासहित इराण व तुर्कमेनिस्तानातील आहेत व त्या आजही अस्तित्वात आहेत. उदा. तुर्वश (तुर प्रांतातील तुराणी/तुर्क ), पख्त (पख्तुन), भलानस (बोलन खिंडीतील लोक), दास-दस्यु (अफगाणिस्तानातील लोक), पर्शू (पर्शियन लोक), गांधारी (गांधार प्रांतातील लोक), पार्थव (पार्थियन लोक), अलिन (काफिरीस्तानातील लोक.) ही अशी अनेक उदाहरणे देता येतील. ही जमातनामे अवेस्त्यातही येतात! थोडक्यात अवेस्त्याचा काळ तोच ऋग्वेदाचा काळ. त्यामुळे ऋग्वेदाचा काळ जितका मागे नेला जाईल तितकाच अवेस्त्याचाही काळ मागे न्यावा लागेल हे उघड आहे. परंतू अन्य समकालीन संस्कृत्या, उदा. ग्रीक, इजिप्शियन, मितान्नी, अस्सिरियन वगैरे या दोहोंचा काळ सनपुर्व १५०० पलीकडे जावू देत नाहीत हेही वास्तव लक्षात घ्यावे लागते. आता भारतातील अनेक पुरोगामी असे मानतात कि वैदिक आर्यांनी पश्चिमोत्तर भारतावर आक्रमण केले व एतद्देशियांना गुलाम करुन त्यांच्यावर जातीव्यवस्था लादली! समजा त्यांचा तर्क आपण खरा मानला तरी त्यातून ज्या समस्या निर्माण होतात त्यांचे निराकरण कसे करायचे यावर त्यांच्याकडे उत्तर नाही. महत्वाची अडचण ही कि ऋग्वेद अथवा वेदोत्तर साहित्य अशी कसलीही घटना नोंदवत नाही. छोटी-मोठी युद्धे नोंदवणारे वैदिक ऋषी एवढी मोठी घटना, जी रक्तरंजित व अनेक युद्धांनी साध्य केली गेलेली नोंदवायला विसरले नसते. विसरले तरी तिचे पडसाद कोठे तरी उमटले असते. ऋग्वेदातील दास-दस्यु म्हणजे भारतीय नव्हेत तर इराण-अफगाणिस्तातील लोक. त्यामुळे या दास-दस्युंचा संबंध "गुलाम" याशी जोडत हरलेले भारतीय ते दास-दस्यू असा लावला येत नाही. खुद्द झरथुस्ट्र स्वत:ला 'दख्युनाम सुरो' (दस्युश्रेष्ठ) म्हणवत असे तर दाह (दास) हे अवेस्त्यातील प्रतिष्ठित समाज आहेत. दास म्हणजे गुलाम हा अर्थ ऋग्वेदाला अभिप्रेत नाही. त्यामुळे आर्य आक्रमण सिद्धांत उरबडवेपणा करण्यासाठी वापरता आला तरी ते वास्तव नाही. मुळात दास हे विशेषण अवमानास्पद नव्हते. उदा ऋग्वैदिक महत्वाचा राजा सुदासाच्या नांवातही दास आहे तसेच दिवोदासाच्या नांवातही दास आहे. त्यामुळे ऋग्वेदातील दास-दस्युंशी झालेली युद्धे इराणातील भिन्नधर्मी समाजाशी झालेली युद्धे आहेत. त्यांचा आर्य आक्रमण सिद्धांताशी काहीही संबंध नाही. मग प्रश्न असा उद्भवेल कि वैदिक धर्म भारतात कसा आला? नेमका कधी आला? हा धर्म भारतात आला तेंव्हा भारतातील विविध भागांतील नेमकी काय स्थिती होती? कोणत्या धर्मकल्पना होत्या? कोनती राजकीय परिस्थिती होती? हा धर्म प्रसार कसा झाला? धर्मांतरित वैदिक नेमके कोण होते? त्यांनी वैदिक साहित्यात नेमकी काय भर घातली? ऋग्वेदातील ऋग्वैदिक धर्म आणि नंतरच्या वैदिक धर्मात कसा फरक पडला? मुळचा धर्म आपले अस्तित्व हरपून बसला कि त्याचीही मुळ धारा अव्याहत चालू राहिली? या प्रश्नांची उत्तरे आपण क्रमाक्रमाने शोधुयात. |
You are subscribed to email updates from संजय सोनवणी (Sanjay Sonawani). To stop receiving these emails, you may unsubscribe now. | Email delivery powered by Google |
Google Inc., 1600 Amphitheatre Parkway, Mountain View, CA 94043, United States |