संजय सोनवणी (Sanjay Sonawani) |
Posted: 21 Dec 2015 08:00 PM PST
मनुस्मृतीतील शुद्रांवरील बंधने ही त्यांनी आपल्या सेवेत घेतलेल्या वैदिकबाह्य लोकांसाठी आहेत, सर्वांसाठी नाहीत, हे मनुस्मृतीचे परिशीलन करता लक्षात येते. ते कसे हे आपण प्रथम पाहू. १) खुद्द मनुस्मृतीत वैदिक धर्माचा स्पष्ट उल्लेख असून हा यातील धर्माज्ञा वेदशास्त्र प्रमाण मानणा-या लोकांसाठी म्हणजे वैदिकांसाठी आहेत असे पहिल्या अध्यायातच स्पष्ट करण्यात आले आहे. (मनू- १.२-१०) २) देव-पितरांच्या कार्यात व श्राद्धात कोणाला प्रवेश नको याबाबत तिस-या अध्यायात आज्ञा असून मंदिरात पूजा करुन अर्जन करणारे, वैद्य, पशुपालक, मेंढपाळ, अभिनेते, नर्तक, द्यूतगृहे चालवणारे, मांस व मद्य विक्रेते, सूत, तेली, शेतकरी, शिल्पी, दूतकार्य करणारे, शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देणारे वगैरे व्यवसाय करणारे त्याज्ज्य म्हटले आहेत. (अध्याय ३. १५२-१६६) ३) चरितार्थासाठी देवपुजा करणा-यालाही या कर्मात सहभागाची बंदी आहे. ४) अध्याय ४.२१८ नुसार राजा, शूद्र, चर्मोद्योग करणारे, वैद्य, धोबी, रंगारी व वर वर्णित केलेल्या वर्ज्य जातींच्या हातचे खाऊ नये अशीही आज्ञा आहे. वरील बाबी पाहिल्या तर लक्षात येते कि शूद्र आणि इतर व्यवसाय करणा-या जाती या स्पष्टपणे वेगळ्या मानल्या आहेत. सध्या या सर्व जाती (शेतकरी/मेंढपाळादि) शूद्रांत गणल्या जातात. पण तसे वास्तव दिसत नाही. अन्यथा शूद्राचा वेगळा उल्लेख केला नसता अथावा वरील जातींना स्पष्टपणे शूद्र म्हटले गेले असते. राजालाही यात वर्ज्य मानले आहे, याचा अर्थ हे विधान अवैदिक सत्ताधिशांबाबत आहे हे उघड आहे. म्हणजेच मनुस्मृतीला अभिप्रेत असलेले शूद्र हे केवळ वैदिक धर्मियांच्या व्यक्तिगत सेवेत घेतलेला वर्ग होता व दासदासींना ज्या हीणभावनेने मालक वागवत असत तीच हीनभावना त्यांच्याबाबत मनुस्मृतीने व्यक्त केली आहे. मनुस्मृतीने मंदिरात पुजा करणा-यांना व पुजाकार्य करणा-यांनाही वर्ज्य ठरवलेले आहे. याचे प्रमूख कारण म्हणजे मंदिरे व पूजा हे वैदिक धर्मचे अंगच नव्हते तर ते वेदपुर्व शिवप्रधान धर्माचे अंग होते. मनुस्मृती वैदिक कर्मकांडांनीच भरलेली आहे. थोडक्यात ते दुस-या धर्माचे असल्याने वैदिकांच्या धर्मकार्यात त्यांना प्रवेश नसणे स्वाभाविकच आहे. शिवाय हा धर्म मर्यादित लोकाचा होता. बहुसंख्य भारतीय वेदपुर्वच धर्म पाळत आलेले होते व आहेत. दोन धर्मांत स्पष्ट सीमारेखा होती हे मनुस्मृतीवरुनच दिसते. आपण येथे हे लक्षात घेतले पाहिजे कि मनुस्मृतीचा काळ हा निश्चयाने इसवी सनाच्या तिस-या शतकानंतरचा आहे. यातील भाषा