Thursday, December 17, 2015

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)


संजय सोनवणी (Sanjay Sonawani)


Posted: 16 Dec 2015 11:43 PM PST


ईश्वर आहे कि नाही हा वादाचा विषय नसून विविध व्यक्तींना ईश्वर म्हणजे नेमके काय अभिप्रेत असते हा खरा विषय आहे. बुद्धीवादी पातळीवर सदय असलेला, प्रार्थनांनी खूष होणारा, न केल्यास कोपणारा "भावनिक" परमेश्वर अस्तित्वात असणे शक्य नाही. तसा ईश्वर मानल्यास त्याला अतिमानवी रूप देणे सहज शक्य होते. मानवासारख्याच पण अचाट लीला तो सहज करू शकतो. मानवासारखेच त्यालाही राग-लोभ असू शकतात. पुराकथा पाहिल्या तर बव्हंशी सामान्यांचा देव हा असाच असतो. फार आध्यात्मिक झाले तर सर्व सृष्टीचा निर्माता, सर्व चराचरात भरलेला तरीही दशांगुळे व्यापून उरलेला अचिंत्य असा पण अंतिम मोक्षदाता असा परमेश्वर अस्तित्वात येतो. असाही परमेश्वर अस्तित्वात असू शकेल अशी कल्पना करणे मनुष्याला संयुक्तिक असले तरी बुद्धीवादी पातळीवर ते मान्य करता येत नाही.

परंतू भावनात्मक पातळीवर, जी वास्तवच असते, अशा परमेश्वराचे अस्तित्व असणे, त्याचा आधार वाटणे अस्वाभाविक नाही. मनुष्य हा मुळात भावनिक प्राणी आहे आणि भावनिक विश्व हे वास्तव रखरखीत विश्वापेक्षा वेगळे व तरल असते. भक्त त्याला सखा-सवंगडी मानत, आपल्या संकटांचा भार त्याच्यावर टाकत वाट दाखवण्याची अथवा संकटमूक्त करण्याची अपेक्षा बाळगत आपल्या जीवनातील अनिश्चिततेला भावगम्य स्थिरता देवू पाहतात. हे मानवी भावनिक स्वभावाला साजेशेच आहे. शेवटी मनुष्याला स्वत: तो मनुष्यच वाट दाखवतो, पण त्या प्रेरणा ईश्वरविषयक जाणीवांतून अधिक टोकदार होतात हे सामान्य मानसशास्त्र आहे. संकटांशी झुंजतांना काहीतरी अलौकिक सोबत आहे ही जाणीव माणसाला बळ देवू शकते. ते वास्तवात नसले तरी भावनिक पातळीवर ते अस्तित्व प्रबळ असते म्हणून ते भावनेपुरते ते सत्यही असते.

प्रेम हीसुद्धा मग एक अमूर्त व सिद्ध न होऊ शकणारी गोष्ट आहे. पण प्रेमभावनेच्या बळावर मनुष्य अशक्यप्राय कार्ये करू शकतो हे सिद्ध झालेले आहे. "प्रेम" खोटे आहे असे म्हणने प्रेमभंग झालेल्यांसाठी म्हणणे ठीक असले तरी कशाचा तरी भंग झाला असेल तर ते वास्तव का नसेल?

ईश्वर आहे कि नाही हा खरा वादाचा विषय नसून विविध व्यक्तींना ईश्वर म्हणजे नेमके काय अभिप्रेत असते हा खरा विषय आहे. प्रत्येकाचा ईश्वर वेगळा. संकल्पना वेगळी. खरे तर जेवढी माणसे तेवढे ईश्वर. त्याच्याकडून अपेक्षाही वेगवेगळ्या. अशा स्थितीत ईश्वर ही संकल्पना एका व्याख्येत बसवता येणे४ हेही अशक्य आहे असे आपल्या लक्षात येईल!

ईश्वर नाकारणे नाकारणा-यांसाठी ठीक आहे. पण ते नेमके काय नाकारत आहेत हे त्यांनी आधी स्पष्ट केले पाहिजे! मानवी मानसिकता सबल करण्यात ईश्वराविषयकची संकल्पना उपयुक्त ठरली आहे. धर्मांधांनी, ईश्वर संकल्पनेचा स्वार्थासाठी उपयोग करून घेत लोकांचे शोषण करणारे व करू दिले जाणारे हे निश्चितच दंडार्ह आहेत हे खरे. पण म्हणून संकल्पनेलाच कसे उध्वस्त करता येईल? हे निरिश्वरवाद्यांना जर अमान्य असेल तर त्यांनी त्यांच्याकडे असलेला दुसरा व सक्षम पर्याय दिला पाहिजे.

आम्हाला ईश्वर मान्य नाही ...ठीक आहे. ईश्वर/देव सारे थोतांड आहे हेही मान्य आहे. ते फेकून द्या म्हणता...तेही ठीक आहे...पण रिकामी जागा भरायची कशी हे कोण सांगेल? मुळात या गरजा कशा निर्माण झाल्या हे समजावुन घेत त्यावर कायमचे उत्तर शोधत नाही तोवर काय?