पाणिनीच्या व्याकरणाची लक्षणे दाखवते. अनेक नियम जुनेही असू शकतील, पण शेवटच्या संपादकाने त्यावर तिस-या शतकानंतर हात फिरवला आहे हे उघड आहे. म्हणजेच त्यात बरीच भर घातलेली आहे. दुसरे असे कि वैदिकांनी त्यांच्या सेवेत असलेल्या शूद्रांवर बंधने घातली याची कारणे वैदिक ज्या परिस्थितीत होते त्यात आहेत. वैदिक मंडळी उत्तर भारतात, विशेष करुन कुरु, मत्स्य, पांचालादि भागात वस्त्या करून राहत. त्यांच्या वस्त्याही बव्हंशी खेड्याप्रमानेच असून ते नगरांत राहत नव्हते हे मनुस्मृतीवरून स्पष्ट दिसते. त्यांना जीवनयापनासाठी कृषीकार्य, गृहकार्य, पशुपालनादि कार्ये करण्यासाठी सेवकांची गरज होतीच. असे सेवक/सेविका अनेकदा राजाकडून अथवा यजमानांकडून त्यांना दानात मिळत अथवा वेतनावर ठेवून घेतले जात. नित्य सहवासामुळे वैदिक स्त्रीया या वेगळ्या धर्माच्या पुरुषांशी किंवा वैदिक लोक या अवैदिक स्त्रीयांशी रतही होत असत. यातून जी संतती पैदा होई त्यामुळे वैदिक लोकांना तिला आपल्या धर्मात नेमके काय स्थान द्यायचे याबाबत गोंधळ उडने स्वाभाविक होते. त्यांना वस्तीवरून घालवून देनेही शक्य नव्हते कारण मग कार्ये कोण करणार? यामुळे वैदिकांनी मार्ग काढला तो असा, कि ते अशा सेवकवर्गावर, ज्यांना ते शूद्र म्हणत, बंधने लादत गेले. पण वि. का. राजवाडे म्हणतात की या बंधनांचा विशेष उपयोग झाला नाही. मनुस्मृतीनुसार असे दिसते कि प्रसंगी अशा शुद्रांच्या घरीही यज्ञयाग करणे वैदिकांना भाग पडे. (मनु-३.७८). अगदी त्यांच्यासाठी नांगरणी करणारे, त्यांची गुरे राखणारे, त्याचे न्हावी यांच्या हातचे अन्नही त्यांना चालत असे. (मनू: ४.२१८) पाणिनीनुसार दोन प्रकारचे शूद्र होते, अनिर्वसित शूद्र आणि निर्वसित शूद्र. निर्वसित शूद्र म्हणजे जे आर्यांच्या (वैदिकांच्या) सेवेत नसलेले, स्वतंत्र धर्म व जीवनयापन करणारे व अनिर्वसित शूद्र म्हणजे आर्यांच्या सेवेत असणारे. यावरून हे स्पष्ट होईल कि मनुचे नियम हे अनिर्वसित शुद्रांबाबत होते, बाहेरच्या समाजाबाबत लागू नव्हते. म्हणूनच तथाकथित शूद्र नुसते राजे बनत नसत तर व्यापार/कृषी इत्यादि मार्गांनी धनाढ्यही होत असत. वरील विवेचनाचे तात्पर्य हेच कि वैदिक धर्म स्वतंत्र होता, त्याचे धर्मनियम व कर्मकांडेही वेगळी होती आणि ते अल्पसंख्य असल्याने वर्णसंकर त्यांना परवडनारा नव्हता. त्यांना मंदिरे, पुजा य वेदपुर्व धर्मक्रियांचा तिटकारा होता. आपला धर्म कसाबसा प्राप्त स्थितीत शुद्ध ठेवत टिकवून ठेवायचा हा त्यांच्यापुढील यक्षप्रश्न होता व म्हणूनच ते त्यांचे धर्मनियम कडक करत राहिले. मनुस्मृतीत ब्राह्मणांच्या खाण्या-पिण्यापासून ते वेदाध्ययन करत गृहस्थीवर जी कडक बंधने घातली गेली तीही याच परिस्थितीतून असे म्हणता येते. मनुस्मृती संपुर्ण हिंदू समाजासाठी लिहिली गेली या मताला खुद्द मनुस्मृतीच दुजोरा देत नाही हे अध्याय १.