मुळात ईश्वर या संकल्पनेचा उगम अखिल मानवाच्या असुरक्षिततेच्या, अनिश्चिततेच्या आणि भयभीततेच्या पुराआदिम जाणीवांच्या विस्फोटातून निर्माण झाली आहे. किंबहुना आपल्या भयभीत मनाला सुरक्षेचे एक कवच म्हणून ती त्याने विकसीत केली आहे. माणसाचा ईश्वर म्हणजे स्वत:च्या काळोखावर/संकटांवर मात करणारा त्याच्याच मानसिकतेचा एक घटक. त्या घटकाला माणूस स्वत:पेक्षा वेगळा व श्रेष्ठ-शक्तीशाली मानतो. जीवनातील अनाकलनीय सृष्ट-दूष्ट घटना या त्याच्याच इच्छेमुळे होतात असेही तो मानतो. आदिम काळात मनुष्य जितक्ला असुरक्षित होता किंबहुना तितकाच असुरक्षीत आजही आहे. न्याय/कायदेव्यवस्था/प्रशासन त्याला अजुनही पुरेशी सुरक्षा देवू शकत नाही. आर्थिक असुरक्षितता तर त्याला सदैव ग्रासून असते. कोणताही निर्णय अंतिम परिणाम काय देईल हेही परिणाम दिसेपर्यंत त्याला सांगता येत नाही. त्याचे असे गणितही नाही कारण परिणामावर परिणाम करणा-या अनंत घटकांच्या परस्पर संबंधंचे भाकीत करणे जवळपास अशक्य होऊन जाते. अशा वेळीस नास्तिक म्हणनारा व्यक्तीही मनोमन कोणत्यतरी शक्तीला शरण जातो, कबूल करत नाही एवढेच!

असे समजा एक पुर्णतया नास्तिक व्यक्ती आहे. त्याच्याविरुद्ध कसलासा गुन्हा दाखल आहे आणि न्यायाधीश काही वेळात निकाल देणार आहेत. निकाल काहेही असू शकतो. तो अनिश्चित आहे. अशा तणावात असा नास्तिकही मनोमन प्रार्थना करतोच. त्याच्यासाठी ईश्वराचे अस्तित्व नाही. ते नाही हे बुद्धीगम्य पातळीवर कोणालाही पटू शकेल. परंतू अनिश्चिततेची वादळे आली कि बुद्धीवद कोलमडून पडतो आणि माणसातील मुळचा भावनिकपणा उफाळून वर येतो.

मानवी जीवनात वास्तवापलीकडेही वास्तवे असतात. कल्पनांपलीकडेही कल्पना असतात. मानवी शरीर गणिती-भौतिकी नियमांनी जावू शकते पण गणीतही शेवटी मानवनिर्मितच असते. माणसाला समजलेले भौतिक विश्वही मानवी मर्यादेच्या आतच असते. आपण निरपेक्ष असू शकत नाही म्हणूणच आपण सापेक्षतेच्या चौकटीत वैश्विक नियम बांधतो. पण विश्व मानवी नियमांना बांधील असतेच असे नाही. म्हणून प्रश्न अनंत व उत्तरे थोडी अशी अवस्था असतेच. एक उत्तर सापडले कि त्यावरही नवीन प्रश्न निर्माण होतात. ते सोडवायला मानूस अजून धावतो. माणसाच्या या अजरामर कुतुहलाला व ते शमवण्यासाठी केलेल्या, करीत असलेल्या धडपडीला त्रिवार सलाम. मानवी विचारांच्याही चौकटी तोडता येतील तेंव्हाच वैश्विक सत्ये सापडू शकतील. तोवर त्यांना आपण केवळ "मानवी सत्ये" (जी अनिश्चित आहेत) म्हणू शकतो. त्यांना अंतिम सत्य म्हणता येणार नाही. विज्ञानातही अनेक मित्या, अनेक विश्वे, कृष्णविवरे, धनात्मक गुरुत्वाकर्षण अशा अनेक कल्पना विश्वाचे कोडे उलगडण्यासाठी वापरल्या गेल्या आहेत. गणित सोडवण्यासाठे क्षणभर तरी ही गृहितके खरीच धरावी लागतात. ही आपली मर्यादा आहे. अज्ञानाच्या गहन कुहरात आपण आहोत आणि आपण प्रकाशाच्या शोधात आहोत.

हा शोध कशावर तरी श्रद्धा असल्याखेरीज कसा पुर्ण होईल? परमेश्वर ही संकल्पना आहे. ते वास्तव नाही. तरीही ती जोवर माणसाला उपयुक्त आहे किंवा तिला सक्षम पर्याय मिळत नाही तोवर ईश्वरवादी सामान्य माणसांना "देवभोळे", "भोळसट", "अंधश्रद्ध" वगैरे म्हणत हीणवायचा काय अधिकार आहे? जोवर कोनाच्याही श्रद्धा स्वत:चा व इतरांच्याही शरिरीक/मानसिक किंवा आर्थिक हानीचे कारण होत नाही तोवर त्या अंधश्रद्धा कशा?

इश्वराची गरज जीवनातील अनिश्चिततेमुळे आहे. असुरक्षिततेमुळे आहे. आणि लोकांना उद्याची शाश्वती देता येईल अशी व्यवस्था आपण जोवर  आणत नाही तोवर लोकांचे देवभोळेपण जाईल ही आपली अंधश्रद्धा आहे. 

No comments:

Post a Comment