२ वरुनच स्पष्ट दिसते. वैदिक धर्मांतर्गतची सामाजिक/धार्मिक व राजकीय व्यवस्था लावण्यासाठेच तिचा जन्म झाला व तिचे स्थान तेवढेच आहे. हिंदूंशी (शैवप्रधान मुर्तीपुजकांशी) तिचा काहीही संबंध नाही. या स्मृतीतील आज्ञा वेदपूर्व शिवप्रधान धर्म पाळणा-यांनी मानलेल्याही दिसत नाही. त्या आज्ञा त्यांच्या धर्मासाठी नव्हत्याच तर कशा पाळल्या जाणार? वैदिक धर्म हा संपुर्णपणे वेगळा असून वेदपुर्व शिव-शक्तीप्रधान धर्म पाळणा-यांचा त्याशी काहीही संबंध नाही हे लक्षात घेतले पाहिजे. |
Posted: 21 Dec 2015 07:02 PM PST
पण काही लोकांना रक्तपात सुंदर वाटतो. अनेकांना देव किंवा अल्ला, आकाशातील बाप वा यह्वे रक्तपाताच्या घटना घडवून आणु शकतील अथवा तशी स्थिती उत्पन्न करतील म्हणून प्रिय वाटतात...जास्तच पुजनीय व विश्वसनीय वाटतात. देव विरुद्ध अल्ला किंवा यह्वे विरुद्ध अल्ला-देव वगैरे लढे तेच तय करुन ठेवतात. कोण एकमात्र आणि कोण एकमेव श्रेष्ठ हे यांचे एकमात्र श्रेष्ठ देव ठरवत नाहीत तर त्यांनीच म्हणे बनवलेली ही निष्प्राण प्रजा ठरवनार!
पण कोण श्रेष्ठ? कोणाचा मान्य देव श्रेष्ठ? ते एकमेव असतील तर एकमेव देवांतही बहुदेवतावाद आणनारे, म्हणजे हा देव श्रेष्ठ कि तो, महामुर्ख नव्हे काय? आणि जे बहुदेवता मानतात ते मरणाचे अधिकारी कसे? आणि हे ठरवणारे तुम्ही कोण? तुमच्या अल्ला, आकाशातील बाप, यह्वे, इंद्र, शिव वगैरेंना जर त्यांच्यात नेमके कोण खरे आणि एकमेव हे ठरवता येत नसेल तर ते ठरवणारे तुम्ही कोण? कोणत्या पुस्तकात लिहिले असेल तर ते कोणी लिहिले? आकाशातला बाप अथवा अल्ला अथवा परमेश्वर माणसाच्या हृदयावर माणुसकीचे अजरामर संगीत लिहित असतो...तो भाकड पुस्तके लिहित बसत नाही. कोणा एका माणसाला तो आपला संदेष्टा अथवा प्रेषीत बनवायला महामुर्खही नाही. मुर्ख माणसे असू शकतात....असलाच कोठे तर...तो परमेश्वर तरी नक्कीच मुर्ख नाही! असली तर सारी माणसेच त्या परमेश्वराचे संदेष्टे आहेत. प्रत्येक माणूस हा प्रेषित आहे. प्रत्येक माणूस हा परमेश्वरही आहे. त्याचे जीवनगाणे आणि अनावर संघर्ष हेच ईश्वरी गीत आहे. आणि सर्वांचे मिळून जे महागीत होते तेच खरे विश्वगीत आहे. पण आमचे गीत नाही. पण आमचे सुस्वर संगीत नाही. पण मग आमचा कोणी ईश्वरही नाही. तुम्हा बेवकुफांना रानटी रान मोकळे द्यायला त्याला वेड लागलेले नाही. त्याने जे न लिहिता लिहिलेच आहे ते पुन्हा कोणा माणसाच्या (प्रेषित-अवतार वगैरे) माध्यमातून त्याने सांगितले हे मानणे जेवढा मुर्खपणा आहे त्यापेक्षा अधिक गाढवपणा त्या माध्यमालाही दैवत्व देण्यात आहे. रक्तपात सुंदर वाटतो काहींना कारण त्यांना ईश्वराचे गीत माहित नसते. अमुकला मी मानतो आणि तोच खरा, तू ज्याला मानतो तो खोटा असे जो कोणताही धर्मग्रंथ सांगतो आणि त्यासाठी रक्तपाताचे आदेश देतो तो धर्म नसून अधर्म आहे. असे सांगणारे धर्मग्रंथ ईश्वराचाच घोर अवमान करत असतात. खरा देव आणि खोटे देव अशी वाटणी स्वार्थी माणसाला सोयीची असली तरी मुळात देव खराही नाही आणि खोटाही नाही. रक्तपात, द्वेष, लुटालुट इत्यादि अधम भावना बाळगणा-यांना देव असू कसा शकतो? असे सांगणरे "प्रेषित" अथवा "अवतार" अस्तित्वातच कसे येऊ शकतात? ते काही खरे नाही. जगातले सारे धर्मग्रंथ प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रक्तपातच शिकवतात ते धर्मासाठी नव्हे तर राजकारणासाठी. वर्चस्व निर्माण करण्यासाठी. परमेश्वराची संकल्पना या अमानवीपणासाठी नाही. संघर्ष धर्माचा नाही. संघर्ष यह्वे-अल्ला-आकाशातला बाप-देव यांच्यात नाही. तुम्ही नांवे तुमच्या सुमार बुद्धीने वेगवेगळी दिली असतील...पण ते एकच...एकाच मानवी अद्भूत संकल्पनेचे तरल पातळीवर वावरणारे रूप आहे! संघर्ष हा कोणाचे वर्चस्व कोणत्या मानवी गटावर असणार यासाठी आहे. त्यासाठी हे पापी देवांनाही वेठीला धरतात. देवांनाच शस्त्र म्हणून वापरतात. त्यांना रक्तपात सुंदर वाटतो. माणसे तडफडत मरतांना पाहतांना त्यांना आनंद वाटतो. खुनशीपणात त्यांना ओर्गाझम झाल्याचा विकृत आभास मिळतो. हे किंवा ते तोडण्यात त्यांना उन्माद चढतो. स्त्रीयांवर बलात्कार करण्यात या हिजड्यांचे पौरुष उफाळल्यागत विझते. माणसे जिंकतात...माणसे हरतात. माणसे बलात्कार करतात...माणसे बलात्कारित होतात... आणि यांचे देव-अल्ला-आकाशातील बाप-यहवे वगैरे जेवढेही देव असतील तेही तेवढेच बलात्कारित होतात आणि तेही बलात्कारी होतात! आम्हीच आमच्या देवांवर बलात्कार करतो किंवा त्यांना बलात्कारी करतो. ईश्वर-अल्ला-यहवे वगैरे सुंदर संकल्पनांची निघृण विटंबना करतो.... आम्ही माणसातल्या माणसाची विटंबना करतो! आम्हाला देव हवा कि नको हा प्रश्न उरत नसून देवांनाच आम्ही हवे आहोत कि नकोत हा प्रश्न विचारायला हवा! |
You are subscribed to email updates from संजय सोनवणी (Sanjay Sonawani). To stop receiving these emails, you may unsubscribe now. | Email delivery powered by Google |
Google Inc., 1600 Amphitheatre Parkway, Mountain View, CA 94043, United States |
No comments:
Post a Comment